Home Loan Tenure :जेव्हा आपण गृहकर्ज घ्यायला जातो. तेव्हा एका ठराविक रकमेसाठी आपण अर्ज करतो. रक्कम मिळाल्यानंतर ती आपल्याला व्याजासहित एका ठराविक मुदतीत फेडावी लागते. म्हणजे एखाद्या बॅंकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून तुम्ही कर्ज घेतल्यास, ठरवून दिलेल्या मुदतीत महिन्यावारी रक्कम तुम्हाला फेडावी लागते. तुम्ही गृहकर्ज घेत असल्यास त्याच्या मुदतीचा तुमच्या व्याजावर आणि EMI वर प्रभाव पडतो. त्यामुळे गृहकर्ज घ्यायच्या आधी मुदतीवर विचार करणे गरजेचे आहे. बॅंका सहसा दीर्घ मुदत आणि अल्प मुदतीचे कर्ज देतात. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला कोणते योग्य आहे. हे ठरवणे आवश्यक आहे.
दीर्घ मुदतीसाठी कर्ज
तुम्ही जर दीर्घ मुदतीसाठी कर्ज घेत असल्यास, तुम्हाला 5 वर्षांपेक्षा जास्त अवधी दिला जातो आणि जास्तीतजास्त 30 वर्षापर्यंत तुम्ही कर्ज फेडू शकता. तुम्हाला लोन फेडायला बराच अवधी मिळतो, त्यामुळे त्याचा व्याजदरही कमीच असतो. तुमच्या EMI ची संख्या वाढल्याने तुमचा हप्ता कमी असतो. मात्र, त्यावर अधिक व्याज भरावे लागते. तसेच, कर्जाची मुदत जास्त असल्याने रक्कमही जास्त असते. म्हणूनच, बँक कर्जाची रक्कम मंजूर करण्यापूर्वी तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि इतरही महत्वाच्या बाबी तपासते, त्या त्यांना ठीक वाटल्यास, बॅंक पुढची प्रक्रिया सुरू करते. त्यामुळे कर्ज भेटायला तुम्हाला वाट पाहावी लागू शकते.
अल्प मुदतीसाठी कर्ज
अल्प मुदतीसाठी कर्ज घेत असल्यास, तुम्हाला ते 5 वर्षाच्या आतच फेडावे लागते. तुमची मुदत कमी असल्याने, बॅंक तुमच्याकडून जास्त व्याजदर आकारते. तसेच, कर्ज अल्प मुदतीचे असल्याने तुम्हाला EMI चा हप्ता हा जास्त रकमेचा भरावा लागतो. मात्र, कर्जावर लागणाऱ्या एकूण व्याजात तुम्ही बचत करू शकता. याचबरोबर तुमचे कर्ज अल्प मुदतीचे असल्याने, मिळणारी रक्कम कमी असते. त्यामुळे लगेच तुमच्या कर्जाला मंजूरी मिळू शकते. त्यामुळे अर्ज केल्यानंतर काहीच दिवसांत तुम्हाला कर्ज मिळू शकते.
कोणत्या मुदतीचे लोन घेणे योग्य ठरू शकते?
गृहकर्ज घेताना हेच योग्य आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण, प्रत्येक व्यक्तीची हप्ते फेडण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे घर खर्चासाठी किती पैसे लागतात, इतर कोणते खर्च आहेत या बाबी ध्यानात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीचे कर्ज हे व्यक्तीच्या क्षमतेवर अवलंबून आहेत. पण, अल्प व दीर्घ मुदतीत कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे समजून घेऊन आणि तुमची आर्थिक परिस्थिती पाहून तुम्ही कोणते कर्ज तुमच्यासाठी योग्य आहे हे ठरवू शकता.