Mass layoffs : अॅमेझॉन (Amazon), एक्सेंचर (Accenture), मेटा (Meta) म्हणजेच फेसबुक आणि विशेषकरून आयटी क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केलीय. मागच्या वर्षी एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांनी कर्मचारी कपात करण्याचा धडाकाच लावलाय. मागील वर्षात 3500 आणि मागच्या महिन्यात 200 कर्मचारी ट्विटरनं काढले. अजूनही काही काढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. अशात एका मोठ्या ई-कॉमर्स कंपनीनं मात्र एक आदर्श जगासमोर ठेवलाय. ही कंपनी आहे वॉलमार्टची कंपनी फ्लिपकार्ट (Flipcart).
Table of contents [Show]
'जबाबदारीनं भरती'
आयटी, ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करतात. तोटा होत असल्याचं कारण देत किंवा परफॉर्मन्स नसल्याचं सांगत या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जातं. अनावश्यक भरती हीदेखील यातली समस्या आहे. हाच विचार फ्लिपकार्टनं केला. कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर कृष्णा राघवन लाइव्हमिंटसोबत बोलत होते. ते म्हणाले, की मोठ्या प्रमाणावर आधी भरती करायची आणि नंतर कर्मचाऱ्यांची कपात करायची, ही आमची कार्यपद्धती नाही. आवश्यक तेवढीच कर्मचारी भरती केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काढण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. बाजारपेठेत आमचं स्थान पाहता आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. भरती करताना ही जबाबदारी पार पाडावीच लागते.
'पोर्टफोलिओ अधिक मजबूत'
प्रमाणाबाहेरची भरती कंपनीचं आर्थिक गणित बिघडवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे कंपन्यांनी भरती करताना या बाबींचा विचारा करणं क्रमप्राप्त ठरतं. आम्ही हजारो लोकांना कामावर घेत नाहीत. वरिष्ठ व्यवस्थापन स्टाफमध्ये कोणतीही वाढ आम्ही करणारक नाहीत. त्यामुळे कोणाच्याही नोकरीवर त्याचा परिणाम होणार नाही. मागच्या वर्षी स्टॉक ऑप्शन बायबॅक करण्याची योजना त्यासोबतच त्याची दरभाव आणि जाहिरातदेखील आम्ही केली होती, अशी माहिती राघवन यांनी दिली. बिझनेसशी संबंधित पोर्टफोलिओ अधिक मजबूत करणं, हे आमचं लक्ष्य आहे. त्यामुळे बाजारपेठेत आमचं स्थान मजबूत होईल. अधिक चांगल्या संधी निर्माण होतील. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीवर विचार करता येवू शकतो. पुढील कालावधीत कशी आणि किती पगारवाढ करायची याचा पुनर्विचार केला जाणार आहे.
'लिक्विडेशनच्या संधी'
कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिली जाणारी हमखास गोष्ट म्हणजे लिक्विडेशनच्या संधी. तसंच नोकरीचा विचार करता, अंतर्गत जॉब पोस्टिंगमध्ये वाढ केल्याचे राघवन यांनी सांगितलं आहे. कंपनीचं योगदान सकारात्मक आहे त्यासोबतच याचा विस्तारदेखील होतोय, अशी माहिती वॉलमार्ट कंपनीच्या उच्च अधिकार्यांनी दिली. मागच्या तीन वर्षांत फ्लिपकार्टनं पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीचा फायदा फ्लिपकार्टला होत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. फ्लिपकार्टचे सह संस्थापक असलेल्या बिन्नी बन्सल हे फोन पेमध्ये (PhonePe) सुमारे 100-150 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करण्याचा विचार करत असल्याचं वृत्तही समोर आलं आहे.
प्रतिस्पर्ध्यांना आव्हान
एकीकडे कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा धडाका अनेक कंपन्यांनी लावला असताना फ्लिपकार्टनं मात्र ले-ऑफ न करण्याचा निर्णय घेत बाजारपेठेत आपलं काय स्थान आहे, हेच दाखवून दिलंय. प्रतिस्पर्धी इतर कंपन्यांमध्ये थोडी नाही तर हजारांवर कपात केली जात आहे. अॅमेझॉननं जानेवारीत 18,000 कर्मचाऱ्यांना काढलं. तर आणखी 9,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुसरीकडे, एक्सेंचरन तब्बल 19,000 कर्मचाऱ्यांना काढण्याची आधीच घोषणा केलीय.