वर्ष 2022 संपायला आता काही दिवस उरलेत. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात शेअर मार्केटमध्ये अनिश्चितता पाहायला मिळत आहे. मात्र तरिही आयपीओच्या माध्यमातून यंदा शेकडो कंपन्यांनी भांडवली बाजारात प्रवेश केला. वर्ष 2023 मध्ये हाच ट्रेंड कायम राहणार आहे, कारण तब्बल 89 कंपन्या IPO आणण्याच्या तयारीत आहेत.
पुढल्या वर्षात IPO घेऊन येणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत अडीच पटीने वाढ होणार आहे. वर्ष 2023 मध्ये 89 कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये धडक देतील, असे प्राईमडेटाबेस या कंपनीने म्हटले आहे. या कंपन्यांकडून समभाग विक्रीतून एकूण 1.4 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे.
वर्ष 2022 मध्ये शेअर मार्केटमध्ये 33 आयपीओ आले होते. यातून कंपन्यांनी 55145.80 कोटींचे भांडवल उभारले. मात्र 2023 मध्ये यात अडीचपटीने वाढ होणार आहे. 89 कंपन्या आयपीओसाठी सज्ज आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर प्रायमरी मार्केट गजबजलेले राहील, असे प्राईम डेटाबेसने म्हटले आहे. 2021 मध्ये 63 कंपन्यांचे आयपीओ आले होते. यातून कंपन्यानी 1.19 लाख कोटींचा निधी उभारला होता. काही आयपीओ हिट ठरले तर काही आयपीओंनी गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान केले.
पुढल्या वर्षी आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांच्या यादीत OYOचे नाव आघाडीवर आहे. ओयोचा आयपीओ गेल्या वर्षापासून रखडला आहे. ओयोने ऑक्टोबर 2021 मध्ये सेबीकडे आयपीओ प्रस्ताव सादर केला होता. मात्र शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे कंपनीने ही योजना लांबणीवर टाकली होती. ओयोकडून 8430 कोटींचा इश्यू आणला जाण्याची शक्यता आहे.
फॅब इंडिया (Fabindia) कंपनीचा 4000 कोटींचा इश्यू वर्ष 2023 मध्ये शेअर मार्केटमध्ये धडकण्याची शक्यता आहे. आधार हाऊसिंग फाययान्स या कंपनीचा 7300 कोटींचा आयपीओ पुढल्या वर्षात बाजारात येईल. त्याशिवाय यात्रा ऑनलाईन या कंपनीचा 750 कोटींचा IPO हा 2022 मध्ये बाजारात धडकणार आहे.