‘माझे माहेर पंढरी’ म्हणत लाखो वैष्णवांचा मेळा चंद्रभागेतीरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लागत असतो. माघी आणि चैत्री एकादशीला देखील भाविक पंढरपुरात येऊन विठोबा आणि रुक्माईचे दर्शन घेत असतात. मात्र सर्वाधिक गर्दी असते ती आषाढी एकादशीला. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख म्हणून वारीकडे बघितलं जातं, ही वारी बघायला,अनुभवायला देशोविदेशातून लोक येत असतात. आता जिथे वारकऱ्यांचा भक्तिसागर लोटणार आहे तिथे राहण्याखाण्याची सोय आलीच.
पंढरीच्या वारीला येणारे लोक पंढरपुरात 2-3 दिवस किंवा हफ्ताभर देखील थांबतात. यानिमित्ताने जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होत असतात. कीर्तनसेवा होत असते. खरे तर शेतीची कामे आटोपून शेतकरी वर्ग वारीत सहभागी होत असतो. वर्षभराच्या अंगमेहनतीतून आराम मिळावा म्हणून देखील काही लोक वारीला जातात. संपूर्ण वैराग्याचा मार्ग वारकरी संप्रदाय सांगत नाही म्हणून तर घरदार, शेती, गुरेढोरे सांभाळून पंढरीचा भक्तिमार्ग गेली 800 वर्षे गजबजलेला आहे.
वारकरी पंढरपुरात राहतात कुठे?
याचं साहजिक उत्तर आहे चंद्रभागेचं वाळवंट. वारीला नियमित जाणारे काही वारकरी सांगतात की आधीच्या काळी चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची पालं पडायची. विठुरायाचं दर्शन घेऊन झालं की वारकरी मंडळी परत आपापल्या गावी जायला निघायची. मात्र जसा काळ बदलत गेला तसे वारीचे नियोजन देखील बदलत गेले. वारीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत गेल्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांची राहण्याची व्यवस्था होत नाही.
मंदिर समितीने आणि काही खासगी संस्थांनी भाविकांसाठी ‘भक्त निवास’ बांधले आहेत. भाविकांसाठी अगदी एसी रूमची देखील सोय उपलब्ध करून दिली जाते. जास्तीत जास्त 1300-1500 रुपयांत भक्त निवासाची सोय उपलब्ध आहे. हे झालं वारीच अगदीच व्यावसायिक मॉडेल. परंतु वारीच्या काळात पंढरपुरातल्या प्रत्येक घरात वारकरी मुक्कामासाठी उतरत असतात.

‘यजमान कृत्य’ आणि आर्थिक उलाढाल
पूर्वीच्या काळी जेव्हा हॉटेल्स, भक्त निवास नव्हते तेव्हा वारकरी मंडळी ही पंढरपुरातील स्थानिक रहिवाश्यांच्या घरी उतरायचे. दरवर्षीच्या नियमित वारीमुळे सगळेच वारकरी एकमेकांना ओळखत असत. ज्या घरात वारकरी उतरत त्या घरातील यजमानांना काही रक्कम दिली जाते. वारकऱ्यांच्या पाहुणचार करणे याला ‘यजमान कृत्य’ असे म्हणतात.
पंढरपूर यात्रेच्या काळात मंदिर परिसरातील बडवे, उत्पात, सेवाधारी कुटुंबातील बहुतांश लोक हे बाहेरगावी निघून जातात. घरातील मोजके लोकच थांबतात आणि ‘यजमान कृत्य’ पार पाडतात. ज्या वारकऱ्यांना स्वतंत्र खोली हवी असेल अशांना देखील सुविधा प्रदान केली जाते. यात स्वतंत्र खोली, अंघोळीची सोय, प्रातःविधीची आणि जेवण नाश्त्याची सोय करून दिली जाते. या सेवेसाठी साधारणतः 1000 ते 1500 रुपये आकारले जातात.
याशिवाय घरातील हॉलमध्ये, गच्चीवर देखील वारकऱ्यांची झोपण्याची आणि विसाव्याची सोय केली जाते. यात वारकऱ्यांना अंघोळीसाठी चंद्रभागेवर जावे लागते आणि प्रातःविधीसाठी सार्वजनिक शौचालयात जावे लागते. अशा प्रकारच्या सेवेसाठी 250 ते 500 रुपये आकारले जातात.
मठांमध्ये देखील राहण्याची व्यवस्था
‘यजमान कृत्य’ सर्वांनाच परवडेल असे नाही. पंढरपूर शहरात आणि आजूबाजूला अनेक मठ आहेत. महाराष्ट्रातील ‘मठ संस्कृती’ जर अनुभवायची असेल तर पंढरपुरात जायला हवं. मठांमध्ये भाविकांची राहण्याची सोय अत्यल्प दरात केली जाते. इथे रेट कार्ड ठरलेला नसतो. आपापल्या ऐपतीप्रमाणे भाविक पावती फाडतात, म्हणजेच दान देतात.
तनपुरे महाराज मठ, कैकाडी महाराज मठ, संत मुक्ताई मठ, गजानन महाराज मठ अशी काही महत्वाचे मठ पंढरपुरात पाहायला मिळतात. यासोबतच शेकडो छोटे-मोठे मठ पंढरपूर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत पहायला मिळतात.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            