उन्हाळा आला की आपल्याकडे दिवसरात्र पंखे, कुलर, एसी सुरु असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे कुटुंबातील सगळी मंडळी घरातच असतात, त्यामुळे विजेचा वापर हा वाढतोच. जितका जास्त विजेचा वापर जास्त तितके बिल देखील जास्त हे काही वेगळे सांगायला नको. वीजबिल कमी यावे म्हणून लोक काही ना काही अक्कल लढवत असतात. त्यापैकी एक म्हणजे ‘विद्युत बचत यंत्र’, ज्याला Electricity Saving Device देखील म्हटले जाते.
ई-कॉमर्स वेबसाईटवर अशी अनेक वीज बचत उपकरणे 250 ते 1200 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत, जी तुमच्या घराचे वीज बिल कमी करण्याचा दावा करतात. अनेक लोक यावर विश्वास ठेऊन हे यंत्र खरेदी देखील करतात.उन्हाळा जवळ आला की अशा काही गोष्टींची, यंत्रांची विक्री मोठ्या प्रमाणात व्हायला लागते. तुम्ही देखील कधी ना कधी अशा प्रकारची यंत्रे कुणाच्या ना कुणाच्या घरात पाहिलीच असतील. खरेच अशी यंत्रे लावून आपण आपले वीजबिल कमी करू शकतो का? या यंत्राच्या वापरामागे काही शास्त्रीय आधार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
वीज बचत खरेच होते का?
‘विद्युत बचत यंत्र’ हा शब्द तसे पहायला गेले तर आपल्याला वैज्ञानिक भासू शकतो. कुठल्या तरी अभ्यासानुसार ते ते तयार केले गेले आहे असे आपल्याला वाटू शकते. मात्र वीज वाचवण्यात मदत करण्यासाठी कायदेशीर साधने आणि धोरणे उपलब्ध असताना, बाजारात अशी फसवी आणि कुचकामी उत्पादने आता विकली जात आहेत.
वीज-बचत उपकरणांद्वारे केलेल्या दाव्यांचे मूल्यमापन करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. अनेक फसवी उत्पादने विश्वसनीय पुरावे किंवा वैज्ञानिक आधार न देता ऊर्जा बचतीची अतिशयोक्तीपूर्ण आश्वासने देतात. सामान्य नागरिकांना आपले महिन्याचे वीजबिल कमी यावे असेच वाटते. याच भावनेशी खेळण्याचा प्रयत्न अशी यंत्रे बनवणाऱ्या कंपन्या करत असतात.परंतु प्रत्यक्षात, ऊर्जेच्या वापरावर या बनावट यंत्राचा फारसा प्रभाव पडत नाही.
ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्री
आधी सध्या हार्डवेयरच्या दुकानात मिळणारे हे Electricity Saving Device आता अमेझॉन, फ्लिपकार्ट या नामांकित ई-कॉमर्स वेबसाईटवर 400 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे. डिव्हाइसच्या दाव्यांवर ग्राहकांनी लिहिलेले अभिप्राय वाचले की आपल्याला नेमकी कल्पना करता येते की हे डिव्हाइस नेमके कसे काम करते. अनेकांनी लिहिले आहे की, त्यांच्या वीजबिलावर कुठलाही परिणाम झालेला नाही. तसेच काहींनी असे देखील म्हटले आहे की या डिव्हाइसच्या वापरामुळे त्यांच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
काय म्हणतात जाणकार?
याबाबत एका खासगी कंपनीत इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना ते म्हणाले की, अशा प्रकारचे डिवाईस बाजारात निव्वळ पैसे कमवण्यासाठी विकले जातात. या डिवाईसमुळे वीजबिलावर कुठलाही फरक पडत नाही. तुम्ही जितके विजेचे युनिट वापरणार आहात त्यानुसार तुम्हाला बिल येणारच आहे. असे बनावट उपकरण वापरून वीज बचतीच्या फंदात न पडता, महावितरण आणि वीज मंत्रालयाने सांगितलेल्या गोष्टींचे पालन आपण करायला हवे.
आवश्यकता असेल तरच लाईट, पंखे, कुलर वापरावेत. अनावश्यक फोन आणि लॅपटॉपची चार्जिंग टाळा. एयर कंडीशनरचे तापमान 16 किंवा 18 अंशांवर थेवण्याऐवजी ते 24-25 अंशांवर ठेवा. अशा छोट्याछोट्या चांगल्या सवयी आपण आत्मसात केल्यास वीज बिलात मोठी बचत होऊ शकते.