Wheat Price Hike: मागील 6 महिन्यात गव्हाच्या किंमती उच्चांकावर पोहचल्या आहेत. मागणीनुसार बाजारात गव्हाचा पुरवठा होत नसल्याने दरवाढ झाली आहे. मागील दोन वर्षांपासून रब्बी हंगामात उष्णतेच्या लाटा, वादळ, गारपीटीमुळे गहू पिकाचे नुकसान झाले आणि उत्पादन रोडावले. तसेच पावसामुळे तयार गव्हाचा दर्जाही खालावला आहे.
आयात शुल्क कपातीचा विचार
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव, त्यानंतर दसरा आणि दिवाळी दरम्यान गव्हाच्या किंमती चढ्या राहिल्यास महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे. गव्हापासून तयार होणारे पदार्थही महाग होतील. (Wheat Price Hike) दरम्यान, गहू आयातीवरील 40% शुल्क कपात करण्याचा विचार सरकार करत आहे. तसेच व्यापाऱ्यांना साठवणुकीवर मर्यादा घालण्याचाही विचार सुरू आहे.
मध्यप्रदेश, पंजाब आणि हरियाणा गहू उत्पादनात आघाडीवर आहेत. या राज्यातून होणारा गव्हाचा पुरवठा जवळजवळ थांबला आहे. फ्लोअर मिल मालकांना गव्हाचा पुरेसा पुरवठा होत नाही, अशी माहिती दिल्लीतील व्यापाऱ्यांनी दिली. इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
किती टक्क्यांनी गव्हाच्या किंमती वाढल्या?
गव्हाच्या किंमती प्रति मेट्रिक टनामागे सुमारे 18 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर मागील चार महिन्यात किरकोळ बाजारात गव्हाच्या किंमती 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सणासुदीच्या काळात गव्हाचा तुटवडा होऊ नये म्हणून सरकारी गोदामातून गहू विक्रीसाठी बाहेर काढवा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, मागील 2 रब्बी हंगामात गव्हाचे पुरेसे उत्पादन झाले नसल्याने सरकारी गोदामातील गहू लवकरच बाहेर काढण्याची वेळ आली आहे.
आयात केल्यावर दरवाढ कमी होणार?
किरकोळ बाजारातील गव्हाचे दर खाली आणण्यासाठी गहू आयात करावा लागेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 2022 सालातील रब्बी हंगामात 107.7 मिलियन मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन झाले होते. तर 2023 सालातील रब्बी हंगामात 112.74 मिलियन मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन झाले. मात्र, तरीही बाजारातील मागणी पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. भारताला दरवर्षी 108 मिलियन मेट्रिक टन गहू दरवर्षी लागतो.