Investment In FD: भारतामध्ये अर्थसाक्षरता दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, इक्विटी फंडात गुंतवणूक करताना जोखमीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांकडून मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट (FD Investment) या पर्यायाला पसंती दिली जाते. बाजारातील जोखीम हे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यामागील मुख्य कारण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जास्त पैसे मिळाले नाही तरी चालतील, मात्र, पैसे सुरक्षित राहायला हवे, याकडे भारतीयांचा सर्वाधिक कल आहे.
मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य (People prefer to invest in FD)
कुवेरा या गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने याबाबत सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले. सर्वाधिक 44% नागरिकांनी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये पैशांची सुरक्षितता असल्याचे म्हटले आहे. तर 23% नागरिकांनी आणीबाणीच्या काळात लगेच पैशांची व्यवस्था व्हावी यासाठी अल्प मूदतीच्या ठेवींमध्ये पैसे गुंतवणूक केल्याचे सांगितले. मुदत ठेवींना नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. कुवेरा या संस्थेने सुमारे 15 लाख गुंतवणूकदारांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले. यामधून ही माहिती समोर आली.
FD मध्ये पैशांची सुरक्षितता जास्त (FD is safe option to invest)
मुदत ठेवींमधील सुलभता आणि पैशांची सुरक्षितता याकडे गुंतवणूकदार सर्वाधिक आकर्षित होतात. त्यामुळे FD हा गुंतवणुकीचा पर्याय नागरिकांमध्ये प्रसिद्ध आहे. बाजारामध्ये मोठी पडझड झाली तरी गुंतवणूक सुरक्षित राहते, त्यामुळे नागरिकांचा या गुंतवणुकीकडे जास्त कल असल्याचे कुवेरा कंपनीचे सहसंस्थापक गौरव रस्तोगी यांनी म्हटले.
बँकेच्या बचत खात्यात जमा असलेली राशी मागील काही वर्षापासून वाढत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये भारतीय बँकांमध्ये 2,242.775 बिलियन डॉलर एवढी रक्कम जमा झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात जास्त रक्कम आहे. दर पाचपैकी एक व्यक्ती आणीबाणीच्या काळासाठीची रक्कम अल्पकालीन मुदत ठेवींमध्ये गुंतवत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मुदत ठेवींमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी गुंतवणूक मानली जाते. रिझर्व्ह बॅंकेने या आर्थिक वर्षात किमान 4 वेळा रेपो दरात (Repo Rate) वाढ केली. आरबीआयच्या रेपो दरवाढीनंतर बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात जशी वाढ केली. त्याप्रमाणे मुदत ठेवींच्या योजनांच्या (Interest Rate Hike on Fixed Deposit Scheme) व्याजदरातही वाढ केली. सध्या तर अनेक बॅंकांनी मुदत ठेवींच्या (Fixed Deposit) व्याजदरात भरघोस वाढ केल्याचे दिसून येत आहे. काही बॅंका 8 ते 8.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.