Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इनसायडर ट्रेडिंग (Insider Trading) म्हणजे काय?

What is Insider Trading?

Insider Trading : शेअर मार्केट हे संपूर्ण भारतीयांचे असून कोणा एका-दोघांना गोपनीय माहिती देऊन इतरांशी दुजेपणा करणे चुकीचे आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) असं करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

उद्याच्या शेअर मार्केटची (Share Market) एक टीप देऊ का? ही कंपनी घे! चांगला परफॉर्म करणार आहे!! अर्रर्र… त्या कंपनीचे शेअर्स कशाला घेतले? ती कंपनी पडणार आहे?, असे मार्केटचे भविष्य सांगणारे So Called… मार्केट तज्ज्ञ फुकटचे सल्ले नेहमीच देत असतात. अभ्यास न करता दिलेले हे असे सल्ले एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो आणि ते दिलेही पाहिजेत. पण जर असा सल्ला तुम्हाला एका कंपनीच्या अधिकृत व्यक्तीने त्याच कंपनीच्या गोपनीय कराराबद्दल दिला तर?? मग तुम्ही त्या टीपचा नक्की विचार कराल, बरोबर ना! पण तुम्हाला असा सल्ला कोणी देण्याआधी व तुम्ही त्यावर विचार करण्याआधी तुम्हाला इनसायडर ट्रेडिंगबद्दल माहिती असणं गरजेचं व महत्त्वाचं आहे. अशाप्रकारे दिले जाणारे सल्ले व त्यानुसार करण्यात आलेल्या ट्रेडिंगला इनसायडर ट्रेडिंग  (Insider Trading) म्हटले जाते. चला तर जाणून घेऊयात इन्सायडर ट्रेडिंग  म्हणजे काय?

इनसायडर ट्रेडिंग  म्हणजे काय? What is Insider Trading?

शेअर मार्केटवर कंपन्या लिस्ट होत असतात. त्यानंतर सर्वसामान्य ट्रेडर्स कंपनीची क्षमता, त्यांचे उत्पन्न, त्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स पाहून त्यावर अभ्यास करून त्यात गुंतवणूक करतात. आपल्या गुंतवणुकीमुळे कंपनीला भांडवल मिळते. गुंतवणूकदारांना आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी व त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आपले रिपोर्ट प्रकाशित करतात. ज्याच्या आधारे कंपनीचा अभ्यास करण्यास मदत होते. कंपनीची माहिती ही केवळ कंपनीद्वारेच लोकांमध्ये प्रकाशित केली जाते. पण काहीवेळा कंपनीने सार्वजनिक न केलेली गोपनीय माहिती सुद्धा काही ठराविक गुंतवणूकदारांना सांगितली जाते.  त्यालाच इनसायडर ट्रेडिंग  (Insider Trading) असे म्हटले जाते. कंपनीची माहिती लोकांमध्ये प्रकाशित होण्याआधीच ठराविक गुंतवणूकदारांना ही माहिती आधीच मिळाल्याने ते आधीच आपली पोसिशन घेऊन ठेवतात व फायदा मिळवतात. ठराविक गुंतवणूकदारांनाच माहिती देणे व इतर लोकांना त्याच माहितीपासून वंचित ठेवणे, हे सेबीच्या नियमाविरोधात आहे. कंपनीची अशी माहिती देणारे, कंपनीत काम करणारे कोणीही असू शकते. शेअर मार्केट हे सर्व भारतीयांचे असून कोणा एका-दोघांना माहिती पुरवून इतरांशी दुजेपणा करणे हे सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) गुन्हा असल्याचे म्हटले आहे.


इनसायडर ट्रेडिंग  बेकायदेशीर का आहे?

इतर गुंतवणूकदारांसाठी अन्यायकारक!

सामान्य गुंतवणूकदार ज्यांना कंपनीबद्दलची ही माहिती पुरविली जात नाही; त्यांच्यावर अन्याय होतो. जे गुंतवणूकदार बेकायदेशीर माहितीचा वापर करून गुंतवणूक करतात ते इतर गुंतवणूकदारांपेक्षा जास्त फायदा मिळवतात. त्यामुळे इनसायडर ट्रेडिंग  सामान्य गुंतवणूकदारांसाठी अन्यायकारक आहे.

नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि अनैतिक!

