• 24 Sep, 2023 03:51

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

9 ते 9.15 यादरम्यान शेअर मार्केटमध्ये काय होतं?

Pre-Open Market Session

शेअर मार्केट सकाळी 9 वाजता सुरू होते आणि दुपारी 3.30 वाजता संपते. पण यातील 9 ते 9.15 या वेळेत कोणीही ट्रेडिंग करू शकत नाही. मग या वेळेत शेअर मार्केटमध्ये काय सुरू असतं? या वेळेत खरंच कोणालाही ट्रेडिंग करता येत नाही का? याची माहिती आपण घेणार आहोत.

इंडियन शेअर मार्केट सकाळी 9 ते दुपारी 3.30 पर्यंत चालू असते हे सर्वाना माहितीत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? 9 ते 9.15 या वेळेदरम्यान कोणीही ट्रेडिंग करू शकत नाही. मग या वेळेत होतं काय? जर कोणी या वेळेत ट्रेडिंग (Trading) करू शकत नाही तर मग ही वेळ ‘मार्केट चालू होण्याची वेळ’ म्हणून का सांगितली जाते? या वेळेचे महत्त्व काय?? असे प्रश्न शेअर मार्केटमध्ये नव्याने येणाऱ्यांना पडणे साहजिक आहे. सकाळच्या या 15 मिनिटांच्या सेशनला प्री-ओपन मार्केट सेशन (Pre-Open Market Session) असे म्हटले जाते. आज आपण प्री-ओपन मार्केट सेशन (Pre-Open Market Session) आणि या 15 मिनिटांमध्ये नक्की काय होतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेअर मार्केट (Share Market) सकाळी 9 वाजता सुरू होते आणि दुपारी 3.30 वाजता संपते. यामध्ये सकाळी 9 ते 9.15 ही वेळ प्री-ओपन मार्केट सेशन म्हणून राखीव ठेवलेली असते. 2010 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE-National Stock Exchange) सुरु केलेल्या या प्री-ओपन मार्केट सेशनमुळे मार्केटमधील अस्थिरता स्थिर करण्यास मदत होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे (BSE-Bombay Stock Exchange) प्री-ओपन मार्केट सेशन हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्री-ओपन मार्केट सेशन सारखेच असते.

प्री-ओपन मार्केट सेशन म्हणजे काय? 

एखाद्या स्टॉकच्या चालू ट्रेडिंग सेशनच्या किमतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्री-ओपन मार्केट सेशनचा वापर होतो. सोप्या भाषेत, अनेक वेळा मार्केट बंद झाल्यानंतर, कंपन्यांसंबंधी छोट्या-मोठ्या बातम्या जाहीर होत असतात किंवा कंपन्या काही महत्त्वाच्या घोषणा करत असतात. त्यामुळे त्या कंपनीच्या खरेदी किंवा विक्रीसाठीच्या ऑर्डर्स इन्वेस्टर्सद्वारे जनरेट केल्या जातात. मार्केट ऑर्डर म्हणजे सध्याच्या बाजारभावानुसार शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा आदेश असतो. हा आदेश दिल्यानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाते. जनरेट झालेल्या ऑर्डर्समुळे अस्थिरता वाढते व ही अस्थिरता प्री-ओपन मार्केटमध्ये मॅनेज केली जाते.


प्री-ओपन मार्केट सेशनद्वारे अस्थिरता कशी कमी केली जाते?

