Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stand-Up India Scheme नेमकी काय आहे? तिचा फायदा कसा करून घ्यायचा?

Stand Up India Scheme

Image Source : www.indiablooms.com

Stand-Up India Scheme: अनुसूचित जाती आणि जमातीतल्या लोकांमध्ये उद्योजकता वाढावी, त्यांना छोटे - मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी केंद्रसरकारने स्टँड-अप इंडिया योजना सुरू केली आहे. ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा फायदा कसा करून घ्यायचा हे समजून घेऊया…

मागच्या सहा वर्षांत देशातल्या 1,33,995 लोकांना छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतची कर्ज मिळाली आहेत. आणि विशेष म्हणजे यात 81% महिला आहेत. कर्ज मिळालेल्यांपैकी काही जण आधी रस्त्यावर किंवा स्टेशनवर फिरते विक्रेते म्हणून काम करत होते. पण, कर्ज मिळवल्यावर त्यांची दुकानं अस्तित्वात आली.

या लोकांना मिळालाय स्टँड-अप इंडिया योजनेचा फायदा

देशातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकारकडून ही योजना चालवली जात आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (SC/ST)आणि सर्व वर्गातील महिलांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. त्यामुळे जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Stand Up India Scheme

स्टँड-अप इंडिया योजना काय आहे?

मोदी सरकारने 5 एप्रिल 2016 मध्ये ‘स्टँड-अप इंडिया (Stand Up India Scheme)’ या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना (SC/ST) आणि सर्व वर्गातील महिला व्यावसायिकांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते. महिलांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त असून या योजनेंतर्गत बँकेकडून कर्ज घेऊन महिला आपला रोजगार उभारू शकते. या योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या बँकांना किमान एका महिलेला कर्ज देणं अनिवार्य आहे.

या योजनेंतर्गत कर्ज त्या श्रेणीतील बँकेने देऊ केलेल्या सर्वात कमी दराने देण्यात येईल, परंतु ते बेस रेट (MCLR)+3% + टेनर प्रीमियम पेक्षा कमी नसावे, असा निकष ठेवण्यात आला आहे.

कर्जासाठी अर्ज कसा करावा?

स्टँड अप इंडिया योजना 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून या योजनेअंतर्गत उद्योजकांना आर्थिक मदत (Financial Aid) करण्या येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला स्टँड अप इंडिया लोन अॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तीन प्रकारे अर्ज करू शकता.

  • थेट बँकेच्या शाखेला भेट देऊन 
  • स्टँड अप इंडिया पोर्टलच्या मदतीने 
  • भारतीय लघु उद्योग विकास बँकच्या (SIDBI) पोर्टलला भेट देऊन

या योजनेंतर्गत तुम्हाला कमी व्याजदरात (Low Interest Rate) कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज तुम्ही 7 वर्षांच्या आत परत करू शकता. या योजनेशी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. कोणताही अर्जदार या पोर्टलवरून कर्जासाठी अप्लाय करू शकतो, तसेच पोर्टलद्वारे हँड होल्ड सपोर्ट, क्रेडिट माहिती आणि वित्त संबंधित माहिती जाणून घेऊ शकतो.

पोर्टलद्वारे अर्ज कसा करावा?

स्टँड-अप इंडिया योजनेच्या पोर्टलवर जाण्यासाठी सर्वप्रथम https://www.standupmitra.in/ या लिंकवर क्लिक करा.

Stand Up india Web Portal

आता तुम्हाला वर "Click here for Handholding Support or Apply for a loan" असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर, तीन पर्याय पाहायला मिळतील. ज्यामध्ये तुम्हाला विचारले जाईल की, तुम्ही कोण आहात - नवीन उद्योजक, आधीच उद्योजक, किंवा स्वयंरोजगार व्यावसायिक? यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडा लागेल.

आता तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका आणि जनरेट ओटीपी पर्यायावर क्लिक करा. OTP आल्यावर तो नमूद करायला विसरू नका.

तुम्हाला Register वर क्लिक करावे लागेल. त्याठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.

लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला एक अर्ज पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व तपशील भरावे लागतील आणि ते सबमिट करावे लागतील.

अशा प्रकारे तुम्ही स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.