तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आरोग्य विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स घेऊ शकता. यामध्ये संपूर्ण विम्याची रक्कम कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी असते. म्हणजे जर तुम्ही 5 लाखांचा आरोग्य विमा काढला आणि कुटुंबामध्ये चार सदस्य आहेत तर या चार सदस्यांसाठी 5 लाखाचे संरक्षण असेल. म्हणजे एकाच छत्राखाली सर्व कुटुंबातील सदस्यांना विम्याचे संरक्षण मिळते. वैयक्तिक विम्यामध्ये फक्त एकट्यापुराच कव्हर असतो. फ्लोटर प्लॅनमध्ये कमी प्रिमियममध्ये जास्त सदस्यांना कव्हर मिळतो.
फ्लॅमिली फ्लोटर इन्शुरन्स कधी फायद्याचा ठरतो
हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ - राहुलने फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स आपल्या कुटुंबासाठी खरेदी केला आहे. यामध्ये त्याची पत्नी आणि दोन 5 आणि 7 वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. एकूण चार सदस्यांना 3 लाखांचा विमा कव्हर असलेली पॉलिसी राहुलने खरेदी केली आहे. मात्र, विमा काढल्यानंतर राहुलच्या पत्नीचा स्कुटीवरुन पडून अपघात होतो. रुग्णालयात तिच्या उपचारावर अडीच लाख रुपये खर्च होतो. सर्व खर्च विमा कंपनीकडून दिला जातो. विम्याचे फक्त 50 हजार रुपये शिल्लक राहिले, जे इतर सदस्यांसाठी पॉलिसी संपेपर्यंत वापरता येतील. मात्र, त्या वर्षात घरातील इतर कोणालाही विम्याची गरज पडली नाही. अशा परिस्थितीत फ्लोटर इन्शुरन्स परवडतो. कारण कुटुंबातील सर्व व्यक्ती कव्हर असतात. विम्याची गरज सर्वांना एकाच वेळी पडेल, याची शक्यता कमी असते. अशा पॉलिसीचा प्रिमियमही कमी असतो.
फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स कधी फायद्याचा ठरत नाही
हे समजून घेण्यासाठी आपण वरील उदाहरण पाहू, राहुल त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात अॅडमिट होण्याची वेळ येते. चौघांचा रुग्णालयाचा खर्च 5 लाख रुपये येतो. अशा वेळेस विमा कंपनी फक्त 3 लाखांचे बिल कव्हर करेल. इतर रक्कम राहुलला त्याच्या खिशातून भरावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये फ्लोटर विमा फायद्याचा ठरत नाही. संपूर्ण कुटुंबासाठी घेतलेला कव्हर पुरेसा ठरत नाही. कारण एकाच वेळी सर्वांना किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांना जास्त रक्कम आरोग्यावर खर्च करण्याची वेळ येते. अशा वेळेस कव्हर अपूरा पडून तुम्हाला अतिरिक्त पैसे भरावे लागतील.
संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसाठी वेगवेगळी पॉलिसी घेण्यापेक्षा एकच पॉलिसी फायद्याची ठरू शकते. मात्र, कुटुंबामध्ये जास्त सदस्य असतील, तर फ्लोटर पॉलिसी खरेदी करु नका. शक्यतो वयोवृद्ध व्यक्तीसांठी वेगळी सिनियर सिटिझन पॉलिसी खरेदी करावी. अनेक विमा कंपन्या फ्लोटर प्लॅन पती, पत्नी आणि दोन मुलांपर्यंतच मर्यादित ठेवत आहेत. त्यापेक्षा जास्त सदस्यांना ही पॉलिसी घेता येत नाही. फ्लोटर प्लॅनची संपूर्ण माहिती घेऊनच विमा खरेदी करा.