भारतातील वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक परदेशी कंपन्या उत्सुक आहेत. ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, सौर उर्जा यासह अन्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भारतात परदेशी गुंतवणूक येत आहे. त्याचप्रमाणे आता अमेरिकेतील सिलिकॉन पॉवर ग्रुपने देखील भारतातील ओडिशामध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीकडून ओडिशामध्ये सिलिकॉन कार्बाइड उत्पादनचा प्लांट (silicon carbide manufacturing) उभारण्यात येणार आहे.
दोन वर्षात प्लांटचे काम सुरू होणार
भारतात होणारी ही गुंतवणूक सिलिकॉन पॉवर ग्रुपची भारतातील उपकंपनी आरआयआर (RiR) पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून केली जाणार आहे.ओडिशातील ही अशा प्रकारचा हा पहिलाच सिलिकॉन कार्बाइड उत्पादनाचा प्लांट असेल. तसेच येत्या काही दिवसातच कंपनीचे एक पथक ओडिशामध्ये दाखल होऊन उद्योग उभारणी संदर्भात कार्यवाही सुरू करणार आहे. तसेच पुढील 18 ते 24 महिन्यांत या प्लांटच्या निर्मितीचे काम सुरू होणार आहे. या संदर्भात सिलिकॉन पॉवर ग्रुपने ओडिशामध्ये प्रकल्प सुरु करण्यासंदर्भातील एलओआय (letter of Interest) सादर केला आहे.
रोजगार निर्मितीस चालना-
सिलिकॉन पॉवर ग्रुपच्या या गुंतवणुकीमुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याची आशा ओडिशा सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या प्लांटमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उद्योगांनाही मोठा फायदा होणार आहे. विशेषत: इलेक्ट्रिक वाहने आणि सौर उर्जा निर्मिती क्षेत्रासाठी.