सध्या बॉक्स ऑफिसवर एकाच चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे, 'बाईपण भारी देवा'(Baipan Bhari Deva). हा चित्रपट 30 जून 2023 ला प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दिपा परब (Deepa Parab) यासारख्या नामांकित अभिनेत्रींनी भूमिका साकारली आहे.
हा चित्रपट प्रदर्शित होऊन 24 दिवस झाले असून अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना पाहायला मिळत आहे. सैराट आणि वेड या दोन चित्रपटांनंतर मराठीत सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा चित्रपट म्हणून बाईपण भारी देवाकडे पाहिले जात होते. मात्र आता रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन रेकॉर्ड मोडत मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट म्हणून बाईपण भारी देवाने ओळख मिळवली आहे. या चित्रपटाने 24 दिवसात 65.69 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
'वेड'चा रेकॉर्ड मोडला
रितेश देशमुखचा मराठीतील 'वेड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीला उतरला होता. सैराट नंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 60 कोटींचा गल्ला जमवून मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट असा नावलौकिक मिळवला होता. मात्र 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने रविवारी 23 जून 2023 रोजी सर्वाधिक कमाई करत हा रेकॉर्ड मोडला आहे.
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या आकडेवारीनुसार 23 जुलै 2023 रोजी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने 2.60 कोटी रुपयांची कमाई केली. तर रविवारी 24 जुलै रोजी 3.35 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने रविवारपर्यंत 65.69 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईनंतर 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट मराठीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रत्येक कुटूंबात केवळ याच चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. यापूर्वी आलेल्या रितेश देशमुखच्या वेड चित्रपटानंतर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहत आहेत. हा चित्रपट 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बाईपण भारी देवाने चित्रपटाचे बजेट क्रॉस केले आहे.