अलिकडेच 2000 रुपयाची नोट चलनातून बाद करण्यात आली आहे. ती बदलून घेण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यावेळी काही अफवा पसरवण्यात आल्या. मात्र आरबीआय (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. आता एक नवी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बँकेतल्या रोकडसंबंधी. तुमच्या खात्यात जर 30 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचं बँक अकाउंट बंद होणार असल्याचं हे वृत्त आहे. मात्र हे खरंच आहे का, याविषयी शोध घेणं महत्त्वाचं ठरतं. नेमके कॅश डिपॉझिटचे (Cash deposit) नियम काय आहेत, हे पाहणं गरजेचं आहेत.
Table of contents [Show]
आरबीआयचे कॅश डिपॉझिट नियम
सरकारनं 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, लोक रोख ठेव, बँक खाती आणि इतर बँकिंगच्या नियमांबद्दल घाबरले आहेत किंवा ते चिंताग्रस्त झाले आहेत, अशीच स्थिती आहे. अचानक यावरून कोणतेही नियम बदलू नयेत, अशी भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे सर्वसामान्य खातेधारकांच्या मनात घबराट होणं स्वाभाविक आहे. नेमकं काय घडत आहे, याबाबत त्यांना माहिती मिळायला हवी. दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमधून अधिक संभ्रम निर्माण होऊ शकतो. यावरच आता पीआयबीनं फॅक्ट चेक करत एका ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
पीआयबीनं काय म्हटलं?
केंद्रीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कोणाच्याही खात्यात 30 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास त्यांचं बँक खाते बंद करण्यात येईल, अशी मोठी घोषणा केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. हे वृत्त पूर्णत: चुकीचं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या बातमीचं खंडन करताना पीआयबीनं (Press information bureau) म्हटलं, आहे की असं काहीही नाही. त्याचबरोबर आरबीआय असा कोणताही नियम आणत नाही.
एक ख़बर में दावा किया जा रहा है कि भारतीय रिजर्व बैंक के गवर्नर ने बैंक खातों को लेकर एक अहम ऐलान किया है कि अगर किसी भी खाताधारक के खाते में 30,000 रुपये से ज्यादा है तो उसका खाता बंद कर दिया जाएगा#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 15, 2023
▪️ यह ख़बर #फ़र्ज़ी है।
▪️ @RBI ने ऐसा कोई निर्णय नहीं लिया है। pic.twitter.com/dZxdb5tOU9
कमाल किती रक्कम ठेवता येईल?
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यात किती पैसे ठेवायचे यासंदर्भात देशात अशी कोणतीही मर्यादा किंवा नियम नाही. तुम्ही हजारो, लाख, कोटी अशी कितीही रक्कम ठेवू शकता आणि पैसे काढण्याचीदेखील मुभा आहे. कोणतंही बंधन नाही. मात्र एक बाब महत्त्वाची आहे, ती म्हणजे जेव्हा तुमची रक्कम जास्त असते, त्यावेळी त्याचा हिशोब मात्र द्यावा लागतो.
किमान शिल्लक ठेवण्याचा नियम
कमाल रक्कम किती असावी, याला तर मर्यादा नाही. मात्र किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा नियम मात्र नक्की आहे. म्हणजेच तुमच्या बँक खात्यात किमान एक निश्चित रक्कम असयला हवी. जेव्हा मर्यादेपेक्षा कमी होते, तेव्हा बँक शुल्क आकारू शकते. प्रत्येक बँकेत एक विशिष्ट रक्कम (किमान रक्कम मर्यादा) असते. सरकारी बँकांमध्ये कमी आणि खासगी बँकांमध्ये ती जास्त असू शकते.
रोख ठेव नियम
देशात रोख रक्कम जमा करण्यासंदर्भात नियम नक्कीच आहेत. तुम्ही तुमच्या बचत खात्यात एकाच वेळी 1 लाख रुपये रोख जमा करू शकता. यासोबतच एका वर्षात फक्त 10 लाख रुपयांपर्यंत रोख जमा करता येते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त पैसे जमा करायचे असतील तर तुम्ही ऑनलाइन ट्रान्सफर पर्यायाद्वारे ती जमा करू शकता. आरबीआयनं बँकांना 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या ठेवी किंवा पैसे काढण्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर अशा व्यवहारांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्यासही सांगितलं आहे.