Side Income Options: नोकरी, व्यवसाय करताना प्रत्येक जण आणखी काहीतरी उत्पन्नाचे मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. कोरोनानंतर तर साइड इन्कमला जास्त महत्त्व आलं. पूर्णवेळ नोकरी करताना फ्रिलान्सिंग आणि मूनलाइटिंग करणाऱ्यांची संख्या वाढली. फक्त आयटी च नाही तर इतरही क्षेत्रात साइड इन्कम मिळवण्याच्या अनेक संधी आहेत.
पार्ट टाइम कामामुळे तुमचे वरखर्च निघतील किंवा गुंतवणुकीसाठी काही एक्स्ट्रा पैसे मिळतील. पार्ट टाइम उत्पन्न मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत. मात्र, बदलत्या काळासोबत काही नवे पर्याय पुढे आले आहेत. त्यासंबंधीत कौशल्य शिकून तुम्ही पैसे कमावू शकता. सुरुवातील हे कौशल्य जुजबी असेल तरीही चालेल. कारण, नंतर अनुभवाने तुम्हाला सखोल माहिती मिळेल आणि अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकता.
विविध क्षेत्रातील फ्रिलान्सिंग संधी
अपवर्क, फिवर, फ्रिलान्सर, गुरू.कॉम असे अनेक पोर्टल आहेत. यातून तुम्ही आयटी, ग्राफिक डिझाइनिंग, कंटेट राइटिंग, एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, डेटा एंट्री, अकाउंटिंग, मार्केटिंगशी संबंधीत काम मिळवू शकता. या पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. तुमचे ज्या क्षेत्रात शिक्षण झाले आहे, नोकरी करता, कामाचा अनुभव आहे त्या संबंधीत कामे फ्रिलान्सिंगासाठी उपलब्ध आहेत का ते पाहा.
या पोर्टल्सवरून प्रोजेक्ट बेस काम करून पैसे मिळतील. सुरुवातीला लहान कामे करून नंतर मोठी कामे तुम्ही स्वत:कडे घेऊन टीमही तयार करू शकता. फक्त कामे घेऊन ती इतरांकडून करून घेता येईल. हे एका दिवसात शक्य नाही. मात्र, एकदा सुरुवात केल्यास सोपे होईल. तसेच थेट नेटवर्कमधून काही फ्रिलान्सिंग कामे मिळतात का ते सुद्धा पाहू शकता.
ट्युटरिंग किंवा ट्रेनिंग
ऑनलाइन एज्युकेशन देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. अगदी शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत विविध छोटे मोठे कोर्सेस चालवणाऱ्या ऑनलाइन एज्युकेशन कंपन्या आहेत. या कंपन्यांकडे तुम्ही ऑनलाइन ट्युटर म्हणून जॉइन होऊ शकता. म्युझिक, स्पोर्ट्स, आर्ट अशा अनेक इन्स्टिट्यूट असतात. तेथेही तुम्ही शिक्षक म्हणून पार्टटाइम काम करू शकता.
तुमचे शिक्षण ज्या विषयात झाले आहे त्याचा पुन्हा एकदा चांगला अभ्यास करून तुमच्या वेळेनुसार लेक्चर घेऊ शकता. प्रति लेक्चर प्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील. अभ्यासक्रम सेट करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, तपासणे, प्रश्नपत्रिका भाषांतर अशी कामे याद्वारे मिळू शकतात. विवाहानंतर किंवा लग्नानंतर लहान मूल असल्यास महिलांना अशा संधी जास्त फायद्याच्या ठरू शकतात. मात्र, तुमच्याकडे विषयाचे सखोल ज्ञान असायला हवे.
इन्फ्लूएन्सर मार्केटिंग
सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून तुम्ही इन्फ्लूएन्सर बनू शकता. युट्यूब, ट्विटर, इन्स्टा अशी आघाडीची माध्यमे आहेत. तुम्ही नक्की कोणासाठी कंटेट तयार करणार हे सर्वप्रथम निश्चित करा. रिल्स, व्हिडिओ/ऑडिओ पॉडकास्ट, ब्लॉग, शॉर्ट व्हिडिओ द्वारे तुम्ही सुरुवात करू शकता.
यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. जरी सुरुवातीला फॉलोवर्सची कमी असली तरी सातत्याने कंटेट क्रिएट करत राहिलात तर फॉलोवर्स वाढतील. तुमच्या कंटेटला कसा प्रतिसाद मिळत आहे त्यानुसार बदल करता येईल. एकदा फॉलोवर्स वाढले की पेड प्रमोशन, उत्पादनांची मार्केटिंग आणि जाहिरातीद्वारे पैसे कमावता येतील. हा दीर्घकालीन मार्ग आहे, एका दिवसात पैसे मिळणार नाहीत. मात्र, एकदा तुमची ओळख तयार झाली की तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.
इ-कॉमर्स रिसेलर
इ-कॉमर्स साइटवरून किंवा देशभरातील होलसेलरकडून माल खरेदी करून स्थानिक दुकानदारांना विकण्याचा व्यवसाय करता येईल. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लॅपटॉप/मोबाईल अॅक्सेसरीज, फूड आयटम, डेकोरेशन, डिझाइनिंग साहित्य तुम्ही होलसेलरकडून खरेदी करून स्थानिक दुकानदारांना विकू शकता. एकदा तुमचा माल खपू लागला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ऑर्डर मिळतील. नोकरी, व्यवसाय करताना सुट्टीच्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            