Credit Card Limit: बँक प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक व्यवहार पाहून निर्णय घेत असते. जेवढे तुम्ही व्यवहारात चोख असाल तेवढा बँकेचा तुमच्यावरील विश्वास वाढतो. मात्र, जर तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट, इएमआय हप्ते भरण्यास दिरंगाई करत असाल तर बँक तुमच्यापासून दूर जाते.
जेव्हा बँक क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवण्याची ऑफर तुम्हाला देते तेव्हा समजून घ्या की तुमची बँकेतील पत वाढतेय. मात्र, जर अचानक क्रेडिट लिमिट कमी केल्याचा मेसेज आला तर तुमच्या आर्थिक नियोजनात काहीतरी गडबड असल्याचं हे लक्षण आहे.
जुलै महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाने काही ग्राहकांचे क्रेडिट लिमिट अचानक कमी केले. असा मेसेज ग्राहकांना आल्याने त्यांना धक्काच बसला. फक्त SBI बँकच नाही तर एचडीएफसी, आरबीएल बँकेनेही यापूर्वी ग्राहकांचे क्रेडिट लिमिट कमी केले आहे. या लेखात पाहूया बँक क्रेडिट लिमिट केव्हा कमी करते.
क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास दिरंगाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार मार्च 2023 पर्यंत 4,072 कोटींची क्रेडिट कार्ड बिले थकली आहेत. (credit card limit) ही आकडेवारी दवर्षी वाढत आहे. जर तुम्ही अनेक वेळा क्रेडिट कार्डचे बिल थकवले असेल तर बँक तुमचे क्रेडिट लिमिट कमी करते. तसेच सतत बिल थकवल्याने क्रेडिट स्कोरही खाली येतो. त्यामुळे दरमहिन्याला सर्व रक्कम भरायला हवी.
जास्त क्रेडिट कार्डचा वापर
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर वाढवला तरी तुम्ही अडचणीत येऊ शकता. बँकेकडून क्रेडिट वापराचा रेशो ठरवण्यात येतो. त्यापेक्षा दरमहा तुम्ही जास्त क्रेडिट कार्डचा वापर खरेदी, किंवा बिल पेमेंटसाठी करत असाल तर बँक तुमचे क्रेडिट लिमिट कमी करू शकते. एकूण क्रेडिट लिमिटच्या 30% किंवा त्यापेक्षा कमी क्रेडिटचा वापर चांगला समजला जातो.
म्हणजेच जर तुमचे क्रेडिट लिमिट 1 लाख रुपये असेल मात्र, तुम्ही दरमहा 30 हजारांपेक्षा जास्त बिल करत असाल तर त्यामुळेही बँक तुमचे लिमिट कमी करू शकते. कारण, तुम्ही मोठ्या प्रमाणात क्रेडिटवर अवलंबून आहात, असे समजले जाते. हाय क्रेडिट रेशोमुळे तुमचा सिबिल स्कोरही खाली येऊ शकतो.
अचानक क्रेडिट लिमिट वाढल्यास
काही महिन्यांत अचानक तुम्ही विविध बँकांकडून क्रेडिट कार्ड घेतल्यास तुमचे एकूण क्रेडिट लिमिट अचानक वाढू शकते. समजा, तुमच्याकडे तीन बँकांचे क्रेडिट कार्ड आहेत. त्यांचे एकूण लिमिट 3 लाख रुपये आहे.
पुढील काही महिन्यांत तुम्ही आणखी चार बँकांची क्रेडिट कार्ड घेतली आणि तुमचे एकूण क्रेडिट लिमिट 10 लाख रुपये झाले तर अशा परिस्थितीतही बँक तुमचे क्रेडिट लिमिट कमी करू शकते. त्यामुळे कमी कालावधीत विविध बँकांच्या क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू नका. हळूहळू लिमिट वाढवत न्या.
क्रेडिट कार्ड खूप दिवस निष्क्रिय असेल तर
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा खूप कमी वापर करत असाल किंवा खूप दिवसांपासून कार्ड निष्क्रिय असेल तर अशा परिस्थितीत बँक तुमचे क्रेडिट लिमिट कमी करते. (credit card limit) जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता तेव्हाच बँकेला फायदा होतो. त्यामुळे जर तुमचा वापर कमी झाला तर बँक त्यानुसार तुमचे लिमिट कमी करते.
जर बँकेने तुम्हाला माहिती न देता कार्ड लिमिट कमी केलं तर तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून माहिती घेऊ शकता. कार्ड लिमिट कमी करण्यामागील कारणे जाणून घ्या. तसेच जर चुकीने किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर क्रेडिट लिमिट कमी केले असेल तर तुम्ही ते पुन्हा वाढवूनही घेऊ शकता.