महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं.अहिंसेच्या मार्गाने यश मिळवता येतं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. शांतीचा, करुणेचा, ममतेचा आणि समतेचा संदेश त्यांनी आयुष्यभर भारतीयांना दिला. गांधीजी पक्के प्रयोगशील व्यक्ती होते. आधी अनुभवा आणि मग स्वीकारा हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळलं.
गांधीचा एक अर्थविषयक दृष्टीकोन देखील आहे. समूहाचा आर्थिक विकास होताना कुठलाही वर्ग त्यातून सुटणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी असे गांधीजी म्हणत. यातूनच गांधीजींनी Trusteeship म्हणजेच विश्वस्त पद्धतिचा एक विचार मांडला.
महात्मा गांधींची ट्रस्टीशिपची संकल्पना हे एक नाविन्यपूर्ण तत्त्वज्ञान होते. जे संपत्ती, वित्त आणि व्यापक अर्थव्यवस्थेतील संबंधांवर एक विचार देतो. देशातील आणि जगातील असमान आर्थिक व्यवस्थेला पर्याय म्हणून गांधीजींनी ही संकल्पना पुढे आणली. न्याय्य आणि नैतिकदृष्ट्या अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे असे गांधीजींचा मत होते.
Table of contents [Show]
काय आहे ट्रस्टीशीपचा सिद्धांत?
ट्रस्टीशीपची संकल्पना असे मानते की व्यक्ती आणि व्यवसायांनी त्यांची संपत्ती आणि संसाधने हे स्वतःच्या स्वार्थासाठी साठवून ठेऊ नये. तसेच संपत्तीचा वापर शोषण करण्यासाठी केला जाऊ नये असेही हा सिद्धांत सांगतो.
याउलट समाजाच्या व्यापक हितासाठी संपत्तीचा वापर केला जावा असे गांधीजी सुचवतात. ज्यांच्याकडे धनदौलत आहे, भांडवल आहे अशा व्यक्तींनी किंवा कंपन्यांनी नफाखोरी करण्याऐवजी समाजाच्या कल्याणासाठी याचा वापर करावा असा आग्रह गांधीजी धरत होते.
नैतिक जबाबदारीचे भान
ट्रस्टीशीपचा मुख्य गाभा म्हणजे संपत्तीचा वापर सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाला चालना देण्यासाठी केला जावा, अशी कल्पना आहे. गांधींनी असा युक्तिवाद केला की काही लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण समाजाच्या कल्याणासाठी हानिकारक आहे आणि श्रीमंतांचे कर्तव्य आहे की वंचित वर्गाच्या उन्नतीसाठी धनिक वर्गाने त्यांच्या संसाधनांचे स्वेच्छेने पुनर्वितरण केले पाहिजे.
ही संकल्पना संपत्तीचे पुनर्वितरण आणि प्राप्तीकर आकारणीच्या तत्त्वांशी मिळती जुळती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था (Mix Economy) स्वीकारली आणि गांधीजींच्या या संकल्पनेचा काही प्रमाणात स्वीकार केला. नफाखोरीला गांधीजी विरोध करत असले तरी भांडवली व्यवस्थेला मात्र ते विरोध करत नाहीत. त्यामुळे मार्क्सवादी अर्थशास्त्रीय विचार आणि गांधीवादी अर्थशास्त्रीय विचार यांमध्ये फरक करता येतो.
आजच्या काळात भांडवली व्यवस्था जोरदारपणे वाढत असताना खालील माध्यमातून गांधीजीच्या ट्रस्टीशीप या संकल्पनेचा विचार केला जाऊ शकतो.
नैतिक गुंतवणूक
गुंतवणूकदार त्यांचा निधी अशाच कंपन्या किंवा प्रकल्पांना दिला पाहिजे जिथे सामाजिक उत्कर्षाची शक्यता आहे. कुणाचे शोषण करून आपला नफा कमावणे हे गांधीवादात बसत नाही. त्यामुळे नैतिक मार्गाने अशाच ठिकाणी गुंतवणूक करावी ज्यातून सामाजिक असमतेच्या विरोधात काम होईल. तसेच पर्यावरण हा देखील गांधीवादाचा मुख्य गाभा राहिला आहे. ज्या उद्योगधंद्यातून पर्यावरणीय समस्या निर्माण होत असतील असे उद्योग करू नयेत असे गांधी म्हणत.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)
सध्या CSR ही संकल्पना जोरात आहे.कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही भाग समाजच्या भल्यासाठी खर्च केला पाहिजे आणि शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये (CSR) सांगितले जाते. गांधीजींच्या ट्रस्टीशीप या संकल्पनेला न्याय देणारा हा एक साजेसा प्रकार आहे.
सर्वसमावेशक आर्थिक वाढ
आर्थिक धोरणे आखताना सरकार ट्रस्टीशीपचा मार्गदर्शक तत्त्व म्हणून वापर करू शकतात. यामध्ये उत्पन्नातील असमानता कमी करण्यासाठी प्रगतीशील करप्रणाली लागू करणे आणि वंचितांना आधार देण्यासाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करणे अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो. .
ट्रस्टीशीपची संकल्पना कुणी स्वीकारली?
कुठलीही कंपनी जे उत्पादन बनवते त्याची मालकी केवळ कंपनीच्या मालकाकडे राहत नाही तर ती समाजाची देखील त्यावर मालकी असते असे गांधीजी म्हणत. गांधीजींनी त्यांचे हे आर्थिक विचार तत्कालीन उद्योगपतींना देखील पटवून दिले. सर रतन टाटा, जी.डी. बिर्ला आणि जमनालाल बजाज यांच्यासारख्या व्यावसायिकांनी गांधीजींची ही आर्थिक तत्वप्रणाली स्वीकारली होती.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या तीनही उद्योगपतींनी यथाशक्ती आपले योगदान दिले आणि समाजाच्या भल्यासाठी नफ्यातील बहुतांश भाग वापरला.
येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ट्रस्टीशिपची गांधींची संकल्पना खाजगी मालमत्तेचे उच्चाटन किंवा भांडवलशाही नाकारण्याचे समर्थन अजिबात करत नाही.त्यामुळेच टाटा, बिर्ला आणि बजाज हे उद्योगपती गांधीजींसोबत उभे राहिले. संपत्ती आणि संसाधनांची जबाबदारी आणि नैतिक पद्धतीने व्यवसाय करण्याचा पर्याय त्यांनी निवडला.
ट्रस्टीशिपची व्यावहारिक अंमलबजावणी वेगवेगळी असली तरी, त्याची मूलभूत तत्त्वे अधिक न्याय्य आणि समतोल आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक आहेत.