मार्च महिन्यातला शेवटचा आठवडा आहे. अजूनही तुम्हाला टॅक्स सेव्हिंगसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) हा एक उत्तम पर्याय आहे. भारतीय पोस्ट खात्यातील या योजनेबद्दल आज सविस्तरपणे जाणून घेऊ.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) : केंद्र सरकार देशातील प्रत्येक विभागासाठी विविध प्रकारच्या बचत योजना चालवते. यामध्ये गुंतवणुक केल्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. अशीच एका योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. जर तुम्हाला NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेच सहभागी होऊ शकता. नुकतात सरकारने 'एनएससी'च्या व्याजदरात वाढ केली आहे. डिसेंबर 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 6.8% व्याजदर दिला जात होता, तो आता 7% करण्यात आला आहे. चांगल्या रिटर्न्ससोबतच या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये टॅक्स सेव्हिंगचा (Tax Saving) फायदाही मिळू शकतो.
कर बचतीचा मिळेल लाभ (Benefit of Tax Savings)
मार्च महिना सुरू झाला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 शेवटच्या टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कर सूट मिळवायची असेल, तर ही शेवटची संधी आहे. 31 मार्च 2023 पूर्वी कर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अंतर्गत गुंतवणूकदारांना टॅक्स सेव्हिंग फायदा देखील मिळतो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीची मर्यादा? (Investment limit in NSC)
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या लहान स्वरूपाच्या बचत योजनेत फक्त 1,000 रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याच वेळी, या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. लोक या योजनेत FD पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात कारण यामुळे अनेक बँकांच्या FD पेक्षा व्याजदर अधिक असल्यामुळे जास्त परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन 1,000 पेक्षा जास्त रकमेचे प्रमाणपत्र खरेदी करू शकता. या योजनेत किमान 5 वर्षांचा लॉक इन पिरिएड आहे. त्यापूर्वी गुंतवणूक काढता येत नाही. 'रुल ऑफ 72' नुसार गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी 10 वर्ष 2 महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे.
NSC चे तीन प्रकार आहेत (Types of NSC)
तुम्ही या योजनेत वैयक्तिक गुंतवणूक करू शकता. अल्पवयीन मुलेही यामध्ये गुंतवणूक करू शकते. समजा तुमचा मुलगा 10 वर्षांचा असेल तर त्याच्या नावे एनएससीमध्ये गुंतवणूक करता येईल. पालक म्हणून तुम्ही त्याच्यावतीने गुंतवणूक करु शकता. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचे नावे गुंतवणूक होईल. त्याचवेळी तीन व्यक्ती एकत्रपणे एनएससीमध्ये जॉइंट अकाऊंट सुरु करुन गुंतवणूक करु शकतात.