आपण थिएटरमध्ये किंवा मल्टीप्लेक्समध्ये तिकीट काढून चित्रपट पहायला जातो तेव्हा त्या तिकीटावर करमणूक कर आकारण्यात येतो. पूर्वी करमणूक कर (Entertainment Tax) आणि आता वस्तू आणि सेवा कर (GST) आकारला जातो. पण काही चित्रपटांना या करातून सवलत देण्यात येते. तेव्हा सिनेमा टॅक्स फ्री (Tax Free) झाला असे म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का सिनेमा करमुक्त का करतात? सिनेमा करमुक्त करण्यामागील सरकारचा कोणता हेतू असतो? सिनेमा करमुक्त झाल्यास त्याचा फायदा कोणाला होतो? जाणून घेऊया यामागची आर्थिक गणित.
Table of contents [Show]
सिनेमा टॅक्स फ्री करण्याचे कोणते निकष आहेत?
देशात सिनेमा टॅक्स फ्री करण्याचे असे कोणतेही विशिष्ट निकष नाहीत. सामाजिक संदेश देणाऱ्या आणि प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावर आधारित बनवण्यात आलेले सिनेमे टॅक्स फ्री केले जातात. सिनेमावर आकारण्यात येणारा करमणूक कर हा राज्य सरकार गोळा करत असते. एखादा सिनेमा करमुक्त करावा किंवा नाही हे ठरविण्याचा निर्णय राज्य सरकार घेते. याबाबत केंद्र सरकार राज्यांना आवाहन करु शकते.
भारतात अशाप्रकारे होतो करमणूक कराचा हिशेब
सामान्यपणे सिनेमागृहाचे मालक आणि निर्माते हे सिनेमांच्या तिकीटांमधून करमणूक कर वसूल करुन तो सरकारला देतात. पण काही सिनेमांवर आकारण्यात येणारा करमणूक कर हा राज्य सरकारकडून माफ केला जातो. सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पहावा हा उद्देश त्यामागे असतो. जीएसटी येण्यापूर्वी सिनेमांच्या तिकीटांवर 40% करमणूक कर आकारण्यात येत असे. पण आता जीएसटी आल्यानंतर सर्व भाषिक सिनेमांना सारखाच करमणूक कर आकारण्यात येतो. सुरूवातीला जीएसटी आला तेव्हा सिनेमांच्या तिकीटांवर 28% करमणूक कर आकारण्यात येत होता. मात्र आता 100 रुपयांपर्यंतच्या तिकीटांवर 12% आणि त्यापुढील तिकीटांसाठी 18% जीएसटी निश्चित करण्यात आला आहे.
सिनेमागृहाच्या मालकांना होतो फायदा
करमणूक करातून सूट मिळण्याचा फायदा सिनेमागृहाच्या मालकांना होतो. समजा एका सिनेमाचे तिकीट करमणूक कर धरून 130 रूपये आहे. तर त्यातील काही रक्कम म्हणजे 15 रूपये सरकारला द्यावे लागतात. करमणूक कर माफ झाल्याने सिनेमागृहचालकांना हा करमणूक कर सरकारला द्यावा लागत नाही. अशावेळी सिनेमाच्या तिकीटांच्या किंमती कमी होणे अपेक्षित असते. पण अनेकदा तसे होताना दिसत नाही. त्यामुळे सिनेमा करमुक्त होण्याचा कोणताही फायदा प्रेक्षकांना होत नाही.
आतापर्यंत हे चित्रपट झाले Tax Free
आजपर्यंत अनेक चित्रपट करमुक्त करण्यात आले. यामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’, ‘तानाजी’, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’, ‘छपाक’, ‘पॅड मॅन’, ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’, ‘हिंदी मिडीयम’, ‘सचिन – अ बिलीयन ड्रीम्स’, ‘दंगल’, ‘नीरजा’, ‘सरबजीत’, ‘एअरलिफ्ट’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मांझी – द माउंटन मॅन’, ‘मेरी कोम’ हे बॉलिवूड चित्रपट करमुक्त करण्यात आले.