Health Insurance For Woman: महिला या संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी सांभाळत असतात. अनेक महिलांवर घरकामा बरोबरच आर्थिक बाजू सांभाळण्याचा देखील ताण असते. अशावेळी त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत असते. आरोग्य विमा महिलांना आरोग्य तपासणी बरोबरच आर्थिक आणि मानसिक आधार प्रदान करते.
Table of contents [Show]
महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त
एका सर्वेक्षणानुसार, भारतीय महिला पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात. 2019 च्या जागतिक आरोग्य आकडेवारीनुसार, भारतीय महिलांचे जन्मावेळीचे आयुर्मान 72.2 आणि पुरुषांचे 69.5 होते. 2019 मध्ये महिलांसाठी जन्मावेळी निरोगी आयुर्मान 60.4 होते. तसेच,भारतात माता मृत्यू दर खूपच चिंताजनक आहे. त्याचप्रमाणे अनेक महिला शारीरिक दुर्बलतेसह दीर्घकाळापर्यंत आयुष्य जगतात. महिलांना अनेक आजार होतात.
महिलांच्या आरोग्यविषयक समस्या जास्त
गेल्या काही दशकांमध्ये महिलांच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. ती आज केवळ गृहिणी नाही. ती संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते. अनेक महिला घर आणि ऑफिसच्या कामाची जबाबदारी पार पाडत आहेत. तिच्या मुलांना आणि आश्रित आई-वडील आणि सासरच्या लोकांना भावनिक आणि आर्थिक आधार देत आहे. यानंतरही अनेक महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. स्त्रीयांच्या दुर्लक्षित आरोग्याचा परिणाम फक्त स्त्रीवरच होतो, असे नाही. त्याचबरोबर कुटुंब, मुले आणि समाजालाही त्या आजाराचा फटका बसतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो, ज्याचा त्यांच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. विकसनशील आणि अल्पविकसित देशांमध्ये, जिथे पुरुषांना प्राधान्य दिले जाते, तिथे महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
स्त्रियांची आरोग्यविषयक गुंतागुंत
कुटूंबामध्ये आरोग्य विम्याचा विचार केला, तर प्रथम फक्त पुरुषांचा विमा काढला जातो. परंतु महिलांची आरोग्यविषयक स्थिती पाहता, त्यांचा आरोग्यविषयक विमा काढणे तितकेच महत्वाचे आहे. डब्ल्यूएचओच्या मते, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग हे महिलांच्या खराब आणि दुर्लक्षित आरोग्याचे प्रमुख कारण आहेत. लवकर तपासणी किंवा प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास अनेकांचे जीव वाचवू शकते. 15 ते 44 वयोगटातील महिलांसाठी, विशेषतः भारतासह विकसनशील देशांमध्ये, गर्भनिरोधक गोळ्या, असुरक्षित लैंगिक संबंध आणि गर्भपात यासारख्या पुनरुत्पादक आरोग्याच्या समस्या चिंतेचे कारण आहेत. तसेच, इतर आरोग्य विषयक समस्या जसे बाळंतपण किंवा गरोदरपणातील गुंतागुंत यामुळे स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते.
आरोग्य विमा का आवश्यक
महिलांचा आरोग्याशी संबंधित संपूर्ण घटक कव्हर असलेला विमा काढायला हवा. विमा असतांना त्यानिमित्ताने का होईना, परंतु महिलांचे रुटीन चेकअप सुरु असते. तसेच, इतर कुठल्याही आजारपणात पैश्यांचा विषय विचारात न घेता योग्य त्या रुग्णालयात वेळेवर उपचार घेता येतात. तसेच, समजा कुठलाही कर्करोग झाल्यास, नियमित चेकअप मुळे वेळीच त्याचे निदान होते आणि ती स्त्री लवकर बरी होण्यास मदत होते.
सामुदायिक प्रयत्न करायला हवे
भारतातील महिलांचे आरोग्य पाहता अशा धोरणांची गरज आहे. ज्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव करावा लागतो. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यासारखे कार्यक्रम सुरू करून सरकार आपले काम करत आहे. तरीही, खाजगी आणि सार्वजनिक विमा कंपन्यांनी एकीकडे सरकार आणि दुसरीकडे स्थानिक समुदाय यांच्याशी सहकार्य करून महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी काम करण्याची गरज आहे.