Health Insurance: तरुण वयापासून आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे अनेक फायदे असतात. आरोग्य विमा असल्यास तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी आर्थिक मदत मिळते. तसेच बऱ्याच काळासाठी नो क्लेम रेकॉर्ड गेल्यास तुमचा ट्रॅक रेकॉर्ड सुधारतो. तेव्हा तरुण वयात आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या.
Table of contents [Show]
जेवढे वय कमी तेवढे प्रीमियम कमी
तरुण्यात कोणत्याही आजाराची शक्यता वृध्दांपेक्षा खूपच कमी असते. असे अनेक रोग आहेत जे केवळ वृध्दात्वात जडतात. यामुळे तरुण वयात आरोग्य विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांना कमी प्रीमियम भरावा लागतो. आरोग्य विम्याच्या प्रीमियमची रक्कम वयानुसार वाढते. अशा परिस्थितीत लहान वयातच आरोग्य विमा पॉलिसी घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
वेटींग पिरेडच टेंशन नसते
बहुतेक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये पूर्व-अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी विशिष्ट कालावधीचा वेटींग कालावधी असतो. पॉलिसीमध्ये गुंतवणूक सुरु करण्याच्या वेळेनंतरच तुम्हाला त्या गंभीर आजारांवर विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. परंतु, वेटींग कालावधी फक्त 2-4 वर्षाचाच असतो. या कालावधीनंतर कोणतीही विमा कंपनी तुमचा दावा नाकारु शकत नाही. त्यामुळे तुम्ही लहान वयात आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केल्यास तुम्हाला प्रतीक्षा कालावधीबद्दल काळजी करण्याची गरज नाही.
नो क्लेम बोनस मिळतो
आरोग्य विमा घेणाऱ्या व्यक्तिला कोणताही आजार नसेल, तर तरीही त्याने आरोग्य विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी. यामुळे जर तुम्ही आरोग्य विम्याचा दावा केला नाही, तर ठराविक कालावधीनंतर तुम्हाला नो क्लेम बोनस दिला जातो. नो क्लेम बोनस दर महिन्याला विमा रकमेचा निश्चित भाग म्हणून मोजला जातो. 50 टक्क्यांपर्यंतच्या विशिष्ट आकड्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते वर्षानुवर्षे जोडले जाते. यामुळे तुमचा प्रीमियम तेवढाच राहतो, परंतु विमा संरक्षणाची रक्कम वाढते. परंतु याबाबत विमा कंपन्यांची स्वत:ची काही मार्गदर्शक तत्वे आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
अकस्मात क्षणी उपयोगी पडतो
जरी तारुण्यात आजार जडण्याचे प्रमाण कमी असेल, तरी अकस्मात येणाऱ्या आरोग्य विषयक अडचणी सांगून येत नाहीत. अकस्मात घडलेला अपघात, आपली काहीही चुकी नसतांना झालेली जोखमीची इजा, इत्यादी घटनांच्या वेळी तारुण्यात देखील तुमचा आरोग्य विमा उपयोगी पडू शकतो.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            