कर्जाची थकबाकी नवीन कर्जदात्याकडे म्हणजेच बँक किंवा फायनान्स कंपनीकडे हस्तांतरित करण्याची ही एक पद्धत आहे. तुमची बँक तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर कमी करण्यास तयार नसेल तर अशा स्थितीत तुम्ही इतर बँका किंवा वित्तसंस्थांकडे कर्जाचे ट्रान्सफर करण्याचा विचार करून तो पर्याय निवडू शकता. यालाच होम लोन रीफायनान्स म्हणतात.
जर दुसर्या बँकेकडून कमी व्याजदर आकारला जात असेल तरच केवळ तुमचे कर्ज त्या बँकेकडून किंवा गृहनिर्माण फायनान्स कंपनीकडे हस्तांतरित करणे अशा वेळी उपयुक्त ठरते.
होम लोन रीफायनान्समध्ये बँकेकडे असलेले थकित कर्ज नवीन बँकेद्वारे पूर्ण केले जाते, म्हणजेच उर्वरित कर्ज फेडण्याची जबाबदारी नवीन बँक उचलते. एकदाहोम लोन रीफायनान्स करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, की पूर्वीचे कर्ज खाते बंद केले जाते. त्यानंतर तुम्हाला नवीन बँक किंवा कंपनीला थकित कर्जाचा EMI भरावा लागतो.
समजा एखाद्याने 2016 मध्ये 30 लाख रुपये कर्ज घेतले आणि त्यावेळचा व्याजदर अंदाजे 9.25 टक्के असून कर्जाची मुदत 20 वर्षे आहे. असे गृहीत धरल्यास EMI 27,476 रुपये असेल. 6 वर्ष कर्जफेड केल्यानंतर 2022 मध्ये या व्यक्तीचे थकीत कर्ज सुमारे 24 लाख रुपये असेल. आता समजा, 2022 मध्ये कर्जाची रक्कम रु. 25 लाख असेल तर 6.90 टक्के व्याजदर अपेक्षित आहे. कर्जाची मुदत 14 वर्षे राहिल्यास EMI सुमारे 22,000 रुपये असेल. म्हणजेच दोन प्रमुख फायदे होतात. पहिले, व्याजदर कमी होते. दुसरे, मासिक ईएमआय काही हजरांनी कमी होतो . प्रत्यक्षात, येथे व्याज दर सुमारे 2.35 टक्के कमी झाला आहे.
तुमच्या कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये गृहकर्ज रीफायनान्स पर्यायाची निवड करणे फायदेशीर आहे, असे सांगितले जाते. ही पद्धत तुम्हाला मोठ्या व्याजाची रक्कम वाचविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
लोन रीफायनान्स करताना प्रक्रिया खर्च, कायदेविषयक शुल्क असे अतिरिक्त खर्च जोडले जाऊ शकतात. तसेच, फोरक्लोजर चार्जेस (सामान्यतः फ्लोटिंग रेट लोनवर हे लागू होत नाहीत; परंतु बहुतेक बँका फिक्स्ड रेट लोन फोरक्लोज करताना ते आकारतात), दस्तावेजीकरण शुल्क, एमओडी शुल्क तसेच इतर कोणत्याही प्रकारचे शुल्क लागू होणार आहे का, हे तपासा.
नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या गृहकर्जाचे पुनर्वित्त करताना तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही याची खात्री करा. तसेच तुमचे गृहकर्ज पुनर्वित्त करण्याची योजना आखताना दीर्घकालीन फायदे आणि तोटे विचारात घ्या.