Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NPS Calculator: निवृत्तीनंतर हवेत 1,00,000? महिन्याला किती करावी लागणार गुंतवणूक? जाणून घ्या...

NPS Calculator: निवृत्तीनंतर हवेत 1,00,000? महिन्याला किती करावी लागणार गुंतवणूक? जाणून घ्या...

NPS Calculator: निवृत्तीनंतर अधिकाधिक रक्कम मिळावी, नियमित मिळावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कारण निवृत्तीनंतरचं जीवन कोणत्याही ताणतणावाशिवाय व्यवस्थित जगता यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी दैनंदिन गरजा काय, खर्च किती, बचत किती यासर्वांचं आधीच नियोजन करावं. पाहूया याविषयी सविस्तर...

निवृत्तीनंतर सातत्यपूर्ण उत्पन्नाचा स्त्रोत असणं गरजेचं आहे. नोकरी सुरू असते त्याचवेळी सेवानिवृत्तीचं नियोजन (Planning) करणं फायद्याचं ठरतं. खासगी नोकरी करत असाल तर राष्ट्रीय पेन्शन योजना (National pension scheme) हा एक चांगला पर्याय आहे. या माध्यमातून एक मोठी निवृत्तीनंतर रक्कम जमा होऊ शकते. सोबतच मासिक पेन्शनही (Monthly pension) मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. एनपीएस हा पेन्शनचा एक स्वस्त पर्याय आहे. आता याचा हिशोब पाहूया.

कसे मिळतील 1 लाख रुपये?

समजा तुमची योजना वयाच्या 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातून निवृत्त होण्याची आणि त्यानंतर दर महिन्याला 1 लाख रुपये पेन्शन मिळवण्याची आहे, असं गृहीत धरू. तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी एनपीएस निवडलीय. मात्र ती निवडण्यापूर्वी दरमहा किती गुंतवणूक करावी लागणार, ज्यामुळे निवृत्तीनंतर किमान एक लाख रुपये पेन्शन येईल, हे माहीत असायला हवं. एसबीआय पेन्शन फंडाच्या एनपीएस कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं हे समजून घेऊ. तुमचे वय साधारणपणे 21 वर्षे आहे आणि तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त व्हायचं आहे. म्हणजेच तुम्हाला अंदाजे सेवानिवृत्ती नियोजनासाठी एकूण 39 वर्षांचा गुंतवणूक कालावधी मिळणार आहे. पाहू...

  • एनपीएसमध्ये मासिक गुंतवणूक : 10,000 रुपये
  • 39 वर्षात एकूण योगदान : 46.80 लाख रुपये
  • गुंतवणुकीवर अंदाजे परतावा : 10 टक्के
  • मॅच्युरिटीवर निव्वळ रक्कम : 5.62 कोटी रुपये
  • अ‍ॅन्युइटी पर्चेस : 40 टक्के (2.25 कोटी रुपये)
  • अंदाजे अ‍ॅन्युइटी पर्चेस : 6 टक्के
  • वयाच्या 60व्या वर्षी पेन्शन : 1,12,458 प्रति महिना

(टीप : हे कॅलक्युलेशन अंदाजे आकड्यांमधलं आहे. वास्तविक आकडे यापेक्षा वेगळे असू शकतात.)

अ‍ॅन्युइटी रक्कम जेवढी जास्त तितकी पेन्शन जास्त

एनपीएसमध्ये तुम्ही 40 टक्के अ‍ॅन्युइटी घेतल्यास आणि अ‍ॅन्युइटीचा दर वार्षिक 6 टक्के असेल, तर निवृत्तीनंतर तुम्हाला एकरकमी 3.37 कोटी रुपये मिळू शकतील आणि 2.25 कोटी अ‍ॅन्युइटीमध्ये जातील. आता या अ‍ॅन्युइटी रकमेसह तुम्हाला दरमहा सुमारे एक लाख रुपये पेन्शन मिळेल. अ‍ॅन्युइटीची रक्कम जेवढी जास्त ठेवाल तितकी पेन्शन जास्त मिळणार आहे, हे ध्यानात असायला हवं. एनपीएसमध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी ही पीएफआरडीएद्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकांना दिली जाते. ते ही गुंतवणूक इक्विटी, सरकारी रोखे (Securities), गैर-सरकारी रोख्यांमध्ये तसंच फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रूमेंटमध्ये गुंतवत असतात.

किमान 40 टक्के रकमेची अ‍ॅन्युइटी खरेदी करणं गरजेचं

अ‍ॅन्युइटी हा तुमचा आणि विमा कंपनी यांच्यामधला करार असतो. याच करारानुसार, एनपीएसमध्ये किमान 40 टक्के रकमेची अ‍ॅन्युइटी खरेदी करणं गरजेचं आहे. अ‍ॅन्युइटीच्या अंतर्गत गुंतवलेली रक्कम निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून मिळणार असते तर एनपीएसची उर्वरित रक्कम एकरकमी काढता येते. एनपीएस अंतर्गत आयकर कायद्याच्या कलम 80CCD (1B) अंतर्गत, 50 हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर अतिरिक्त कर कपातीचा लाभही मिळतो. कलम 80Cमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतची मर्यादा पूर्ण केली असेल, तर हा अतिरिक्त कर लाभ तुम्हाला मिळू शकतो.

(डिसक्लेमर : एनपीएस/शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)    
Source : www.zeebiz.com