कंपनीच्या किमतींमध्ये चढ-उतार होण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर त्या कंपनीच्या शेअर्ससाठी असलेली मागणी व त्यांचा पुरवठा यावर त्याची किंमत खाली-वर होत असते. जेव्हा गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात एखाद्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री करत असतात. तेव्हा त्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये अस्थिरता निर्माण होते. मार्केटमध्ये सुरु असलेली खरेदी-विक्री ही गुंतवणूकदाराला स्क्रीनवर दिसत असते, किमतींमध्ये होणारे बदल गुंतवणूकदार मार्केटच्या वेळेत पाहू शकतो. पण मार्केट बंद झाल्यावर, झालेल्या खरेदी-विक्रीचे काय? ते तर आपण पाहू शकत नाही व ती आपल्यला माहित देखील नसते. त्यामुळे मार्केट ओपन झाल्यावर शेअर्सच्या किमतीत झालेला मोठा फरक पाहून गुंतवणूकदाराची झोप उडू शकते. यासाठी स्टॉक एक्सचेंज सुरू होण्यापूर्वी कंपनीच्या शेअर्सची वास्तविक मागणी व त्यांचा वास्तविक पुरवठा ठरवून कंपनीच्या शेअर्सची समतोल किंमत (Equilibrium Price) ठरवली जाते. यामुळे कंपनीच्या शेअर्सची किमत स्थिर होण्यास मदत होते. 

प्रत्येक मिनिट महत्त्वाचा! 

प्री-ओपन मार्केट सेशनच्या 15 मिनिटांचा कालावधी तीन सेशन्समध्ये विभागलेला असतो.

ऑर्डर-एन्ट्री सेशन (Order Entry Session)

9  ते 9.08 या 8 मिनिटांमध्ये जेवढ्या ऑर्डर्स जनरेट केलेल्या असतात; त्या सर्व ऑर्डर्स एक्सचेंजेस द्वारे घेतल्या जातात. मार्केट बंद झाल्यापासून ते सकाळी 9.08 पर्यंतच्या सर्व ऑर्डर्स या वेळेत एक्सचेंजेस स्वीकारतात. याच वेळेत ऑर्डर्स मॉडिफाय किंवा कॅन्सल करणे शक्य असते. या 8 मिनिटानंतर प्री-ओपन मार्केट सेशनमध्ये कोणत्याही ऑर्डर्स घेतल्या जात नाहीत. 

ऑर्डर मॅचिंग सेशन (Order Matching Session)

9.08 ते 9.12 या 4 मिनिटांमध्ये जनरेट झालेल्या सर्व ऑर्डर्स कन्फर्म केल्या जातात व त्या मॅच केल्या जातात. जर एखादी ऑर्डर खरेदीची असेल आणि दुसऱ्याची विक्रीची असेल, तर ती ऑर्डर मॅच केली जाते. याच वेळेत संपूर्ण मार्केट सेशनच्या किमतीदेखील ठरवल्या जातात. या वेळेत ऑर्डर्स जनरेट, बाय, सेल किंवा मॉडिफाय होऊ शकत नाही. 

बफर सेशन (Buffer Session)

9.12 ते 9.15 या तीन मिनिटांच्या सेशनला बफर सेशन (Buffer Session) असे म्हटले जाते. यावेळेत एक्सचेंजने जे काही काम ऑर्डर एन्ट्री सेशन व ऑर्डर मॅचिंग सेशनमध्ये पार पडले ते सर्व नियमित मार्केटमध्ये पोचवले जाते. बफर सेशनमध्ये, ऑर्डर एन्ट्री सेशन आणि ऑर्डर मॅचिंग सेशनमधील प्राईसमधील तफावतीवर तोडगा काढला जातो.

आतापर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी (Nifty) मधील 50 स्टॉक्स व बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचेच्या सेन्सेक्स (Sensex) मधील 30 स्टॉक्सची ट्रेडिंग या प्री-ओपन मार्केट सेशनमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेसद्वारे उपलब्ध करून दिली जाते. 

प्री-ओपन मार्केट सेशनमध्ये ट्रेडिंग करता येते का?

अनेकवेळा तुमच्या स्टॉक ब्रोकर्सद्वारे प्री-ओपन मार्केट सेशनमध्ये ऑर्डर्स देण्याची सुविधा दिली जात नाही. एक्सचेंजेसचे काम हलके करण्यासाठी नव्या गुंतवणूकदारांना या प्री-ओपन मार्केट सेशनमध्ये येण्यापासून थांबवले जाते. जर तुम्हालाही प्री-ओपन मार्केट सेशनमध्ये ट्रेडिंग करायचीच असेल तर तुम्ही तुमच्या ब्रोकरला सांगून ही सुविधा अॅक्टिवेट करू शकता.