“ते” आपली आवड, घटकाभर विरंगुळा म्हणून आपल्या घरी येतात आणि मग आपल्या घरातीलच एक सदस्य बनून राहतात. “ते” आपल्या रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य अंग बनतात. कोणत्याही लिपीमध्ये लिहिता न येणारी भाषा ते त्यांच्या डोळ्यांतील भावांनी व्यक्त करतात आणि आपले उदगार, आवाज, उसासे, हास्य, रुदन “न बोलता-न ऐकताही” समजून घेतात. अलीकडेच संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या CoviD-काळामध्येही, जेव्हा माणूस माणसापासून लांब गेला होता, तेव्हा देखील “यांनीच” आपली सोबत केली होती. आपलं एवढं विश्व आनंदाने भरून टाकणाऱ्या आपल्या पेट्सची काळजी घेणे, हे आपले देखील कर्तव्य असतेच ना!
अशाच आपल्या पेट्सची, आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला तत्पर आणि सक्षम बनविणारा विशेष प्रकारचा इन्शुरन्स म्हणजे “पेट इन्शुरन्स” अर्थात “पाळीव प्राणी विमा”. आपल्या घरातील या मुक्या सदस्यांच्या मेडिकल आणि इतर आर्थिक कर्तव्यांमध्ये बाधा उत्पन्न होऊ नये, याकरिता आर्थिक संरक्षण पुरविणारा हा इन्शुरन्स आहे. पेट्सना वेळोवेळी द्यावे लागणार इंजेक्शन्स, त्यांचे वॅक्सीनेशन, त्यांचे ग्रूमिंग, त्याच्या व्याधींवर उपचार या सर्वांचा वार्षिक खर्चच सुमारे 10 हजारांपासून 50 ते 60 हजारांपर्यंत देखील असतो. याखेरीज पशुवैद्यकीय डॉक्टरची फी (वेटेरिनरी डॉक्टर), त्यानंतरचे वैद्यकीय उपचार आणि प्रसंगी ऑपरेशनचा होणार खर्च सर्वाधिक लक्षणीय आहेत. तेव्हा पेट इन्शुरन्स पॉलिसीच्या सहाय्याने, आपण आपल्या पाळीव प्राण्यांसंदर्भात उदभवणाऱ्या अनपेक्षित परिस्थितीत सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो.
पेट इन्शुरन्स पॉलिसीमुळे, आपल्या पाळीव प्राण्याचे आजारपण, शस्त्रक्रिया खर्च कव्हर, अपघात/रोगांमुळे मृत्यू, हॉस्पिटलायझेशन कव्हर, ओपीडी कव्हर, तसेच थर्ड पार्टीचे नुकसान, पेट्सचे हरविणे किंवा चोरीला जाणे सारख्या घटनांमुळे येऊ घातलेल्या आर्थिक संकटांपासून आपल्याला आर्थिक सुरक्षितता मिळते, आणि ती देखील फक्त एक लहान प्रीमियमची रक्कम भरून! “पेट इन्शुरन्स” हे सर्व (काही अपवाद वगळता) मेडिकल / नॉन-मेडिकल खर्च कव्हर करेल. मात्र याच बरोबर लक्षात ठेले पाहिजे की, ग्रूमिंगशी संबंधित अथवा दुखापतीशी संबंधित नसलेले कोणतेही कॉस्मेटिक ऑपरेशन असो किंवा जन्मजात दोष बरे करण्यासाठी केलेल्या किंवा गर्भधारणेमुळे / व्हेल्पिंगमुळे (whelping) केलेल्या शस्त्रक्रियांचा समावेश केला जात नाही.
आपण अगदी 2 वर्षांच्या वयोगटातील पाळीव प्राण्यांपासूनही “पेट इन्शुरन्स”चे संरक्षण खरेदी करू शकतो. “डॉग इन्शुरन्स” सारख्या पॉलिसीच्या सहाय्याने कुत्र्यांच्या बाबतीत, देशी, संकरित (hybrid) तसेच विदेशी कुत्र्यांसाठी कुत्र्याचा विमा खरेदी केला जाऊ शकतो. अर्थात पाळीव प्राण्याचे वय, जाती, आरोग्य, आकार आणि आपल्याला आवश्यक असणारे इन्शुरन्स कव्हर यांवर आपल्या “पेट इन्शुरन्स पॉलिसी”चा प्रीमियम निश्चित होत असतो. आणि पेट इन्शुरन्स पॉलिसी सर्वच खर्च कव्हर करते का? तर “नाही”. या पॉलिसीअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या काळजीसाठी संपूर्ण खर्च भरणे दुर्मिळ आहे. स्वस्त आणि सर्वोत्तम पेट इन्शुरन्स“ सामान्यतः 70%, 80% किंवा 90% अशी एखादी निश्चित टक्केवारी कव्हर करतो.
भारतामध्ये सामान्य विमा कंपन्या गेली अनेक वर्षांपासून गाई-म्हशी-शेळ्यांसारखी प्राणिसंपदा “पशुधन विमा”द्वारे संरक्षित करीत आल्या आहेत. अनेक प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या जनावरांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण देत आल्या आहेत. याचसोबत जगभरातील संक्रमण (infection), पाळीव पशुधनाची चोरी किंवा त्यांचे नुकसान यासारखे इतर अनेक खर्चांची देखील आर्थिक भरपाई करतात. न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड, गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड तसेच बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सारखे इन्शुरर्स पाळीव प्राण्यांसाठीचा इन्शुरन्स देणाऱ्या अग्रगण्य कंपन्या आहेत.