भारतामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवास धोकादायक बनत चालल्याने ट्रॅव्हल विमा देखील गरजेचा बनला आहे. रेल्वे, विमानाने किंवा तुम्ही ओला राइड घेतानाही तुम्हाला अगदी कमी रकमेमध्ये प्रवास विमा मिळतो. मात्र, यामध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीने प्रवास विमा घेता येत नाही. तुम्ही जर सतत प्रवास करत असाल तर तुमच्या गरजेनुसार स्वतंत्र ट्रॅव्हल विमा खरेदी करू शकता. अनेक कंपन्यांकडून प्रवास विमा दिला जातो. भारतामध्ये किंवा भारताबाहेर प्रवास करताना असणाऱ्या जोखमीपासून तुम्हाला संरक्षण मिळते. ट्रॅव्हल विमा हा टर्म इन्शुरन्स आणि आरोग्य विमा पॉलिसीसाठी पर्यायी नाही. तर तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी गरजेचा आहे.
वैद्यकीय खर्च आणि वस्तू गहाळ झाल्यास
ट्रॅव्हल विमा खरेदी करताना वैद्यकीय खर्च आणि वस्तू गहाळ झाल्यास त्यापासून संरक्षण आहे की, नाही हे नक्की तपासून घ्या. किती रकमेचे संरक्षण तुम्हाला गरजेचे आहे, त्याचा नीट विचार करा. कारण, जेवढे जास्त संरक्षण तेवढाचा प्रिमियमही जास्त असेल. अनेक विमा कंपन्या, प्रवासास उशीर, रेल्वे किंवा विमानाची ट्रिप रद्द होणे, सामान उशीरा मिळणे, गहाळ होणे, प्रवासात येणाऱ्या इतर अडचणी यांपासून संरक्षण देतात. वैद्यकीय खर्चामध्ये रुग्णवाहिकेसाठी होणारा खर्चाचाही समावेश असतो. यापैकी कोणत्या गोष्टींचा समावेश आहे आणि कशाचा नाही हे व्यवस्थित पाहून घ्या.
आंतरराष्ट्रीय प्रवासाचा समावेश आहे का?
प्रवास विमा खरेदी करताना तुमच्या पॉलिसीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा समावेश आहे का? हे तपासून घ्या. कारण, जर परदेश प्रवासाचा समावेश नसेल तर तुम्ही दुसरी पॉलिसी घेऊ शकता, ज्यात आंतरराष्ट्रीय प्रवासाचा समावेश आहे. कारण, सर्वात जास्त जोखीम परदेश प्रवासात असते. विमान तिकिटाचा खर्चही मोठा असतो. त्यामुळे जर फ्लाईटला उशीर झाला किंवा रद्द झाली तर तुम्ही दावा करू शकता. अनेक आरोग्य विमा पॉलिसी परदेशात लागू होत नाहीत. त्यानुसार तुमची प्रवास विमा परदेश प्रवासासाठी लागू आहे की नाही, हे तपासून घ्या. काही देशांत प्रवास करताना पासपोर्ट सोबत प्रवास विमा अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला विमा काढावाच लागेल.
संपूर्ण कुटुंबासाठी वार्षिक विमा योजना -
ट्रॅव्हल इन्शुरन्स तुम्ही वैयक्तिक किंवा तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी घेवू शकता. फक्त एका बाजूचा किंवा येणे आणि जाणे अशा दोन्हीही प्रवासासाठी संरक्षण मिळते. टाटा एआयजी, बजाज, एजडीएफसी, अपोलो म्युनिच, रेलिगेअर अशा अनेक कंपन्यांचे ट्रॅ्व्हल प्लॅन उपलब्ध आहेत.