India Pork Import: अमेरिका वराह मांस (पोर्क मीट) निर्यात करणारा जगातील एक आघाडीचा देश आहे. अमेरिकन कृषी आणि संबंधीत उत्पादने आयात करण्यास मागील अनेक वर्षांपासून भारताने निर्बंध घातले होते. वराह मांस सुद्धा हा निर्बंध घातलेल्या यादीत होता. मात्र, 2022 मध्ये काही उत्पादने आयातीस भारताने परवानगी दिली आहे. पुढील काही महिन्यांत अमेरिका पोर्क मीट भारताला निर्यात करणार आहे.
भारतातील गोवा, केरळ, कर्नाटक, आसाम, नागालँडसह ईशान्य पूर्वेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक वराह मांस सेवने केले जाते. अमेरिकेतून आयात केलेले वराह मांस या राज्यांमध्ये सर्वाधिक विकत घेतले जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्याची अमेरिकन मांस उद्योगांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
पहिली शिपमेंट लवकरच
अमेरिकेतील नॅशनल पोर्क प्रोड्युसर कौन्सिलचे प्रमुख रँडी स्प्राँक यांनी US काँग्रेससमोर बोलताना सांगितले की, पुढील काही दिवसांत पोर्क मीटची शिपमेंट भारतात पाठवली जाईल. मांस निर्यात करण्यासाठी काम सुरू आहे. भारत-अमेरिकेत प्राधान्य व्यापार करार (GPS) असूनही अमेरिकेच्या काही कृषी उत्पादनांवर बंदी घातली होती. त्यातील काही वस्तूंना आता परवानगी मिळाली असून वहार मांस निर्यात करण्यात येईल.
अमेरिकेतील पोर्क मीट इंडस्ट्री
अमेरिका हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वहार मांस उत्पादन घेणारा देश आहे. तसेच निर्यातीत जगात दुसरा क्रमांक अमेरिकेचा आहे. अमेरिकेची पोर्क मीट इंडस्ट्री सुमारे 800 कोटी डॉलरची आहे. 2021 साली अमेरिकेने दीडशे कोटी डॉलरच्या कृषी वस्तू भारताला निर्यात केल्या. भारताने अनेक कृषी उत्पादनांना बंदी घातली आहे. अन्यथा, अमेरिकेन कृषी उत्पादनांची निर्यात वाढू शकते.
भारताने अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर बंदी घालण्याचे कारण काय?
देशातील शेतकऱ्यांचे हितसबंध जपण्यासाठी भारताने अमेरिकेतील अनेक कृषी उत्पादनांवर बंदी घातली आहे. देशांतर्गत स्पर्धा वाढून स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही, असे भारताचे म्हणणे आहे. वस्तूंवरील निर्बंधांबरोबरच किती प्रमाणात एकाधी वस्तू आयात केली जावी, यावरही भारताने नियम आखले आहे. यास अमेरिकेचा कायमच आक्षेप राहिला आहे. दोन्ही देशांतील वाद जागतिक व्यापार संघटनेतही गेला आहे. मात्र, आता यातील काही वस्तुंच्या आयातीला परवानगी देण्यास भारताने सुरूवात केली आहे.