Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indemnity Insurance: भरपाईचा विमा म्हणजे काय?

What is Indemnity Insurance

Indemnity Insurance: तुम्ही वकील, सनदी लेखापाल (CA), फायनान्शिअल ऍडवायझर किंवा अन्य प्रोफेशनल व्यक्ती आहेत काय! तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

तुम्ही वकील, सनदी लेखापाल (CA), फायनान्शिअल ऍडवायझर किंवा अन्य प्रोफेशनल व्यक्ती आहेत काय !!!! तर मग हा कॉलम तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो. कोणताही व्यवसाय म्हटला की तडजोडी (adjustments), जोखीम (risk) आणि धोके (hazards) हे घटक अविभाज्य असतातच. आणि ह्यामध्ये संतुलन साधणे, हे त्या व्यावसायिकांसाठी आव्हानात्मक (challenging) स्वरूपाचे काम असते. अर्थातच कोणत्याही व्यावसायिकाचे सर्वच निर्णय, अंदाज सर्वच वेळी अपेक्षित परिणाम  देतील, अचूक साबीत होतील, असे नाही. “To err is human” अर्थात चुका होणे, हे मानवासाठी अत्यंत स्वाभाविक बाब आहे. मात्र या चुकलेल्या निर्णयांचा, सल्ल्यांचा परिणाम तुमच्या क्लायंट्सना, कस्टमर्सना भोगायला लागत असेल तर !!! अशा वेळी तुमच्या मदतीला धावून येतो तो "इंडेम्निटी इन्शुरन्स" अर्थात "नुकसानभरपाई विमा".

"इंडेम्निटी इन्शुरन्स" घेणाऱ्या व्यावसायिकांमध्ये आर्थिक सल्लागार (financial advisers), वकील, डॉक्टर, चार्टरर्ड अकाउंटंट्स (CAs) तसेच तारण दलाल (म्हणजे mortgage broker), वास्तुविशारद (Architect) किंवा अगदी इन्शुरन्स एजंटस् यांसारख्या आर्थिक आणि कायदेशीर सेवांमध्ये गुंतलेल्यांचा समावेश होतो. हे व्यावसायिक त्यांच्या ज्ञान, अनुभव, व्यावसायिक कौशल्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे रेप्युटेशन (प्रतिष्ठा / goodwill) पणाला लावून त्यांच्या क्लायंट्सना व्यावसायिक सल्ला किंवा विशेष सेवा प्रदान करतात. 


आर्थिक किंवा कायदेशीर सल्ला देताना, हे प्रोफेशनल एक्सपर्ट्स त्यांचा हेतू कितीही चांगला असला तरीदेखील  निष्काळजीपणा किंवा अपुऱ्या कामगिरीसाठी क्लायंट्सच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार असतात. झालेले नुकसान भरून निघावे, यासाठी क्लायंट्स साहजिकच अशा प्रोफेशनल्स विरुद्ध न्यायालयामध्ये दिवाणी दावा (civil suit) दाखल करण्याची शक्यता असते. अशा वेळी पॉलिसीधारकाला म्हणजे प्रोफेशनल्सना मासिक (monthly) किंवा वार्षिक (annually) प्रीमियमच्या बदल्यात नुकसानभरपाईच्या दाव्यांपासून संरक्षण मिळू शकते. एखाद्या व्यावसायिक निर्णयामुळे थर्ड पार्टीचे दुखापत, हानी, मृत्यू किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास नुकसान झाल्यास, हा "इंडेम्निटी इन्शुरन्स" पॉलिसीधारकाचे कायदेशीर शुल्क कव्हर करण्यात मदत करू शकतो. 

व्यावसायिकाने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात तो अयशस्वी झाल्यामुळे किंवा काही वेळा त्याच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकाचे आर्थिक नुकसान होते किंवा त्याला कायदेशीर अडचणीला सामोरे जावे लागते. अशा वेळी नुकसान झालेल्या ग्राहकाला दिवाणी दावा (Civil suit) दाखल करता येतो. प्रत्युत्तरादाखल, व्यावसायिकाचा "इंडेम्निटी इन्शुरन्स"  खटल्याचा खर्च तसेच कोर्टाने दिलेली कोणतीही हानी भरतो आणि नुकसान झालेल्या ग्राहकाच्या नुकसान-भरपाई मिळण्यासाठीच्या दाव्यांपासून संरक्षण करतो.  इतर कोणत्याही प्रकारच्या इन्शुरन्सप्रमाणेच, "इंडेम्निटी इन्शुरन्स" मध्ये न्यायालयीन खर्च, फी आणि सेटलमेंट यांचा समावेश असतो. त्यामुळे आर्थिक आणि कायदेशीर सेवांमध्ये गुंतलेल्यांसह काही व्यावसायिकांनी नुकसानभरपाई विमा बाळगणे आवश्यक आहे. अर्थातच, या इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, फक्त दिवाणी दावे कव्हर केले जातात. जर दावा एखाद्या गुन्हेगारी कृत्यामुळे किंवा कायद्याच्या उल्लंघनामुळे उद्भवला असेल, तर तो या पॉलिसी अंतर्गत येत नाही.

मुळात "इंडेम्निटी” म्हणजे “नुकसानभरपाई”. म्हणजे पॉलिसीधारक व्यावसायिकाला अनपेक्षित नुकसानीसाठीच एका  विशिष्ट मर्यादेपर्यंतच नुकसान भरपाई मिळत असते. इन्शुरन्स कंपन्या या पॉलिसीधारकांनी भरलेल्या प्रीमियमच्या बदल्यात झालेल्या आर्थिक नुकसान-भरपाईसाठीच कव्हरेज देतात. त्यामुळे काही विशिष्ट घटनेसाठी त्या व्यावसायिक व्यक्तीची अथवा  व्यवसाय-मालकाची  चूक असल्यास किंवा तो दोषी आढळल्यास त्यांना क्लायंट्सना भरून द्याव्या लागणाऱ्या रक्कमेसाठी संरक्षण प्राप्त होत असते. नुकसानभरपाई विम्याच्या विशिष्ट उदाहरणांमध्ये “व्यावसायिक विमा पॉलिसी” (Commercial Insurance Policy) जसे की वैद्यकिय गैरव्यवहार विमा (Medical Malpractice Insurance) आणि त्रुटी आणि वगळणे विमा (Errors and Omissions Insurance) यांचा समावेश होतो.