इनसायडर ट्रेडिंग  नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि अनैतिक मनाली जाते. सर्व गुंतवणूकदारांना समान माहिती व समान संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.

लोकांच्या विश्वासाला बाधा!

मार्केटमध्ये होणाऱ्या इनसायडर ट्रेडिंगमुळे इतरांचा ट्रेडिंगवरील विश्वासास तडा जातो. कोणताही खेळ खेळताना जर खेळाडू प्रामाणिकपणे व सर्व नियमांचे पालन करून खेळत असतील तर त्या खेळाला रंगत येते. पण जेव्हा एखाद्या खेळात खेळाडुंकडूनच फसवणूक केली जाते. तेव्हा तो खेळ बदनाम होतो. इतर खेळाडू व प्रेक्षकांचा त्या खेळावरील विश्वास उडू लागतो. इन्सायडर ट्रेडिंग ही शेअर मार्केटच्या खेळामधील फसवणूक आहे; ज्यामुळे नवख्या खेळांडुंचा त्यावरील विश्वास उडू शकतो.

सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियम

कंपनी कायदा, 2013 आणि सेबी कायदा, 1992 द्वारे भारतात इनसायडर ट्रेडिंग प्रतिबंधित आहे. सेबीने सेबी (इनसाइडर ट्रेडिंग प्रतिबंध) विनियम, 2015 तयार केले आहे. जे भारतात इनसायडर ट्रेडिंगच्या प्रतिबंध आणि प्रतिबंधाचे नियम निर्धारित करतात. सेक्शन 15 जी (Section 15G) नुसार कोणी जर स्वतःहून किंवा इतर कोणाच्या मदतीने स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केलेल्या कॉर्पोरेट कंपनीची अप्रकाशित, गोपनीय व संवेदनशील माहितीचा वापर करून व्यवहार केले किंवा त्या माहितीच्या आधारावर ट्रेडिंगचे सल्ले दिल्यास तो गुन्हा मानला जातो आणि त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. या शिक्षेमध्ये दंड म्हणून 25 कोटी रुपये किंवा इन्सायडर ट्रेडिंगमधून मिळवलेल्या फायद्याच्या तिप्पट रक्कम भरावी लागते.

भारतीय शेअर मार्केटमधील इनसायडर ट्रेडिंगची काही निवडक उदाहरणे!

रजत शर्मा (Rajat Sharma)

2012 मध्ये गोल्डमॅन सॅच (Goldman Sach) संचालक मंडळाचे सदस्य रजत गुप्ता यांच्यावर इन्सायडर ट्रेडिंग  केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यांनी संचालक सदस्यांच्या मिटिंगची माहिती गॅलियन ग्रुपचे संस्थापक राज राजारातनम यांना दिली होती. राजारातनम यांनी या माहितीचा वापर ट्रेडिंगसाठी केला होता.

एक्कलाईम इंडसट्रीज (Ekkalime Industries)

एक्कलाईम इंडसट्रीजच्या संचालकांना 42 लाख रुपयांचा दंड इनसायडर ट्रेडिंग केल्यामुळे भरावा लागला होता. संचालक अभिषेक मेहता यांनी कंपनीचे विलीनीकरण न होणार असल्याच्या माहितीचा फायदा उचलून आपली शेअर होल्डिंग कमी केली होती.

मार्था स्टीवर्ट (Martha Stiwart)

2003 मध्ये, मार्था स्टीवर्टवर सेक (Securities and Exchange Commission)ने 2001 इमक्लोन (ImClone) प्रकरणात तिच्या भागासाठी न्याय आणि सिक्युरिटीजच्या फसवणुकीमध्ये अडथळा आणल्याचा आरोप केला होता. मेरिल लिंच येथील ब्रोकर पीटर बाकानोविक यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्टीवर्टने बायोफार्मास्युटिकल कंपनी इमक्लोन (ImClone) सिस्टीमचे जवळपास 4 हजार शेअर्स विकले होते. 2004 च्या खटल्यानंतर स्टीवर्टवर वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. 

इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय? याचा अंदाज तुम्हाला आता आला असेलच. आतापासून फुकटचे सल्ले देणारे तज्ज्ञ असो किंवा कोणत्याही कंपनीबद्दलची सीक्रेट माहिती देणारी व्यक्ती असो, अशा व्यक्तींपासून सावध राहणं गरजेचं आहे.