Ration Card : रेशन कार्ड हे भारतातील अत्यंत महत्वाच्या कागदपत्रापैकी एक मानले जाते. नागरिकांच्या ओळख आणि रहिवासी पुराव्यासाठीच नाही, तर अनुदानित अन्नधान्य मिळविण्यासाठीही रेशन कार्ड आवश्यक आहे. शासकीय योजनेसाठी रेशन दुकानातून धान्य घेणे किंवा बँक खाते उघडणे, शाळा-कॉलेजात, न्यायालयात, सरकारी, खासगी कार्यालयात कागदपत्रे देतांना रेशन कार्ड अनिवार्य असते. सरकार लोकांना अनेक प्रकारचे रेशन कार्ड उपलब्ध करून देते. साधारणपणे कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे रेशन कार्ड दिले जाते.
भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त 4 प्रकारची रेशन कार्ड आहेत, जी वेगवेगळ्या रंगांनी ओळखली जातात. यामध्ये निळ्या, गुलाबी, पांढऱ्या आणि पिवळ्या रेशन कार्डसमाविष्ट आहे. ते वेगवेगळ्या उत्पन्न गटातील लोकांना दिले जातात.
Table of contents [Show]
अंत्योदय रेशन कार्ड म्हणजे काय?
अंत्योदय अन्न योजना (AAY) शिधापत्रिका NFSA अंतर्गत लागू केल्या जातात. ज्यांचे उत्पन्न नियमित नाही किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, अशा व्यक्तींना मदत केली जाते. बेरोजगार, महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात. अंत्योदय शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिले जाते. यामध्ये तांदूळ तीन रुपये किलो तर गहू दोन रुपये किलो दराने मिळतो. याची शिधापत्रिका महाराष्ट्रात पिवळ्या कलरची असते.
बीपीएल रेशन कार्ड म्हणजे काय?
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) शिधापत्रिका दिल्या जातात. दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकेवर प्रति कुटुंबाला दरमहा 10 ते 20 किलो रेशन दिले जाते. रेशनचे हे प्रमाण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असू शकते. यासोबतच अन्नधान्याच्या किमतीही राज्य सरकारांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रति किलो धान्याची किंमत राज्यानुसार बदलू शकते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिलेले रेशन कार्ड प्रत्येक राज्यात वेगवेगळे असते. त्यात निळे, हिरवे किंवा पिवळे असे कलर दिले जातात. आपल्या महाराष्ट्रात त्याचा कलर पिवळा असतो. या कार्डवर जास्तीत जास्त फायदा मिळतो.
एपीएल रेशन कार्ड म्हणजे काय?
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) शिधापत्रिका जारी केल्या जातात. दारिद्र्यरेषेवरील लोकांना हे कार्ड दिले जाते. एपीएल शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते. रेशनची किंमत राज्य सरकारकडून ठरवली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अन्नधान्याची किंमत वेगवेगळी असू शकते. ज्या कुटुंबांचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र्यरेषेच्या वर आहे त्या लोकांना गुलाबी रेशन कार्ड दिले जाते.
अन्नपूर्णा रेशन कार्ड म्हणजे काय?
अन्नपूर्णा योजना (AY) शिधापत्रिका सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जारी केल्या जातात. हे कार्ड गरीब आणि 65 वर्षांवरील वृद्धांना दिले जाते. अन्नपूर्णा रेशनकार्डवर 10 किलो दरमहा रेशन उपलब्ध आहे. राज्य सरकार हे कार्ड वृद्ध लोकांना उपलब्ध करून देतात. म्हणूनच रेशनचे प्रमाण आणि किंमत वेगवेगळ्या राज्यांनुसार भिन्न असू शकते.
पांढरे रेशन कार्ड
जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि ज्यांना अनुदानित धान्याची गरज नाही अशा कुटुंबांना हे कार्ड देण्यात आले आहे. हे रेशन कार्ड बहुतेक ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून वापरले जाते. भारतातील कोणताही नागरिक हे रेशन कार्ड घेऊ शकतो. याचा वापर मुख्यत्वे रेशन मिळवण्यासाठी नाही तर आपली ओळख सिद्ध करण्यासाठी केला जातो.