Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sim Card Swap Fraud: ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ नक्की आहे तरी काय? त्यापासून कसं वाचता येईल?

Sim Card Swap Fraud

Sim Card Swap Fraud: दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशातच सिम कार्ड स्वॅप फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पण हा 'सिम कार्ड स्वॅप फ्रॉड' नक्की आहे तरी काय? त्यापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे जाणून घेऊयात.

सध्या वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे घडताना दिसत आहेत. आपल्या छोट्याशा चुकीमुळे काही क्षणात बँकेच्या खात्यातील रक्कम क्षणार्धात खाली झाल्याच्या घटना पाहायला किंवा ऐकायला मिळत आहेत. हल्ली आपला मोबाईल नंबर अनेक ठिकाणी आपण कळत-नकळत अनेक गोष्टींना लिंक केलेला असतो. याच नंबरवरून आपण बँकेचे आर्थिक व्यवहार देखील करतो. सध्या ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ या प्रकारातील सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पण ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ हा प्रकार नक्की काय आहे, हे सर्वप्रथम समजून घेऊ.

सिम कार्ड स्वॅप फ्रॉड काय आहे?

आपल्या सर्वांच्याच मोबाईल फोनमध्ये कॉलिंगसाठी सिम कार्डचा वापर केला जातो. आपला हाच मोबाईल नंबर बँक खात्याशीही लिंक केलेला असतो. ज्यामुळे आपल्याला बँकेचे आर्थिक व्यवहार घरबसल्याही सहज करता येतात. पण याच सिम कार्डचा गैरवापर करून आपले बँक खाते रिकामे केले जाते. या प्रकाराला ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ (SIM Card Swap Fraud) असे म्हटले जाते. आता तो कसा केला जातो, ते समजून घेऊयात.

सुरुवातीला हॅकर आपली वैयक्तिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते त्या व्यक्तीला कॉल, मेसेज, वेगवेगळ्या सेलच्या ऑफर्स, लिंक्स फॉरवर्ड  करतात. ज्याला आकर्षित होऊन ती व्यक्ती त्याची बेसिक माहिती हॅकरला देते. बऱ्याच वेळा हॅकरने दाखवलेल्या प्रलोभनाला लोक बळी पडतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती, बँकेचे तपशील हॅकरला देतात.

या स्वरूपातील सायबर गुन्हे करण्यासाठी हॅकरची एक टीम सक्रीय असते. ही टीम एकाच व्यक्तीला टार्गेट करते. एकदा का त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती मिळाली की, हॅकर सिम कार्ड ऑपरेटरकडून सेम नंबरचे खोटी कागदपत्रे दाखवून दुसरे सिम कार्ड खरेदी करतो.

त्यानंतर हॅकरने विकत घेतलेल्या सिम कार्डच्या क्रमांकावरून कनेक्शन सुरू केले जाते. यामुळे ज्या व्यक्तीचा तो मूळ क्रमांक असतो त्याच्या मोबाईलचे नेटवर्क अचानक बंद होते. यादरम्यान हॅकर त्या व्यक्तीच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेतो. पण याची कोणतीही कल्पना त्या व्यक्तीला नसते. कारण बँकेकडून येणारे सर्व मेसेज हे हॅकरच्या मोबाईल नंबरवर जात असतात. हा सर्व प्रकार ‘सिम कार्ड स्वाईप फ्रॉड’ या सायबर गुन्ह्या अंतर्गत येतो.

काय खबरदारी घ्यावी

  • मोबाईलवर आलेले मेसेज, कॉल किंवा कोणतीही लिंक पाठपुराव्याशिवाय ओपन करू नये.
  • अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मॅसेजवर आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.
  • सोशल मिडिया अकाऊंटवर वैयक्तिक माहिती शेअर करू नये. 
  • मोबाईलचे नेटवर्क अचानक बंद झाले की, सिमकार्ड ऑपरेटरशी संपर्क साधा. 
  • सिम कार्डचे नेटवर्क बंद झाल्यानंतर लगेच बँकेशी संपर्क साधून आर्थिक व्यवहार थोड्या काळासाठी बंद करा. 
  • तसेच महत्त्वाचे आर्थिक व्यवहार हे डिजिटल सुरक्षितता तपासूनच करावेत.
  • ई-मेलच्या माध्यमातून बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा आणि कोणताही गैरप्रकार आढळल्यास लगेच तक्रार करा.

तक्रार कुठे करता येते?

जर तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील इतर व्यक्ती सायबर गुन्ह्याची शिकार झाली असेल, तर तुम्ही 1930 या क्रमांकावर कॉल करू शकता किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर रितसर तक्रार नोंदवू शकता.