वॉट्सअॅप पे (Whatsapp Pay) या मेटाकडे (Meta) मालकी असलेल्या कंपनीतून मागच्या दोन वर्षांत मोद्या पदावरच्या अनेकांनी राजीनामा दिलाय. यात नवीन नाव जोडलं गेलंय ते म्हणजे वॉट्सअॅप पे चे भारतातले प्रमुख विजय चोलेटी (Vijay Chholeti). विशेष म्हणजे चोलेटी यांनी फक्त चार महिने या कंपनीत काम केलं.
‘डिजिटल पेमेंट आणि भारतीय बाजारपेठेत ही संकल्पना रुजवण्यात वॉट्सअॅप पेमेंटचा मोठा वाटा असेल, असं मला ठामपणे वाटतं. त्यामुळे मी दुसरीकडे जात असताना वॉट्सअॅप मात्र या क्षेत्रात अपेक्षित प्रगती करतच असेल याचा विश्वास आहे,’ असं चोलेटी यांनी लिंक्ड-इन (LinkedIn) वर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने (NPCI) नोव्हेंबर 2020मध्ये वॉट्सअॅपला पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर डिजिटल पेमेंट क्षेत्रात अजून कंपनीचा म्हणावा तसा जम बसलेला नाही. पण, संदेशांची देवाण घेवाण करण्यासाठी वॉट्सअॅपचा वापर मात्र जगभर होतो.
मधल्या काळात मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी मेटामध्ये जगभरात 11,000 नोकर कपात करणार असल्याचं सुतोवाच केलं. आणि तेव्हापासून कंपनीतलं वातावरण बदललंय. मेटा कंपनीचे भारतातले प्रमुख अजित मोहन यांनी सर्वात आधी राजीनामा दिला. त्यानंतर वॉट्सअॅपचे भारतातले प्रमुख अभिजीत बोस यांनीही तीच वाट धरली. पाठोपाठ मेटाच्या पब्लिक ग्राहक विषयक धोरण विभागाचे संचालक राजीव अगरवाल यांनीही तोच मार्ग स्वीकारला.
या सगळ्यांनी बाहेरच्या कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळत असल्याचं कारण देत मेटा कंपनी सोडली. आणि मेटा इंडिया कंपनीने यावर कधीही मीडिया प्रतिक्रिया दिली नाही.
विजय चेलोटी हे अॅमेझॉन पे मधून वॉट्सअॅप पेमध्ये आले होते. तिथल्या लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवहारांची जबाबदारी त्यांच्यावर होती. खरंतर वॉट्सअॅप आपल्या पेमेंट सेवेचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांत आहे. असं असताना चेलोटी यांनी कंपनी सोडून जाण्याचा निर्णय आश्चर्यकारक मानला जातोय. चेलोटी यांनी व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम इंडियन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (IIM) इथून पूर्ण केला आहे.
NPCIने वॉट्सअॅपला पेमेंट सेवा सुरू करायला परवानगी दिली. पण, त्यांना 20,00,0000 ग्राहकांची मर्यादाही घालून दिली. ही मर्यादा यावर्षी एप्रिल महिन्यात वाढवून 100,00,0000 (100 दशलक्ष) करण्यात आली.
वॉट्सअॅप पुरतं बोलायचं झालं तर कंपनीचे भारतात 487 दशलक्ष ग्राहक आहेत. कंपनीचं बिझिनेस अकाऊंट असलेले 15 दशलक्ष ग्राहक आहेत. आणि बिझिनेस अकाऊंटची संख्या येणाऱ्या दिवसांमध्ये वाढून हा महसूल 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाईल असा कंपनीचा अंदाज आहे.
अलीकडेच कंपनीने रिटेल क्षेत्रात उतरण्यासाठी रिलायन्स जिओमार्ट सोबत एक करार केला.
वॉट्सअॅप, फेसबुक तसंच इन्स्टाग्राम या तीन सोशल मीडिया कंपन्यांची मालकी मेटाकडे आहे. आणि कंपनीला भारतातून मोठा महसूल मिळतो. 2021मध्ये फेसबुकच्या एकूण महसूलापैकी 74% महसूल भारतातून आला. तर नुसत्या जाहिरातींमधून कंपनीला भारतातून 16,189 कोटी रुपये मिळाले.
असं असताना कंपनीतून मोठ्या पदावरचे लोक सोडून जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.