महाराष्ट्र राज्याला वैशिष्ट्यपूर्ण भूगोल आहे आणि तितकाच गौरवशाली इतिहास आहे. 1960 रोजी अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्याने देशाला दिशा दिली आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशनंतर क्षेत्रफळाच्यादृष्टिने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. याचबरोबर महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रासह (industrialization in maharashtra), शेती, सहकार आदी क्षेत्रात अव्वल राहण्याचा मान मिळवला आहे. पण गेल्या काही वर्षांत या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर पडतोय की काय? असे चित्र दिसू लागले आहे.
उद्योग उभारणीच्या क्षेत्रात महाराष्ट्रासमोर इतर राज्यांनी मोठं आव्हान उभं केलंय. गेल्या 60 वर्षांचा काळ पाहता महाराष्ट्र हे देशात उद्योग-धंदे उभारणीत, सहकार क्षेत्रात आघाडीचे राज्य होते. अनेक राज्यांनी महाराष्ट्राचा कित्ता गिरवला. पण आता त्याच गोष्टीत महाराष्ट्र मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत देशातील नामांकित उद्योगांना आपल्या राज्यात बोलावण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. अधिकाधिक सोयीसुविधा देऊन, प्रशासकीय लालफितीचा कारभार कमी करून कंपन्यांना त्वरित परवानगी देण्यासाठी राज्यांची चढाओढ सुरू झाली आहे. या चढाओढीत महाराष्ट्र राज्य दुय्यम स्थानावर गेलं आहे.
उद्योजक आणि कंपन्यांना आपलंसं करून घेण्यास कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, गुजरात, पंजाब, हरियाणा हे राज्यं पहिल्या क्रमांकावर आहेत. तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा ही राज्यं दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान, आसाम ही राज्यं तिसऱ्या तर बिहार, जम्मू-काश्मीर, सिक्किम, अरूणाचल प्रदेश, मिझारोम, मणिपूर ही राज्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी झगडत आहेत.
महाराष्ट्रातील उद्योग
औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे आतापर्यंत देशातील अव्वल राज्य म्हणून गणलं जात होतं. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृषी-औद्योगिक रचनेचा पाया घालून दिला. राज्याचा विकास करण्याकरिता उद्योजकांना/कंपनी मालकांना पायाभूत सुविधा उभ्या करून देण्यावर भर दिला. त्याच आधारावर मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आदी शहरांमध्ये उद्योग उभे राहिले. पण आता हा काळ लोटला असून महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नवीन कंपन्या इथे येत नसल्याचे दिसून येत आहे.
देशातील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम राखणे हे राज्यापुढे मोठे आव्हान असणार आहे. राज्यात अधिकाधिक उद्योगधंदे निर्माण करून रोजगाराच्या संधी निर्माण करणं, जुन्या उद्योगांना आधार देऊन त्यांच्यासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यावर भर द्यावा लागणार आहे.