IT Stocks: चालू आर्थिक वर्षातील जून तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप सर्व कंपन्यांचे निकाल जाहीर झाले नाहीत. मात्र, शेअरचे भाव वरती जाताना दिसत आहेत. सप्टेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच शेअर्स उच्चांकावर पोहचले आहेत.
आयटी शेअर्स ची प्रगती
काल मंगळवारी विप्रो, टीसीएस, एचसीएल या कंपन्यांचे स्टॉक्स वरती गेले. मात्र, त्यामागे काही ठोस कारणही नव्हते. मागील एका आठवड्यात टेक महिंद्रा कंपनीचे शेअर्स 10% वाढले आहेत. तर इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएसचे शेअर्सही 8-9% वाढले आहेत. HCL टेक कंपनीचा शेअर्स देखील 4% वर गेला आहे. एकंदर निफ्टी आयटी इंडेक्स 8% वर गेला आहे.
परकीय गुंतवणुकदार मागील काही दिवसांपासून आयटी कंपन्यांतील शेअर्स विक्री करत आहेत. तर स्थानिक गुंतवणुकदारांकडून शेअर्सची खरेदी चालू आहे.
IT कंपन्यांचे शेअर्स वर जाण्यामागील कारण काय?
अमेरिकेतील बँक संकटाचा IT व्यवसायातील BFSI सेगमेंटवर फार मोठा परिणाम झाला नाही. बँका, विमा वित्त संस्था/सेवा कंपन्यांकडून आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात काम मिळते. अमेरिकेतील बँक संकटामुळे त्याचा वित्तसंस्थांवर परिणाम होईल, असा अंदाज होता. म्हणजे आयटी कंपन्यांवर मोठा परिणाम होईल, असे बोलले जात होते. मात्र, तसे दिसून आले नाही. BFSI सेगमेंटमधील कामांतून आयटी कंपन्यांना नफाही जास्त मिळतो.
अमेरिकेतील महागाई कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसून आल्याने त्याचा परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येत आहे.
कंपन्यांना नवी कंत्राटे मिळाली
आघाडीच्या आयटी कंपन्यांना जागतिक स्तरावर अस्थिर स्थिती असतानाही नवी कंत्राटे मिळाली. मागील तिमाहीपेक्षा या कंत्राटांचे मूल्य जास्त आहे. त्यामुळे भविष्यात आयटी कंपन्या आणखी नफा कमावतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. टीसीएस 10 बिलियन डॉलर, विप्रो 1.2 बिलियन, एचसीएल 1.6 बिलियन डॉलर एवढ्या मुल्याची कंत्राटे मिळाली आहेत. मागील वर्षीपेक्षा ही आकडेवारी जास्त आहे.
जगभरात डिजिटल टेक्नॉलॉजी वाढत आहे. विविध क्षेत्रांमध्ये आयटीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे IT क्षेत्राची आणखी भरभराट होईल, असा विश्वास गुंतवणुकदारांना वाटत आहे.