आपण पाहिलं की लाभांश जाहीर करुन कंपनीला तसा डायरेक्ट फायदा काहीच नसतो. पण गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी अनेकदा कंपन्या लाभांश जाहीर करत असतात. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजकडे उपलब्ध माहितीनुसार, खाण कंपनी वेदांता लिमिटेड (VEDL)ने चालू आर्थिक वर्षात 4 अंतरिम लाभांश दिला आहे, जो एकूण 81 रुपये प्रति शेअर आहे. शेअर बाजारात, या लाभांशामुळे वेदांता लिमिटेडच्या भागधारकांना बंपर कमाई झाली आहे. एप्रिल 2022 पासून आत्तापर्यंत म्हणजे आर्थिक वर्ष 23 मध्ये, कंपनीने भागधारकांना अंतरिम आणि फायनल लाभांश दिला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने दिलेल्या 81 रुपयांच्या लाभांशाची तुलना केल्यास, वेदांताचे वार्षिक लाभांश यील्ड 20 टक्के आहे.
वेदांताने दिलेला लाभांश
6 मे 2022 रोजी, वेदांताने प्रति शेअर 31.50 रुपयाच्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली. नंतर 26 जुलै 2022 रोजी, वेदांताने त्यांच्या पात्र भागधारकांना 19.50 रुपये दिले. त्याचप्रमाणे वेदांताच्या शेअर्सने 29 नोव्हेंबर 2022 आणि 3 फेब्रुवारी 2023 रोजी अनुक्रमे 17.50 रुपये आणि 12.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश दिला. एप्रिल 2022 च्या सुरुवातीला वेदांताच्या शेअरची किंमत सुमारे 405 रुपये प्रति शेअर होती. त्यामुळे, आर्थिक वर्ष 23 मध्ये वेदांताच्या शेअर्सचे निव्वळ लाभांश यील्ड 20 टक्के [(81 रुपये / 405 रुपये) x 100] वर येते. वेदांता स्टॉकच्या 20 टक्के वार्षिक लाभांश यील्डची तुलना केल्यास, तुमच्या लक्षात येईल की या मेटल्स क्षेत्रातील समभागाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ईपीएफ सारख्या सरकारी योजनांच्या दुपटीहून अधिक परतावा केवळ लाभांशाद्वारे दिला आहे.
शेअरमार्केटमध्ये वेदांता
गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडून दीर्घ मुदतीत 12 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा करतात, परंतु वेदांता लिमिटेडने केवळ लाभांश देऊन मोठा परतावा दिला आहे. वेदांता लिमिटेड ही अॅल्युमिनियम आणि झिंकचे उत्पादन करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. वेदांता लिमिटेडचे शेअर्स एनएसई आणि बीएसई या दोन्हींवर सूचीबद्ध आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये वेदांताच्या शेअरची किंमत 313.80 रुपये आहे.
वेदांताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुरुवात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी वेदांता समुहाचे अध्यक्ष आणि देशातील दिग्गज उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी 2003 साली लंडने येथे वेदांता रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. लंडन शेअर बाजारामध्ये पहिली भारतीय कंपनी लिस्ट होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर त्यांनी झांबिया, आफ्रिका, नामिबिया या देशातील खाण उद्योगातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करुन त्यांना ताब्यात घेतले. कंपनीचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. जागतिक स्तरावर वेदांता कंपनीचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यातून त्यांनी मोठा नफा कमावला आहे. तसेच वेदांता समुहाने सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे.