कर्ज मुक्त भारत हे एक जन अभियान आहे. ही कुठलीही सरकारी योजना नाही हे लक्षात घ्या. भारतातील अनेक कर्जदार लोक जे कर्जाच्या बोझ्याखाली दबलेले आहेत, त्यांना कदाचित ही कुठली सरकारी योजना आहे असे वाटू शकते. समाज माध्यमांवर गेल्या काही दिवसांपासून अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होत आहे. परंतु कुठलाही फॉर्म भरण्यापूर्वी आणि कुणालाही आपली वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी हे अभियान नेमके काय आहे, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
अभियान कशासाठी?
सामाजिक कार्यकर्ते शहानवाज चौधरी यांनी हे अभियान सुरु केले आहे. ज्या भारतीय नागरिकांवर कर्जाचा डोंगर आहे, कर्जामुळे ज्यांचे जगणे अवघड बनले आहे अशांना कर्जाच्या गर्तेतून काढणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
कर्जबाजारी लोक कर्जाच्या गर्तेत इतके बुडतात की ते कधीकधी आत्महत्या करतात, नैराश्यात जातात, दारूच्या आहारी जातात. कर्जाची परतफेड करण्याची त्यांची तयारी असते मात्र कर्जवसुली करणाऱ्या बँकांचे व्यवहार त्यांच्या प्रति ठीक नसतात म्हणून ते असा मार्ग पत्करतात. अशा व्यक्तींना या सर्वांपासून परावृत्त करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याने अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे.
सरकारचे धोरण काय?
कर्ज घेताना कर्जदार व्यक्ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून, अटी व नियम वाचूनच कर्ज घेत असतो. मात्र एकदा की कर्जाचे हफ्ते सुरु झाले की वित्तीय संस्था आणी बँका त्यांच्यासोबत गैरव्यवहार करतात असा आरोप अभियानातील संचालकांनी केला आहे.
बँका आणि वित्तीय संस्थेच्या जाचाला कंटाळून लोक आत्महत्या करतात. कर्जदारांना मारहाण करण्याचा, त्यांना शिव्या देण्याचा, त्यांच्याशी गैरव्यवहार करण्याचा अधिकार बँकांना नाही अशी या अभियानाची भूमिका आहे.
याबाबत केंद्र सरकार RBI च्या मदतीने केवळ पत्र व्यवहार करते, बँकावर कारवाई मात्र करत नाही, त्यामुळे हे अभियान चालवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
कसे सुरु आहे अभियान?
या अभियानामार्फत कर्जदार नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतला जात आहे. ज्यात त्यांच्या कामाचे, उत्पन्नाचे स्वरूप, कर्जाचा प्रकार आदी माहिती मागवण्यात येते. याबाबत गृहमंत्रालय आणि वित्त विभागाशी पत्र व्यवहार केला जातो आणि त्यांना बँकांनी केलेले गैरव्यवहार, सध्याची कर्जदाराची आर्थिक स्थिती याबाबत माहिती देण्यात येते. त्याच बरोबर कर्जाची परतफेड करण्यासाठी सादर व्यक्ती असक्षम असल्याचे पटवून दिले जाते.
खरेच कर्जमुक्ती होणार का?
आधीच सांगितल्याप्रमाणे ही काही सरकारी योजना नाही. सरकारवर दबाव टाकून कर्ज माफ करता येईल असे या अभियानाचे गृहीतक आहे. आतापर्यंत किती लोकांचे कर्ज माफ झाले याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र समाजमाध्यमांवर या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.