Money Laundering: काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेचा ढोबळमानाने मनी लाँड्रिंगचा असा अर्थ होतो. अंमली पदार्थांचा व्यापार, लाच, कर चुकवून कमावलेला पैसा, बेकायदेशीर वस्तुंचा व्यापार यासह इतरही अनेक गैरमार्गानं कमावलेला पैसा अर्थव्यवस्थेत आणण्याची प्रक्रिया म्हणजे मनी लाँड्रिंग होय. मनी लाँड्रिंग करण्यासाठी अनेक युक्त्या गुन्हेगारांकडून वापरल्या जातात.
काळा पैसा पांढरा करण्याची प्रक्रिया
जसे की, बनावट कंपन्यांद्वारे पैसा देशाबाहेर पाठवणे, परदेशी बनावट कंपन्यांमध्ये गुंतवणे, परत त्याच कंपन्यांमधून पैसा अर्थव्यवस्थेमध्ये व्हाइट करून माघारी आणणे. कर बुडवून कमावलेला पैसा परदेशातील उद्योगांमध्ये गुंतवणे किंवा वैयक्तिक लाभासाठी वापरणे, अशा अनेक प्रकारांचा यामध्ये समावेश होतो. सध्या भारतातील काही उद्योगपतींवर मनी लाँड्रिंग कायद्याखाली खटला सुरू आहे.
ब्लॅक मनीचा स्रोत लपवण्याचा प्रयत्न
मनी लाँड्रिगचा मुख्य उद्देश म्हणजे काळ्या पैशाचा स्रोत लपवून पैसा पांढरा करणे होय. नक्की पैसा कोणत्या मार्गाने आला आणि कोठे गेला यात कोणतीही लिंक लागू नये यासाठी पैसे अनेक मार्गांनी इकडून तिकडे फिरवले जातात. सरकार आणि कर विभागाला नक्की पैसे कोठून आले हे समजत नाही. दहशतवादी कारवाया, अमली पदार्थ, जुगार, भ्रष्टाचार, खंडणी अशा गैर मार्गाने कमावलेला पैसा पांढरा करून अर्थव्यवस्थेत पुन्हा आणला जातो.
मनी लाँड्रिंगमधील तीन टप्पे कोणते? (Money laundering stages)
प्लेसमेंट
मनी लाँड्रिंग करताना पहिला टप्पा प्लेसमेंट हा आहे. आर्थिक गुन्हेगारांसाठी ही पहिली पायरी सर्वात धोकादायक असते. कारण, काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी वैध मार्गाने व्यवहार केले जातात. जसे की कॅशद्वारे खरेदीचे व्यवहार किंवा गुंतवणूक केली जाते. तसेच एकापेक्षा जास्त बँक खात्यांमध्ये विभागून पैसे पाठवले जातात. त्यामुळे सरकारला किंवा कर विभागाला संशय येणार नाही. विविध बनावट खात्यांचा वापरही त्यासाठी केला जातो.
अर्थव्यवस्थेच्या ज्या क्षेत्रावर सरकारची बारकाईने नजर नसते किंवा व्यवहारात संदिग्धता असते अशा ठिकाणी हे पैसे लावले जातात. कॅश किंवा सोन्याच्या स्वरुपात पैसे परदेशात गैरमार्गाने पाठवले जातात. हे पैसेनंतर तेथील बँकामध्ये, उद्योगांमध्ये गुंतवले जातात. अनेक वेळा कायदेशीर कर्ज घेऊन गैरमार्गाने कमावलेल्या पैशाने कर्जाची परतफेडही केली जाते. ब्लॅकमनी मार्गी लावण्याचे असंख्य प्रकार आहेत.
लेयरिंग
मनी लाँड्रिंग मधील दुसरा टप्पा म्हणजे लेयरिंग होय. लेरयिंगचा सोपा अर्थ म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा इक़डून तिकडे व्यवहार करून पैशांचा खरा स्रोत लपवणे होय. एकदा हा पैसा बँकेत किंवा इतर कोणत्याही वैध पर्यायात आला की तेथून या पैशाद्वारे अनेक व्यवहार केले जातात. एकापेक्षा जास्त व्यवहार केल्याने सरकारला किंवा कर विभागाला या पैशाचा स्रोत समजून येत नाही.
डिजिटल बँकिंगद्वारे अनेक व्यवहार करणे. शेल कंपन्यांद्वारे परदेशात पैसा पाठवला जातो. किंवा ज्या देशात नियम कठोर नाहीत अशा देशात शेल कंपन्या स्थापन करणे. शेल कंपनी म्हणजे अशी कंपनी जी कोणत्याही बिझनेस करत नसते. ती बंद पडलेल्या अवस्थेतच असते. मात्र, या कंपनीद्वारे आर्थिक व्यवहार दाखवले जातात. अशा कंपन्या परदेशात असल्याने सरकारला व्यवहारांची माहितीही मिळत नाही.
इंटिग्रेशन
मनी लाँड्रिगमधील शेवटचा टप्पा म्हणजे इंटिग्रेशन होय. विविध मार्गांनी फिरवलेला पैसा शेवटी वैध पर्यायांमध्ये गुंतवला जातो. जसे की, कंपन्यांसाठी भांडवल, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट बिझनेस, मालमत्ता खरेदी, स्वत:च्या व्यवसायामध्येही गुंतवला जातो. तिसऱ्या टप्प्यात गैर मार्गाने कमावलेला ब्लॅक मनी पूर्णपणे व्हाईट होऊन अर्थव्यवस्थेत येतो. सरकारला याची माहिती लागत नाही. या पद्धतीने मनी लाँड्रिंगचा उद्देश सफल होतो.