Cheap health insurance policy: आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. तुम्ही वैयक्तिक किंवा फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेत असाल तर प्रिमियम हा महत्त्वाचा घटक आहे. पॉलिसीचे जेवढे जास्त बेनिफिट्स तेवढा जास्त प्रिमियम असे दिसून येते. तसेच विमा कव्हरची रक्कम, वय, आधीपासून असलेले आजार, जीवनशैली यावरुनही प्रिमियम किती येईल हे ठरते.
वैयक्तिक विमा घेत असाल तर अनेकजण सर्वसामान्यपणे 3 ते 5 लाखांचा कव्हर घेतात. मात्र, कुटुंबातील चार व्यक्तींसाठी फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेताना 5 लाखांचा कव्हर अपूरा पडू शकतो. जेवढा जास्त कव्हर तेवढे चांगले असे बोलले जाते. मात्र, त्याच प्रमाणात प्रिमियमही भरायची तयारी ठेवावी लागते.
आरोग्य विमा पॉलिसी घेताना स्वस्तातली पॉलिसी घेण्यावर तुमचा भर असेल तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते. त्या कोणत्या हे या लेखात पाहूया.
विमा कव्हर रक्कम( Health Cover Limit)
जर कमी किंमतीतली विमा पॉलिसी घेत असाल तर त्या पॉलिसीचा कव्हर देखील कमी राहील. फॅमिली फ्लोटर तसेच वैयक्तिक विमा धारकाला हा कव्हर कमी पडू शकतो. कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली तर विमा रक्कम संपुष्टात येऊन खिशातून पैसे घालावे लागतील. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वस्तातील पॉलिसी पाहता तेव्हा कव्हर रक्कममध्ये तडजोड करावी लागते.
समजा, तुम्ही कुटुंबातील चार व्यक्तींसाठी फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतली आहे. पॉलिसी प्रिमियम कमी येण्यासाठी तुम्ही 3 लाख रुपयांचा कव्हर घेतला. जर त्या वर्षात कुटुंबातील 1 व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आणि रुग्णालयाचे बिल अडीच लाख रुपये झाले तर फक्त 50 हजार रुपयांचा कव्हर शिल्लक राहील. त्याच वर्षात जर कुटुंबातील दुसरे कोणी किंवा तीच व्यक्ती आजारी पडली तर हे 50 हजार रुपये कमी पडू शकतात.
रुग्णालयाचे खोली भाडे आणि रुमचा प्रकार (Room rent capping)
जेव्हा तुम्ही कमी प्रिमियम असणारी विमा पॉलिसी खरेदी करता तेव्हा रुग्णालयातील कोणती रूम निवडू शकता यावरही मर्यादा येतात. एकूण विमा कव्हरच्या 1% रूम भाडे एका दिवसासाठी विमा कंपनीकडून दिले जाते. तुमची विमा पॉलिसी जर 3 लाखांची असेल तर 3 लाखांच्या 1% म्हणजे 3 हजार रुपये प्रतिदिन तुम्हाला रूम भाड्यासाठी मिळू शकतात.
विमा पॉलिसी घेताना रुम रेंटवर कुठलीही मर्यादा नसेल अशी पॉलिसी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सिंगल प्राइव्हेट एसी रुम असेल तरीही योग्य ठरू शकते.
मात्र, रुग्णालयातील रुमचे भाडे 5 हजार रुपये असेल तर कंपनी वरील 2 हजार रुपये कव्हर करणार नाही. तसेच रूम ज्या प्रकारातील आहे त्यानुसार नर्सिंग, डॉक्टरांची तपासणी आणि इतर शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत तुमचा पूर्ण क्लेम पास होणार नाही. तुम्हाला खिशातून पैसे घालावे लागतील. अनेक वेळा रुग्णालयातील कमी किंमतीच्या रुम पूर्ण भरलेल्या असल्यास तुम्हाला जास्त भाडे असणारी रूम घ्यायची वेळ येऊ शकते. त्यावेळी रुम रेंट कॅपिंग (मर्यादा) मुळे पूर्ण क्लेम पास होणार नाही.
वेटिंग पिरियड जास्त असू शकतो (Waiting period)
पॉलिसीधारकाला आधीपासून काही व्याधी किंवा आजार असेल तर त्यासाठी प्रतिक्षा कालावधी असतो. सहसा हा कालावधी 3 ते 4 वर्षांचा असतो. मात्र, जर तुमची पॉलिसी स्वस्तातील असेल तर वेटिंग पिरियड यापेक्षाही जास्त असू शकतो.
हॉस्पिटल नेटवर्क आणि क्लेम सेटलमेंट रेषोमध्ये तडजोड
सहजा ज्या विमा कंपन्यांचे हॉस्पिटल नेटवर्क मोजके आहे किंवा क्लेम सेटलमेंट रेशो कमी असे अशा कंपन्यांच्या विमा पॉलीस स्वस्तात मिळू शकतात. कॅशलेस हॉस्पिटल्स जास्त असणे हे पॉलिसीधारकासाठी फायद्याचे ठरते. मात्र, जर हॉस्पिटल नेटवर्क अपुरे असेल तर तुम्हाला कॅशलेस सुविधा मिळणार नाही. विमा कंपनीकडे आलेल्या एकूण दाव्यांपैकी किती दावे विमा कंपनीने मंजूर केले त्यावरुन क्लेम सेटलमेंट रेशो ठरतो. जर कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो कमी असेल तर तुमचा क्लेम पास होण्यात कदाचित अडचणी येऊ शकतात.
इतर बेनिफिट मिळणार नाहीत
वार्षिक आरोग्य चाचणी, ओपीडी कव्हर, अॅम्ब्युलन्स चार्ज, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलाइजेशनचा कालावधी यामध्येही तडजोड करावी लागू शकते. रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर तसेच रुग्णालयात भरती होण्याआधी होम केअर विमा कंपनी कव्हर करते. मात्र, जर पॉलिसी स्वस्तातील असेल तर हा कालावधी अत्यंत कमी असू शकतो. जास्त प्रिमियमच्या पॉलिसीसाठी हा कालावधी 6 महिन्यांपर्यंतचा असतो.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जरी विमा पॉलिसी कमी किंमतीची असेल तरी कमीतकमी संरक्षण मिळते. अनेक वेळा अशी पॉलिसीही कामाला येते. तुमच्या कुटुंबाची गरज, उत्पन्न, जीवनशैली यानुसार योग्य पॉलिसी निवडावी. विमा कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करतील, अशाही पॉलिसी लाँच केल्या जातात. पॉलिसी बाजार सारख्या विमा अग्रिगेटर कंपन्यांच्या साइटवर तुम्ही तुलनात्मक दृष्या अभ्यास करून योग्य पॉलिसी निवडू शकता.