नवीन फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा बाळगून असणार्या लोकांना घराचा ताबा वेळेवर न मिळणे ही एक समस्या आहे. सर्व पैसे भरूनही काही वेळा बिल्डर ग्राहकांना फ्लॅट वेळेत देत नाहीत. विकसक नियोजित वेळेत घराचा ताबा देत नसेल तर महारेराकडे तक्रार करता येते. महारेराकडे https://maharerait.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावरून तक्रार दाखल करू शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर महारेराकडून तपासणी होते अणि बिल्डरकडे संबंधित तक्रारीविषयी विचारणा केली जाते. कालांतराने ग्राहकाची तक्रार प्रमाण मानून त्याविरोधात चौकशी करून संबंधित खरेदीदाराला फ्लॅटचा ताबा देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाते. यानंतरही बिल्डरकडून फ्लॅट देण्यास विलंब होत असेल तर ग्राहकाला त्याच्या अडकलेल्या पैशाच्या बदल्यात व्याज द्यावे लागते.
कर्जदाराचे त्वरित समाधान
तक्रार दाखल होताच महारेरा अशा ग्राहकांच्या समस्येकडे विशेष लक्ष देते. ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि भाड्याच्या घरात राहत असतील तर अशा ग्राहकाची महारेराकडून काळजी घेतली जाते. ग्राहकाचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी महारेरा पुढाकार घेते.
महारेराच्या आदेशाला आव्हान?
सरकारने तयार केलेले नियम हे ग्राहकांच्या हिताचे आहेत. परंतु या आदेशाला बिल्डर आव्हान देऊ शकतात. विकसक योग्य असेल आणि ग्राहकाला ताबा न देण्याचे कारण संयुक्तिक असेल तर रेराच्या आदेशाविरोधात बिल्डर हा रिअल इस्टेट अपिलीय ट्रिब्यूनलमध्ये आव्हान देऊ शकतो.
बिल्डरकडून फ्लॅटचा ताबा उशिरा मिळत असेल तर ती मालमत्ता दुसर्या व्यक्तीला विकण्याची चूक करू नये. कारण अशी मालमत्ता सहजासहजी विकली जात नाही. अर्थात अनेक बाबतीत बिल्डर घराची किंमत वाढवण्यासाठी विलंब लावतात. काही बिल्डर ग्राहकांचे पैसे परत करून अन्य ग्राहकाला तोच फ्लॅट जादा किंमतीत विकण्याचा प्रयत्न करतात.
ग्राहक मंचाचा पर्याय
बिल्डरकडून मालमत्ता वेळेत मिळत नसेल तर ग्राहक मंचाकडे देखील तक्रार करता येते. परंतु तेथे काही काळ वाट पहावी लागू शकते. त्यामुळे अगोदर ‘रेरा’कडे तक्रार करायला हवी. अनेक राज्यांत राज्यस्तरिय कंझ्यूमर फोरम काम करत आहेत. हे कन्झ्युमर फोरम ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाप्रमाणे काम करतात. यासंदर्भात आपण वकिलाशी चर्चा करू शकता.
महारेरा आणि ग्राहक मंचाकडील तक्रारीची प्रक्रिया सोपी आणि जलद झाल्याने ग्राहकांना लवकरात लवकर न्याय मिळण्याची शक्यता वाढली आहे.