डिजिटली सर्वच क्षेत्रात भारत प्रगतीच्या शिखरावर पोहचला आहे. कारण, सर्व सोयी-सुविधा मोबाईलवर मिळत असल्याने लोक त्याचा वापर करण्यात मश्गूल आहेत. यासाठी उपलब्ध असलेले डेटा पॅक आणि बजेटमध्ये मिळणारे मोबाईल लोकांना परवडणारे आहेत. याचबरोबर आर्थिक व्यवहार असो किंवा चॅटींग सर्व मोबाईलवरच होत असल्याने, यातील जास्त वापर होणाऱ्या गोष्टी स्कॅमर्सनी हेरल्या आहेत. मुख्यता हे स्कॅमर्स फेसबुक (Facebook) आणि व्हाट्सअॅप (WhatsApp) वापरणाऱ्या युझर्सला टार्गेट करून त्यांची पर्सनल माहिती चोरून त्यांना व त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांना तातडीची गरज असल्याचे सांगून पैसे लाटत आहेत. असाच एक स्कॅम कोलकाता शहरात घडला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिल्याची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
पोलिसांनी राबवली मोहिम
कोलकाता शहरात झालेल्या फसवणुकीचा प्रकार सामान्यांना समजावा या उद्देशाने कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावर मोहिम राबवून नागरिकांना या स्कॅमपासून बचाव करण्याचा व सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॅमर्सनी या स्कॅमसाठी योगा दिनाचा वापर केला आणि त्यांनी टार्गेट केलेल्या लोकांना मोफत योगा सेशनची लिंक व्हाट्सअॅपवर पाठवली. ज्या लोकांनी लिंकवर क्लिक केलं त्यांना 6 अंकी ओटीपी (OTP) मागितल्या गेला. एकदा स्कॅमर्सना ओटीपी मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या व्हाट्सअॅप खात्यावर प्रवेश मिळवला. मग स्कॅमर्सने नंबर्स चोरून त्यांना व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना इमर्जन्सीचा बहाना देऊन पैसे लाटले.
अशा पद्धतीचे प्रकरण समोर आल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच, कोणत्याही अनोळखी नंबरवरून मॅसेज आल्यास, त्यात काही गडबड वाटल्यास, त्वरित व्हाट्सअॅपवर तक्रार करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
स्कॅमपासून वाचायचं कसं?
व्हाट्सअॅप किंवा SMS वर आलेल्या कुठल्याही लिंकला प्रतिसाद देणं टाळावं. जर तुमच्या संपर्कातील कोणतीही व्यक्ती तुम्हाला पैसे मागत असल्यास, पैसे पाठवण्याआधी संबंधित व्यक्ती तिच आहे का हे पाहणे गरजेचं आहे. अशा वेळी तुम्ही पैसे मागणाऱ्या व्यक्तीला थेट व्हिडिओ काॅल किंवा व्हाॅईस काॅल करू शकता. त्यामुळे ती व्यक्ती ओळखीतली आहे की नाही हे समजायला मदत होईल. तसेच, कोणत्याही प्लॅटफाॅर्मवरून तुम्हाला ओटीपी (OTP) मागितल्यास तो देऊ नका. त्याविषयी लगेच संबंधित प्लॅटफाॅर्मवर तक्रार नोंदवा.