वंदे भारत हा भारताचा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आहे.सध्या वंदे भारत अंतर्गत चेअरयान असलेली ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात यशस्वीपणे रुळांवर धावत आहे. आता मात्र या प्रकल्पाचं पुढचं पाऊल म्हणून भारतीय रेल्वे वंदे भारत नॉन एसी स्लीपर कोच ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे.भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक बी.जी.माल्ल्या यांनी याविषयी भाष्य केलं आहे. ही रेल्वे येत्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस लॉन्च केली जाईल असा विश्वासही माल्ल्या यांनी व्यक्त केला आहे.
वंदे भारत नॉन एसी स्लीपर कोच ट्रेन कशी असेल आणि याची वैशिष्ट्य काय असतील यावरही माल्ल्या यांनी प्रकाश टाकला आहे. काय आहेत या ट्रेनची वैशिष्ट्य यावर टाकूया एक नजर.
काय आहेत वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनची वैशिष्ट्य?
ही ट्रेन एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त किमी अंतरासाठी धावेल
या ट्रेनमध्ये एकंदरीत 16 कोच असतील
यात 11 थ्री टिअर कोच असतील
चार टू टिअर कोच यात समाविष्ट असतील
एक फर्स्ट टिअर कोच यात जोडलेला असेल
आगामी आर्थिक वर्ष म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत या रेल्वेचं लोकार्पण केलं जाईल
कोच तयारीच्या अंतिम टप्प्यात
बी.जी माल्ल्या यांच्या म्हणण्यानुसार वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनचे कोच म्हणजेच डबे तयारीच्या अंतिम टप्प्यात आले आहेत. आगामी महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2023 रोजी हे कोच पहिल्यांदा लोकांसमोर आणले जातील.यात एकदरीत २२ कोच आणि एक लोकोमोटिव असेल.ही ट्रेन निळ्या पांढऱ्या किंवा नारंगी रंगांनी सजलेली असेल असंही माल्ल्या यांचं म्हणणं आहे.
याशिवाय वदे भारत मेट्रो ट्रेनही लोकार्पण केली जाईल असंही माल्ल्या यांनी सांगितलं. जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 च्या दरम्यान या मेट्रोचं लोकार्पण केलं जाईल.