रशिया युक्रेन युद्ध ( Ukraine Russia War) काही केल्या मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशिया सारख्या बलाढ्य राष्ट्राल तोंड देणाऱ्या युक्रेनला (Ukraine) आता अमेरिकेकडून आणखी लष्करी मदत पाठवण्यात येणार आहे. युक्रेनला तब्बल 400 अब्ज डॉलरचे लष्करी साहित्य देण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
अत्याधुनिक युद्ध सामग्रीचा समावेश-
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरु झाल्यापासून अमेरिका युक्रेनला मदत करत आहे. आता आणखी अब्जावधी डॉलर किमतीच्या लष्करी साहित्याची युक्रेनला मदत केली जाणार आहे. अमेरिकेचे सेक्रटरी अँटोनी ब्लिंकेन यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. या 400 अब्ज डॉलरच्या लष्करी सामग्रीमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, तोफा, बुलेटप्रुफ लष्करी वाहने यासह इतर युद्ध साहित्याचा समावेश आहे.
रशिया युद्ध थांबवू शकला असता-
अमेरिकेने असे म्हटले आहे की, रशिया युक्रेनमधून आपले सैन्य मागे घेऊन हे युद्ध थांबवू शकला असता. मात्र, काळा समुद्र धान्य निर्यात करारामधून रशियाने माघार घेतल्यानंतर रशियाकडून ओडेसा बंदरासह इतर युक्रेनियन बंदरांवर हल्ले करणे सुरूच आहेत. त्यामुळे जोपर्यंत रशिया आपले सैन्य माघार घेत नाही, तोपर्यंत अमेरिका युक्रेनच्या पाठिशी राहिल. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (DoD) ने युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीकोणातून अतिरिक्त लष्करी मदत जाहीर केली आहे.
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून यापूर्वीही जून महिन्यात युक्रेनला 500 दशलक्ष डॉलरचे लष्करी साहित्याचे पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये युक्रेनचे हवाई दल सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या लष्करी सामग्रीचा समावेश होता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            