• 28 Nov, 2022 16:08

इन्शुरन्स म्हणजे काय? इन्शुरन्सचे किती प्रकार आहेत?

What is Insurance

What is Insurance : अन्न, वस्त्र, निवारा आणि ‘वायफाय’ इतकीच आज मूलभूत गरज आहे ती “इन्शुरन्सची”. पण मग हा इन्शुरन्स म्हणजेच “विमा” नक्की काय आहे? आणि इन्शुरन्स गरजेचा का आहे? हे आपण समजून घेणार आहोत.

‘Needing Insurance is like needing a parachute. If it isn’t there the first-time, chances are you won’t be needing it again.’ “मला इन्शुरन्सची गरज नाही” म्हणणे म्हणजे विमानातून emergency landing करताना पॅरॅशूटची गरज नाही, म्हणण्यासारखे. थोडक्यात अन्न, वस्त्र, निवारा आणि ‘वायफाय’ इतकीच आज मूलभूत गरज आहे ती “इन्शुरन्सची”. पण मग हा इन्शुरन्स म्हणजे “विमा” नक्की काय आहे ? आणि खरच इन्शुरन्स असणे अनिवार्य का झालयं? याचाच विचार आपण आजच्या संवादात करणार आहोत.

मानवी व्यवहाराचक्राबाबत सर्वात निश्चित पैलू म्हणजे भविष्यामध्ये होऊ घातलेल्या घटनांची अनिश्चितता. हीच अनिश्चितता जोखीम (Risk) तयार करते आणि त्यामधून निर्माण होतात ते धोके (hazards). या संभाव्य धोक्यांपासून होऊ शकणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्याचे काम करतो तो इन्शुरन्स अर्थात विमा. जोखीम व्यवस्थापन (Risk management) करत असतानाचे सर्वात महत्वाचे कवच म्हणजे इन्शुरन्स. इन्शुरन्स हा दोन पक्षांमधला विहित कालावधीकरिता केला जाणारा कायदेशीर करार आहे. यामध्ये धोका पत्करणारा पक्ष (म्हणजे पॉलिसीधारक किंवा Insured) आपला आकस्मिक किंवा अनिश्चित जोखमीमुळे नुकसान होण्याचा संभाव्य धोका दुसऱ्या पक्षाकडे (म्हणजे इन्शुरन्स कंपनी किंवा Insurer) ट्रान्सफर करत असतो आणि त्या करीता तो शुल्क (fees / consideration) म्हणून त्या कराराद्वारे ठरलेल्या रक्कमेचा म्हणजे प्रिमिअमचा भरणा करत असतो. आणि त्या मोबदल्यामध्ये त्याच्या जीवितास किंवा मालमत्तेस काही नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई करण्याची जबाबदारी दुसऱ्या पक्षावर असते.


इन्शुरन्सचे मुख्यतः २ प्रकार आहेत - लाईफ इन्शुरन्स (म्हणजे  जीवन वीमा) आणि नॉन-लाईफ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स (म्हणजे सामान्य वीमा - ज्या मध्ये जीवन विमा व्यतिरिक्त बाकी अस्तित्वात असणारे सर्व प्रकार समाविष्ट असतात). लाईफ इन्शुरन्समध्ये मानवी जीवनाचा निश्चित असा शेवट असतो, फक्त तो शेवट कधी होतो, त्याची तंतोतंत वेळ माहीत नसते. तशी निश्चितता जनरल इन्शुरन्स मध्ये नसते. “घटना घडणे” किंवा “घटना न घडणे” या दोन शक्यता जनरल इन्शुरन्स मध्ये अंतर्भूत असतात. जनरल इन्शुरन्सच्या अंतर्गत येणारे करार हे एका वर्षाच्या कालावधीकरिता केले जातात. या करारांचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.

लाईफ इन्शुरन्सचे महत्वाचे प्रकार सांगायचे झाले तर यामध्ये मुदत विमा म्हणजे टर्म प्लॅन (निश्चित केलेल्या मुदतीमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यू झाल्यास नॉमिनीला आर्थिक आधार मिळतो), युलिप अर्थात युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (इन्शुरन्स सोबतच गुंतवणूकीतुन मिळणारे लाभ), वेळोवेळी परतावा (Returns) आणि मुदत संपल्यावर उर्वरित लाभ देणारा मनी बॅक प्लॅन, संपूर्ण जीवन कालावधीकरिता Whole Life Plan, चाईल्ड प्लॅन (मुलांचे शिक्षण आणि भविष्याकरिता) आणि  निवृत्तीपश्चात आयुष्याकरिता पेन्शन प्लॅन, असे प्लॅन्स असतात.

Types of insurance

नॉन-लाईफ किंवा जनरल इन्शुरन्समध्ये मानवी मृत्यूव्यतिरिक्त इतर सर्व कारणामुळे होणारे आर्थिक नुकसान कव्हर केले जाते. याचे काही प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतील -  फायर इन्शुरन्स (आगीपासून होणारे मालमत्तेचे नुकसान झाल्यास), हेल्थ इन्शुरन्स (व्यक्तीच्या आरोग्यासंबंधी खर्च, हॉस्पिटलाझेशन व इतर आरोग्य सेवा-सुविधांचा खर्च), ट्रॅव्हल इन्शुरन्स (प्रवास करीत असतानाचे चोरी किंवा वस्तू हरविण्याचे धोके), होम इन्शुरन्स (कष्टाने उभे केलेल्या घराला आणि संपत्तीला चोरी-दरोडा किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे धोका), मोटार इन्शुरन्स तसेच थर्ड पार्टी इन्शुरन्स (वाहनाला किंवा वाहनामुळे इतर सार्वजनिक संपत्ती, वाहनचालकांव्यतिरिक्त अपघातात सापडलेली व्यक्ती यांना झालेले नुकसान), बाईक इन्शुरन्स (दुचाकीला नुकसान), मरीन इन्शुरन्स (सागरी वाहतुकीदरम्यान वादळ, आग, सागरी हवामानामुळे नुकसान, जहाज बुडणे, सागरी मार्गातील विलंब, सागरी लुटारुंकडून  धोका), हल आणि कार्गो इन्शुरन्स (जहाज, विमान यांना प्रत्यक्ष होणारे नुकसान), कमर्शिअल इन्शुरन्स जसे कि-पर्सन इन्शुरन्स (कंपनीच्या महत्वाच्या व्यक्तीच्या नसण्याच्या स्थितीमध्ये होणारे नुकसान), प्रॉपर्टी इन्शुरन्स (मालमत्तेस होऊ शकणारे नुकसान), इंजिनिअरिंग इन्शुरन्स (टुल्स आणि मशिनरीचे नुकसान), संप-टाळेबंदी यामुळे होणारे व्यावसायिक नुकसान (Business interruption) अशा गोष्टी कव्हर केल्या जातात.