बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतात. तसेच, ग्राहकांसोबत नेहमीच या-ना त्या कारणाने संपर्कांत राहतात. सध्या काही बँकानी व्याजदर वाढवलेले असताना युनियन बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. तसेच, गृहकर्ज आणि ऑटो कर्जासाठी प्रक्रिया शुल्क 100 टक्के माफ करण्याची घोषणा केली आहे. ही सुविधा बँक फक्त नव्या ग्राहकांना देणार आहे. त्यामुळे बँकेत नुकतेच खाते उघडले असल्यास नवे ग्राहक याचा फायदा घेऊ शकतात.
बँकेने त्यांच्या ग्राहकांना गृहकर्ज आणि ऑटो कर्जाचे प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकी आणि घर घेणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे. ही सुविधा नवीन ग्राहकांसाठी असली तरी याला सुद्धा बँकेने एक अट ठेवली आहे. बँकेनुसार ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तेच या सवलतीचा फायदा घेऊ शकणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित मॅनेज केला असल्यास, त्यांना या सवलतीचा फायदा मिळणार आहे.
या प्रक्रिया शुल्काचा फायदा घेण्यासाठी बँकेने एक मुदत ठेवली आहे. त्या मुदतीमध्येच ग्राहक या सवलतीचा लाभ घेऊ शकणार आहेत. ही मुदत 16 ऑगस्ट 2023 ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे. याचबरोबर अन्य वित्तीय संस्था आणि बँकांकडून गृहकर्ज घेण्यासाठी सुद्धा ही ऑफर वाढवण्यात आली आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाचा 1 हजार 712 कोटींचा लाभांश
सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने 2022-23 साठी 1 हजार 712 कोटी रुपयांचा लाभांश (डीव्हीडंड) चेक केंद्र सरकारला दिला. यावेळी बँकेने कोणत्याही आर्थिक वर्षात आत्तापर्यंत दिलेला हा सर्वाधिक लाभांश असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) ए. मणिमेखलाई यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लाभांशाचा चेक सुपूर्द केला आहे.