स्वत:ला प्रश्न विचारा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना काही प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे. कंपनीचा पाया मजबूत आहे की नाही? कंपनीचे भवितव्य काय आहे? म्हणजेच एखादी कंपनी उत्पादन करत असेल, सेवा प्रदान करत असेल तर त्याचे भविष्य कसे असेल? कंपनी आपल्या उद्योगात आघाडीवर आहे की नाही? कंपनी नवीन काय करत आहे. कंपनीवर कर्ज किती आहे? कंपनीची कर्ज फेडण्याची क्षमता आहे की नाही? कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे? कंपनीची कामगिरी कशी आहे? कंपनीची मागील तिमाही-सहामाहीतील तसेच वर्ष-दोन वर्षातील कामगिरी कशी राहिली आहे? कंपनीचे बोनस देण्याबाबतचे धोरण कसे आहे? त्याचा रेशो कसा आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर निर्धोकपणाने अशा कंपनीच्या समभागांची खरेदी करायला हरकत नाही.
याखेरीज P/E Ratio (Price to Earnings Ratio) हा निकषदेखील शेअर खरेदी करताना तपासावा. P/E Ratio म्हणजे शेअरची बाजारात असणारी किंमत (मार्केट प्राईस) भागिले शेअरची मिळकत. यातील मिळकत किती हे समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी कंपनीचा शुद्ध नफा किंवा नेट प्रॉफिट भागिले कंपनीने इश्यू केलेले शेअर्स असे गणित करुन पहावे. सामान्यतः शेअरचा बाजारातील भाव वाढत जातो तसतसा P/E Ratio वाढत जातो. बरेच जण याला भुलण्याची शक्यता असते. पण तसे करु नका. कारण P/E Ratio 25 ते 30 पेक्षा अधिक झाला की त्या शेअरमध्ये नफा-वसुली सुरू होते, असे ढोबळमानाने दिसून आले आहे. त्यामुळे P/E Ratio अधिक असताना आपण तो समभाग खरेदी केल्यास काही काळासाठी त्याचा भाव गडगडू शकतो. त्यामुळे P/E Ratio 18 ते 20 च्या दरम्यान आल्यास सदर समभागात गुंतवणूक करायला हवी.
सध्या टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys), एचडीएफी बँक (HDFC Bank) आदी कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. येणार्या काळात अन्यही अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. या निकालांचे अवलोकन कसे करावे हे अनेकांना समजत नाही. सामान्यतः कंपनीला मागील तिमाहीपेक्षा आताच्या तिमाहीत झालेला एकूण फायदा किती आहे. सर्व टॅक्स वजा करुन झालेला फायदा किती, मार्जिन किती आहे. कंपनीने लाभांश किती जाहीर केला आहे, यानुसार तो निकाल चांगला किंवा वाईट ठरवावे.
गेल्या काही महिन्यांमध्ये यासंदर्भात एक गोष्ट निरीक्षणास आली आहे. ती म्हणजे कंपन्यांचे तिमाही निकाल जवळ आले की चांगल्या कंपन्यांच्या समभागांच्या भावांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते आणि त्यांचे भाव वाढतात. विशेषतः संस्थागत गुंतवणूकदार अशा शेअर्सची अधिक खरेदी करतात. भाव वाढले की सामान्य गुंतवणूकदारही त्यामध्ये गुंतवणूक करतो. पण निकाल लागल्यानंतर भलेही तो शेअर चांगला असला तरी त्यात नफावसुली केली जाते. परिणामी भाव गडगडू लागतो. अशा वेळी आपल्यासमोर दोन पर्याय उरतात. एक म्हणजे आपणही खरेदी केलेल्या भावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यास नफावसुली करुन मोकळे होणे किंवा दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली असल्यास जराही विचलित न होणे.
याखेरीज शेअर्स खरेदी करताना बातम्यांवरही लक्ष असणे गरजेचे असते. एखाद्या कंपनीविषयी किंवा क्षेत्राविषयी नकारात्मक बातमी आल्यास त्याचा परिणाम म्हणून त्या शेअर्सचे भाव गडगडतात. नेमक्या अशाच वेळी आपण त्यात गुंतवणूक केली असेल तर ती काही काळासाठी अडकून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अभ्यासपूर्णता आणि चौकसपणा या गोष्टी शेअर खरेदी करताना गरजेच्याच असतात हे लक्षात घ्या.