Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यशस्वी डे ट्रेडर बनायचे आहे?

यशस्वी डे ट्रेडर बनायचे आहे?

मग जाणून घ्या डे ट्रेडर्स (Day Trader)ची काही गुणवैशिष्ट्ये

यशस्वी डे ट्रेडर होण्यासाठी तुमच्याकडे काही गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत. शेअरबाजाराचे ज्ञान, कौशल्य आणि काही स्वभाववैशिष्टे यांचा ताळमेळ साधून हे काम करावे लागते. यासाठी गणिती विश्लेषण, वित्तीय ज्ञान आणि वर्तणुकीची मानसिकता ओळखणे या गोष्टींमध्ये आपली हातोटी असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक होण्याची जिद्द असेल तर आपण यशस्वी डे ट्रेडर होऊ शकतो.

इंट्राडे टेड्रिंग म्हणजे सहज मिळणारा पैसा, सुखी आयुष्य असं चित्र सहसा आपल्या डोळ्यासमोर रंगवलं जातं. खरंतर या विरुद्धची जीवनशैली या व्यवसायात उतरल्यावर अंगिकारावी लागते.

  • कामासाठी समर्पित वेळ
  • कामातून सुट्टी नाही
  • मार्गदर्शनाच्या जोडीला स्व-अभ्यास
  • धोके पत्करण्याची मानसिकता
  • रोजच्या कामातली अढळ निष्ठा
  • आवश्यकतेनुसार संयम

इंट्राडेमध्ये नुकसान झालेल्यांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की शेअर बाजारात चढउतारांचा सिलसिला अव्याहत सुरू असतो आणि यादरम्यान अतिहव्यास आणि अतिभीती या दोन्हींमुळे फायदा हातून निसटतो.

उदाहरणार्थ, आपण एखाद्या कंपनीचे समभाग किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये निफ्टी (NIFTY) किंवा बँक निफ्टी (BANKNIFTY) खरेदी केली असेल आणि त्यातून थोडा फायदा मिळण्याची स्थिती निर्माण झाली असेल तर हव्यासापोटी अनेक जण अधिक फायदा मिळेल या आशेने थांबतात; पण बाजाराची स्थिती पालटते आणि मिळालेला नफाही हातून निसटून नुकसान पदरी येते. याउलट एखाद्या शेअर्सच्या किंवा निफ्टी-बँक निफ्टीसंदर्भात सकारात्मक घडामोड घडून त्यातून चांगला नफा कमावण्याची संधी निर्माण झालेली असते; पण अभ्यासाअभावी आपले त्याकडे दुर्लक्ष होते. 

आपण बाजार उघडल्यानंतर समजा स्टेट बँकेचे समभाग खरेदी केले असतील आणि अचानकपणे त्याचे भाव काही प्रमाणात घसरले तर त्याची कारणे जाणून न घेता आपण तात्काळ विकून मोकळे होतो; पण काही तासांनी तोच समभाग चांगल्या प्रमाणात वधारतो. अशा स्थितीत केवळ आपला नफाच हातून जात नाही, तर नुकसानही पदरी येते. या दोन्हींमध्ये समतोल आणि नियंत्रण ज्याला साधता आले तो इंट्राडेमध्ये हमखास यशस्वी होऊ शकतो. याखेरीज अन्यही बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

भांडवलाची योग्य व्यवस्था : कोणत्याही व्यवसायात कायमच फायदा होत नाही. त्यामुळे अधूनमधून होणारे आणि मोठे तोटे हा या खेळाचा भाग आहे. उदा. एखाद्या दिवसात सलग आठ व्यवहारात नुकसानीस सामोरे जावे लागू शकते, तर नवव्या व्यवहारात फायदा होऊ शकतो. या धोक्यांना सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. अशा वेळी खेळत्या भांडवलाची उपलब्धता असणे आवश्यक असते.

शेअरबाजार समजून घ्या : इंट्राडे ट्रेडर्ससाठी शेअर बाजाराचे सूत्र समजून घेणे आवश्यक गोष्ट आहे. शेअर बाजार कसा चालतो. त्याचे नियम काय आहेत. शेअरच्या किमती कमी-जास्त होण्यावर कोणकोणते घटक कारणीभूत असतात. ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय. त्यातील जोखीम किती आहे. त्यातील पर्याय काय आहेत. नुकसानीचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे. एखाद्या व्यवहारातून चटकन बाहेर पडून दुसरी रणनीती कशी आखली पाहिजे, अशा असंख्य गोष्टी बारकाव्यांसह जाणून घ्यायला हवे. ते समजून न घेता व्यवहार करणे नक्कीच धोक्याची घंटा आहे.

मुंगी होऊन साखर खा : आपल्याकडे पुरेसे भांडवल असले, अनुभव जास्त असला तरीही शेअर बाजारात मुंगी होऊन साखर खाण्यातच शहाणपणा आहे. हे या क्षेत्रात आयुष्य खर्ची घातलेले अनेक जण स्वानुभवांती सांगतात. त्यामुळे एकदम मोठ्या व्यवहाराला हात घालण्यापेक्षा छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणे फायद्याचे ठरते. या छोट्या छोट्या व्यवहारांमधून यशाची चव चाखल्यानंतर थोड्या मोठ्या व्यवहाराला हात घाला.

लक्षात ठेवा, शेअर बाजार आणि शेअर व्यवहार हे कायमस्वरुपी राहणार आहेत. त्यात आपल्याला आज ना उद्या संधी मिळेलच. पण एकदा आपले नुकसान झाले की ते भरून निघणार नाही किंवा त्यासाठी बराच काळ जावा लागेल. त्यामुळे डे ट्रेडिंगमध्ये घट्ट पाय रोवून उभे राहण्यासाठी आधी छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करा. मग मोठ्याकडे झेप घ्या.