Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

काय आहे झुनझुनवालांचा शेअर मंत्र!

काय आहे झुनझुनवालांचा शेअर मंत्र!

भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि बिगबूल या नावाने ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला ह्यांच्या टीप्सची अंमबजावणी तुम्ही ही करू शकता

शेअर बाजारात पैशाचा पाऊस पडतो, असे म्हणतात. कोणी या पावसात चिंब भिजतं तर कोणी वाहून जातं. सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हा बाजार प्रत्यक्षात इतका गुंतागुंतीचा आहे की ते समजून घेण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळेच बाजारातील दिग्गज मंडळींचा सल्ला नेहमीच मोलाचा मानला जातो. म्हणून तज्ज्ञांचे म्हणणे ऐकायला हवे आणि त्यानुसार रणनिती आखली पाहिजे.

भारतीय शेअरबाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि बिग बूल या नावाने ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला हे त्यापैकीच एक. त्यांच्या टिप्सची अंमलबजावणी करुन अनेक मंडळींनी पैसा कमावला आहे. आपणही नवीन गुंतवणूकदार असाल आणि शेअर ट्रेडिंगची हौस असेल तर झुनझुनवाला यांचा कमाईचा शेअर मंत्र देखील मोलाचा ठरु शकतो. झुनझुनवाला यांनी बाजारातून कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यांनी नेहमीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये सिझन आणि सेंटीमेंटनुसार बदल केला आहे. त्यांच्या बदलाला देखील बाजारात मान्यता मिळाली आहे.

गुंतवणुकीला वेळ द्या: राकेश झुनझुनवाला यांनी नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. नव्याने गुंतवणूक करणाऱ्या मंडळींना त्यांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी, असा सल्ला देतात. कमी कालावधीत नफा मिळवण्यापेक्षा गुंतवणूक वाढण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. झुनझुनवाला यांच्या मते, बाजारात पैसा मॅच्युअर होण्यासाठी वेळ द्या. थोडी वाट पाहवी लागेल. चांगला परतावा नक्कीच मिळेल.

किंमत नाही कंपनीचे मूल्य पाहा: ते म्हणतात की, आपण गुंतवणूक करायची की नाही हे कंपनीच्या शेअरच्या किमतीवर ठरत नाही. याउलट कंपनीचे मूल्य अधिक महत्त्वाचे आहे. बहुतांश मंडळी अधिक किंमतीचे शेअर खरेदी करण्यास प्राधान्य ठेवतात. मात्र कंपनी कोणतीही असो, तिची मागील 1 ते 5 वर्षांची कामगिरी तपासायला हवी. कंपनीचे आउटलूक चांगले असेल तर शेअर बाजारात कितीही चढउतार आला तरी परतावा चांगला राहील.

अनुकरण टाळा : शेअर बाजारातील गुंतवणूक ही बँकेप्रमाणे नेहमीच सुरक्षित राहत नाही. मोठा परतावा देखील मोठी जोखीम मानली जाते. त्यामुळेच कंपनीची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. अन्य गुंतवणूकदार एखाद्या कंपनीत पैसा टाकत आहेत म्हणून तुम्ही त्यामागे धावू नका. बरेचदा अन्य गुंतवणूकदारांची नुकसान सोसण्याची क्षमता जास्त असू शकते. तुमची ती नसेल तर बसणारा फटका सर्व आर्थिक नियोजन कोलमडवणारा ठरतो.  

कॅश सरप्लस पहा: शेअर बाजारात एखादी कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर ती चांगला परतावा देईलच असे नाही. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी कंपनीची पार्श्वभूमी पाहणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित कंपनीने किती लांभाश दिला हे देखील तपासून पहावे. लाभांश हा शेअर बाजारात महत्त्वाचा मानला जातो. कंपनी जर दीर्घकाळ नियमित लाभांश देत असेल तर कंपनीकडे पैशाची कमतरता नाही, असे लक्षात येते. कॅश सरप्लस असणाऱ्या कंपन्या चांगली कामगिरी करु शकतात.

एकाच वेळी गुंतवणूक नको: आपल्याकडे गुंतवणुकीसाठी भरपूर पैसा आला तरी एकाचवेळी सर्व गुंतवणूक करु नये. गुंतवणूक टप्प्या टप्प्याने करावी, असे नियम सांगतो. हा नियम चांगला परतावा देतो. एखाद्या शेअरमध्ये पैसे टाकताना वेळ आणि गुंतवणुकीच्या रकमेचे विभाजन करा आणि वेळोवेळी खरेदी करत राहा. शेअर बाजारात घसरण असेल तर खरेदी सुरूच ठेवावी. कारण त्यामुळे आपल्या खरेदीची सरासरी कमी राहील.

कंपनीवरील कर्ज देखील पाहा: शेअर बाजारात कंपनीवरचे कर्ज पाहणे देखील महत्त्वाचे आहे. जर कर्ज कमी असेल तर खेळत्या भांडवलाचा दबाव राहणार नाही. मात्र कर्ज जास्त असेल तर कंपनीचे मूल्य घसरते. परिणामी कंपनीत चढउतार कधीही होऊ शकतो. गुंतवणूक करताना कर्जाच्या रक्कमेचा आढावा घ्यायला हवा.

IMAGE SOURCE - https://bit.ly/3OZtr2L