Cancer Insurance: मार्टिना नवरातिलोव्हा (Martina Navratilova, Tennis Player) हिला कर्करोग (Cancer) झाल्याच्या निदानाची बातमी ऐकून अवघ्या क्रिडा-विश्वाचा श्वास क्षणभर रोखला गेला. कारण टेनिस-सम्राज्ञी मार्टिना जिगरबाज आणि लढवय्यी खेळाडू. तिलाही कॅन्सरसारख्या आजाराने विळखा घातल्याने लोकांच्या मनामध्ये धस्स झाले. पण यामुळे पुन्हा एकदा जाणीव झाली की, कॅन्सर कोणालाही शिकार बनवू शकतो.
कॅन्सर अर्थात कर्करोग. भारतात यावर्षी जरी 19 ते 20 लाख कॅन्सर रुग्णांचे प्रमाण नोंदवले गेले असले तरी देखील वास्तविक आकडा प्रत्यक्ष नोंद झालेल्या केसेसच्या 1.5 ते 3 पट असण्याची शक्यता आहे. कर्करोगाने ग्रस्त भारतीयांची संख्या 2025 मध्ये 2.98 कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. 2021 मध्ये हीच संख्या 2.67 कोटी इतकी होती. भारतातील कर्करोगाचे वाढते प्रमाण खरोखरच चिंतेचा आणि त्याविषयी स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सजग, सावध आणि सुरक्षित करण्याचा विषय झाला आहे.
Cancer Insurance - इन्शुरन्स पॉलिसीचा विशेष प्रकार
“कॅन्सर इन्शुरन्स” (कर्करोग विमा) हा इन्शुरन्स पॉलिसीचा विशेष-प्रकार आहे, जिच्या अंतर्गत कॅन्सर निदान आणि उपचारांशी (diagnosis & treatment) संबंधित हॉस्पिटलायझेशन, केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया इ. गोष्टी कव्हर होतात. पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या “फ्री लुक-अप पिरियड”नंतर रोगाचे निदान झालेल्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी हे प्रॉडक्ट डिझाइन केले जाते. ज्या व्यक्तींना कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री आहे किंवा ज्यांना त्यांच्या कामामुळे किंवा भोवतालच्या वातावरणामुळे कॅन्सर होण्याचा धोका / शक्यता जास्त आहे, अशा व्यक्तींनी “कॅन्सर-इन्शुरन्स” पॉलिसी खरेदी करणे आवश्यक आहे. कर्करोगाचे निदान झाल्यापासून त्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च आणि कालावधी देखील खूपच जास्त असतो. आणि मुख्य म्हणजे या आजाराचा कॅन्सर-पीडित व्यक्तीच्या कुटुंबांवर शारीरिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन प्रभाव होतो. घरामधील कमावती व्यक्ती एकच असल्यास किंवा कॅन्सर-उपचाराचा अवाढव्य वैद्यकीय खर्च (medical expenses) भागविणे शक्य नसल्यास “कॅन्सर इन्शुरन्स” खरेदी केलेला केव्हाही चांगला.
निदानापासून विविध टप्प्यावर आर्थिक मदतीचा हात
जेव्हा पॉलिसीधारकाला कॅन्सरचे निदान होते, तेव्हा इन्शुरन्स कंपनीकडून त्याला पॉलिसीच्या किमतीएवढे अर्थ-सहाय्य दिले जाते. कॅन्सरच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम वापरली जाऊ शकते. अर्थात क्लेमचे पैसे सामान्यतः निदानाच्या (diagnosis) विविध टप्प्यांवर देय असतात, ज्यात किरकोळ, प्रमुख आणि गंभीर टप्प्यांचा समावेश असतो. इन्शुरन्स कंपनीज् एकरकमी पेआउट (lump sum रक्कम) देणे, प्रीमियम भरण्यापासून सूट देणे (Waiver of Premium), monthly पे-आउट देणे, किंवा क्लेम न केल्याने (क्लेम-मुक्त वर्ष) पॉलिसीची रक्कम वाढत जाणारे “नो-क्लेम बेनिफिट्स” ऑफर करणे, तसेच मल्टिपल कॅन्सर स्टेजेस कव्हर करणे, अशा विविध स्वरूपामध्ये कॅन्सर-कव्हर उपलब्ध करून देते.
“कॅन्सर इन्शुरन्स” कर्करोगाच्या उपचारांशी संबंधित वैद्यकीय खर्च कव्हर करण्यासाठी आहे आणि तो डेथ-क्लेम, मॅच्युरिटी बेनिफिट्स अथवा पॉलिसी सरेंडर केल्याचे लाभ देत नाही. टॅक्स बेनिफिट्सचा विचार केला तर, कॅन्सर-इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम भारतीय प्राप्तिकर कायदा, 1961च्या कलम 80D अंतर्गत “टॅक्स बेनिफिट्स” क्लेम करण्यास पात्र करतो.
कॅन्सर-इन्शुरन्स कधी खरेदी करावा?
कॅन्सर-इन्शुरन्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तर “कॅन्सर निदान होण्यापूर्वीची”. कारण कॅन्सर-इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी व्यक्तीला रोगाचे निदान झाले असल्यास, त्याचा उपचाराचा खर्च “आधी अस्तित्वात असलेल्या रोगाचा प्रतीक्षा कालावधी (waiting period)” म्हणजे 2 ते 4 वर्षांनंतरच कव्हर केला जातो. याशिवाय आपल्याला कॅन्सरवरील उपचारानंतर “कॅन्सर-इन्शुरन्स” खरेदी करता येत नाही. तेव्हा भविष्यात जर आपण “कॅन्सर-इन्शुरन्स” खरेदी करायचे ठरविले, तर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व कॅन्सर-पॉलिसीज् चेक करून, त्यांचे कव्हरेज, फायदे, प्रीमियम, इन्शुररचा क्लेम सेटलमेंट रेशो इ.तुलना करून आणि मुख्य म्हणजे कुटुंबासोबत चर्चा करून मगच योग्य तो निर्णय घ्या.