Unmarried Pension Scheme : देशातील बहुतांश तरुणवर्ग करिअरकडे लक्ष केंद्रीत करत असल्याने काही प्रमाणात त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होताना दिसून येत आहे. करिअरसाठी वेळ दिल्याने अनेकांचे लग्नाचे वय निघून जात आहे. परिणामी अनेक सुशिक्षित तरुण अविवाहित राहत असल्याची समस्या पुढे येत आहे. त्यातच वाढती बेरोजगारी हे देखील विवाहसंस्थेवर परिणाम करणारे एक मुख्य कारण समोर येत आहे. समाजातील या भीषण वास्तवाचे गांभीर्य ओळखून हरियाणा सरकारने अविवाहित तरुणांसह विधवा आणि विधुरांना पेंशन देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत.
अविवाहित तरुणांसाठी पेंशन योजना Pension For Bachelors
गेल्याच आठवड्यात हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणातील अविवाहित तरुणांना (स्त्री आणि पुरुष) पेंशन सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेनुसार हरियाणा सरकार त्यांच्या राज्यातील पदवीधर तरुणांसह विधवा आणि विधुरांना पेन्शन देणार आहे. या पेन्शन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिमहिना 2750 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अशी योजना जाहीर करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
पेंशनसाठी नियम अटी लागू-
हरियाणा सरकारने लागू केलेल्या पेंशन योजनेसाठी पुढील काही अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. तरच या पेंशन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- तरुणाचे वय हे 45 ते 60 वर्ष दरम्यान असावे
- अविवाहित तरुण हा पदवीधर असावा
- यासोबतच अविवाहिती तरुणांचे वार्षिक उत्पन्न हे 1.80 लाख असावे
- विधवा आणि विधुरासाठी पेंशन योजनेचा वयोगट हा 40 ते 60 दरम्यान आहे
- त्यांचे वार्षिक वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
- वरील सर्व अटी पूर्ण केल्यास या लोकांना 2750 रुपये पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
हरियाणात 71 हजार पदवीधरांना मिळणार लाभ
अविवाहित पदवीधर तरुणांसाठी हरियाणा सरकारने ही पेंशन योजना जाहीर केली आहे. सद्यस्थितीत हरियाणामध्ये 71 हजार अविवाहित पदवीधर लोक आहेत, जे मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेच्या कक्षेत येतात. या पेंशन योजनांसाठी सरकारला दरमहा 20 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. या पेन्शन योजनेत दरवर्षी 240 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
वयाच्या साठीनंतर वृद्धापकाळ पेंशन योजना-
अविवाहित पेंशन योजनेच्या लाभार्थ्यांना भविष्यात ज्यावेळी वय वर्ष 60 होईल त्यावेळी त्यांचा वृद्धापकाळ पेंशन योजनेत समावेश होणार आहे. त्यानुसार या लाभार्थ्यांना महिना 2750 रुपये (चालू आर्थिक वर्षातील पेंशन) आर्थिक सहाय्य मिळेल.
हरियाणात किती पेंशनधारक आहेत?
हरियाणात सध्या 18 लाखांहून अधिक लोकांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सध्या या योजनेंतर्गत येणाऱ्या ज्येष्ठांना 2750 रुपये पेन्शन देत आहेत. याशिवाय 8 लाखांहून अधिक महिला विधवा निवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत. हरियाणा सरकार दोन लाख दिव्यांगांना पेन्शन देत आहे.
महाराष्ट्रात शक्य होईल का योजना?
लग्न न जमल्याने अविवाहित राहण्याचे प्रमाण महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरुणांना अविवाहित राहावे लागण्याच्या समस्येचा मुद्दा वारंवार चर्चेला येत आहे. काही ठिकाणी लग्नाळू तरुणांनी मोर्चे काढल्याचेही प्रकार समोर आले आहेत. अशा परिस्थितीत हरियाणा सरकारने घेतलेला निर्णय महाराष्ट्रात घेतल्यास काही गरजुंना आर्थिकदृष्ट्या एक प्रकारची मदत होऊ शकते. मात्र, त्यासाठी अशा प्रकारचे पीडित तरुण आणि सरकार सकारात्मक भूमिका घेतील का? एक संशोधनाचा भाग आहे.