APMC Market Vegetable Rates: नवी मुंबईमधील कृषि उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee - APMC) वेगवेगळ्या ठिकाणांहून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आणि गेल्या आठवड्यापासून राज्यात थंडीची चाहूल सुरू झाल्याने भाज्यांचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये एकूण सर्व प्रकारच्या भाज्यांच्या भावात घसरण झाल्याचे दिसून येते.
एपीएमसी मार्केटमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भाज्यांची किंवा फळांची आवक आली की, त्याचा परिणाम नक्कीच त्याच्या किमतीवर होतो. बाजारात जास्त माल आला की, व्यापाऱ्यांकडून त्याची किंमत कमी केली जाते. भाजीपाला किंवा फळे हा नाशवंत माल असल्याने तो मार्केटमध्ये आल्यावर त्याचा योग्य वेळेत लिलाव होणे म्हणजेच त्याची विक्री होणे गरजेचे असते. अन्यथा तो माल खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातील मालाच्या मागणीनुसार त्याची किंमत खाली किंवा वर होत असते.
मालाचा दर मार्केटमधील स्थितीवरून ठरतो!
शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांच्या किमतीप्रमाणे विकण्याची मुभा असते. पण त्यांच्याजवळ तसे ग्राहक आणि ती यंत्रणा नसेल तर त्यांना माल विकण्यासाठी आमच्यासारख्या आडतदारांवर अवलंबून राहावे लागते. आडतदारसुद्धा स्वत:च्या मर्जीप्रमाणे मालाची किंमत ठरवत नाहीत. मार्केटमध्ये त्या मालाची मागणी आणि पुरवठा यानुसार स्थानिक व्यापाऱ्यांकडून त्याची मागणी केली जाते. त्यानुसारच आम्ही माल वाया जाऊ नये म्हणून त्याची योग्य त्या किमतीत विक्री करण्याचा प्रयत्न करत असतो. जेणेकरून त्यातील काही फायदा शेतकऱ्यांना सुद्धा मिळू शकेल, अशी माहिती वाशी भाजी मार्केटमधील विक्रेते अनिल भुजबळ यांनी दिली.
माल उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका!
बहुतांश शेतकरी आपला भाजीपाला किंवा माल विकण्यासाठी व्यापाऱ्यांची मदत घेत असतात. ही मदत घेताना शेतकऱ्यांना आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकारही नसतो. व्यापारी तो माल शहरात आल्यावर त्याच्या मागणीनुसार त्याची किंमत ठरवत असतो. त्यात व्यापाऱ्याची काहीच गुंतवणूक नसते. पण तरीही त्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार व्यापाऱ्याला असतो. परिणामी यात शेतकऱ्याचे नुकसान होते. कारण शेतकऱ्याला मालाचे नुकसान होण्याऐवजी त्याचा उत्पादन खर्च आणि त्यावर थोडाफार फायदा अपेक्षित असतो. पण काहीवेळा त्याच्या मालाच्या विक्रीतून उत्पादन खर्चही काढता येत नाही. पण त्याचवेळी व्यापारी मात्र त्याचा हिस्सा बरोबर काढून घेत असतो.
किरकोळ बाजारात मालाची चढ्या भावानेच विक्री!
एपीएमसी मार्केटमध्ये जरी भाज्यांचे दर खाली आले असले तरी, लोकल मार्केटमध्ये स्थानिक भाजीविक्रेत्यांकडून त्यामानाने किंमत कमी केली जात नाही. गेल्या 2-3 दिवसांपासून वाशी मार्केटमध्ये टोमॅटोचा भाव 8 ते 10 रुपये किलो इतका खाली आला आहे. पण तरीही लोकल भाजीविक्रेते अजूनही 25 रुपयांपासून 30 ते 35 रुपये किलो दराने टोमॅटो विकत आहेत. याचा अर्थ पिक उत्पादक शेतकरी आणि ग्राहक वगळता इतर सर्वांना या कमी दराचा लाभ घेता येतो. पण या दोन घटकांची यातून सुटका होत नाही.
टोमॅटोप्रमाणेच इतर भाज्यांचीसुद्धा अशीच स्थिती आहे. जो माल जास्तीने मार्केटमध्ये येतो. त्याची किंमत व्यापाऱ्यांकडून पाडली जाते आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो.