आज 31 मे म्हणजेच जागतिक तंबाखूविरोधी दिन (World No Tobacco Day) आहे. तंबाखूला नाही म्हणण्याचा आजचा दिवस आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World health organisation) 1987मध्ये याची सुरुवात केली. तंबाखूचा वाढता वापर थांबवण्याच्या हेतूने याला सुरुवात करण्यात आली. आजच्या या दिवसाचं औचित्य साधून आरोग्य मंत्रालयानंही एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. यानुसार व्हिडिओ कंटेंटमध्ये सिगारेट, तंबाखू, गुटखा किंवा इतर कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचं ग्लॅमरस प्रेझेंटेशन केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. म्हणजेच तंबाखूचं समर्थन होईल, त्याला महत्त्व प्राप्त होईल, अशाप्रकारचे व्हिडिओ निर्माण करण्यावर बंधनं घालण्यात आली आहेत. काय आहे नियम, जाणून घेऊ...
- सरकारकडून नोटिफिकेशन जाही
- कठोर पावलं उचलताना केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केलीय. त्यानुसार, व्हिडिओच्या आधी आणि मध्यभागी किमान 30 सेकंदांचा इशारा द्यावा लागणार आहे.
- व्हिडिओच्या ज्या भागात तंबाखू दर्शवण्यात आलीय तिथे 'तंबाखूमुळे कॅन्सर होतो' (Tobacco Causes Cancer) किंवा 'तंबाखूमुळे मृत्यू होतो' (Tobacco Kills) असं लिहिणं गरजेचं असणार आहे.
- व्हिडिओ सुरू असताना मोठ्या फॉन्टमध्ये हा इशारा दर्शवणं गरजेचं आहे. जेणेकरून ते सहज दिसून येईल.
- पांढरं बॅकग्राउंड असेल तर त्यावर काळ्या रंगात मोठ्या फॉन्टमध्ये हा इशादा लिहिलेला असावा.
- व्हिडिओचा उद्देश तंबाखूची जाहिरात करण्याचा नसावा.
Table of contents [Show]
जनजागृतीपर व्हिडिओ शेअर
तंबाखूला नाही म्हणा, हा आजच्या दिवसाचा उद्देश आहे. यासाठी विविध प्लॅटफॉर्मवरून जनजागृतीही केली जातेय. डीडी न्यूजनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या माध्यमातून तंबाखूचे हानिकारक परिणाम आणि त्यासंदर्भातली जागृती केलीय. तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू कंपन्यांचा व्यवसाय, जागतिक आरोग्य संघटनेची तंबाखूविरोधी मोहीम, आरोग्यदायी जीवन जगण्याचा अधिकार अशा मुद्द्यांना यात केंद्रित केलंय. यंदाची थीम 'अन्न पिकवा, तंबाखू नाही' (Grow food, not tobacco) अशी आहे. तंबाखूजन्य उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा कमी करणं, नियंत्रित करणं हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा उद्देश आहे.
#WATCH | तंबाकू के उपयोग के हानिकारक और घातक प्रभावों के बारे में जागरूकता बढ़ाने पर ध्यान देने के लिए हर साल 31 मई को दुनिया भर में #WorldNoTobaccoDay के रूप में मनाया जाता है। pic.twitter.com/DPhymLQmkP
— डीडी न्यूज़ (@DDNewsHindi) May 31, 2023
कठोर कारवाई होणार
सरकारनं हा आदेश आता काढला आहे. या आदेशाची 3 महिन्यांत पूर्ण अंमलबजावणी होणार आहे. कोणत्याही प्रकारे या आदेशाचं कोणीही उल्लंघन केलं तर आरोग्य मंत्रालय किंवा माहिती आणि प्रसारण मंत्रालय त्यावर स्वतःहून कारवाई करणार आहे. हा आदेश ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, यूट्यूब व्हिडिओ अशा सर्वच ठिकाणी तंबाखूजन्य उत्पादनांच्या वापरावरही लागू होणार आहे. त्यामुळे कोणत्याही व्हिडिओमध्ये तंबाखूशी संबंधिक मजकूर असेल तर त्यासोबत डिस्क्लेमर गरजेचं असणार आहे.
निकोटीन आणि व्यसन
मेडीकव्हर हॉस्पिटलच्या मते, जवळपास 14 टक्के प्रौढ तंबाखूचं धूम्रपान करतात. सुमारे 26 टक्के इतर प्रकारातल्या तंबाखूसह धूरविरहित तंबाखू वापरतात. तंबाखूमधल्या निकोटीनमुळे सिगारेट आणि तंबाखूच्या इतर प्रकारांचं व्यसन लागण्याचा धोका असतो. सिगारेटमधल्या निकोटीनचं प्रमाण 5.7 मिग्रॅ ते 13 मिग्रॅपर्यंत असू शकतं. त्याचबरोबर गुटखा किंवा खैनीच्या पॅकेटमध्ये उत्पादनावर आधारित अंदाजे 1.7 ते 76 मिग्रॅ निकोटीन असू शकतं.
लाखो रुपयांची बचत
तंबाखूतल्या निकोटीनमुळे तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन जडतं. तंबाखू, सिगारेट, गुटखा, पानमसाला अशी काही उत्पादनं लोकप्रिय आहेत. मात्र ही जीवघेणी आहेत. विविध ब्रँड्सचा विचार केल्यास एक सिगारेट साधारणपणे 6 रुपयांपासून पुढे, तंबाखू, गुटखा 2 ते 4 रुपयांपासून पुढे बाजारात उपलब्ध आहे. व्यसन असणारी व्यक्ती दिवसातून अनेकवेळा याचं सेवन करत असते. त्यामुळे एका दिवसाचे आणि महिन्याचे हजारो रुपये व्यक्ती खर्च करत असते. हा पैशांचा अपव्यय केवळ तंबाखूजन्य पदार्थ वापरण्याचा आहे. त्यामुळे जे आरोग्याचं नुकसान होणार आहे, त्याचा खर्च तर लाखो रुपयांच्या घरात आहे. तंबाखूमुळे विविध प्रकारचे कर्करोग, फुफ्फुसाशी संबंधित, हृदयाशी संबंधित, रक्तवाहिन्यांशी संबंधित विविध आजार जडतात. त्यावरच्या उपचारांचा खर्च हा काही लाखांमध्ये असतो. शिवाय होणार त्रास वेगळाच. त्यामुळे तंबाखूचं व्यसन आपल्याला परवडणारं आहे का, याचा विचार प्रत्येकानं करायचा आहे.
तंबाखू इंडस्ट्री आणि अर्थकारण
'स्टॅटिस्टा'च्या मते, मे 2023पर्यंत गॉडफ्रे फिलिप ही भारतातली आघाडीची भारतीय सिगारेट कंपनी होती. तिचं बाजार भांडवल 88 अब्ज रुपयांपेक्षा जास्त होतं. त्यानंतर व्हीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेड 50 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त बाजार भांडवल होतं. आयटीसी लिमिटेड (Indian tobacco company) हीदेखील एक भारतीय कंपनी असून कोलकाता इथं मुख्यालय आहे. या कंपनीनं 2022च्या आर्थिक वर्षात सुमारे 623 अब्ज रुपयांचा महसूल नोंदवला. एफएमसीजी (FMCG) श्रेणीव्यतिरिक्त इतरही व्यवसाय कंपनी करते.