वेगवेगळ्या विमा कंपनीच्या जाहिराती आपण पाहत असतो. आयुर्विम्याला पर्याय नाही, हे वाक्य तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे झाले आहे. पण तरीही विमा म्हणजे काय हा प्रश्न उरतोच. विम्यातील काही शब्दांचा, संज्ञांचा, तरतुदींचा अर्थ कळत नाही. काय असतो हा विमा, याबाबत आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.
विमा म्हणजे काय What is Insurance?
विमा म्हणजे आर्थिक नुकसानापासून संरक्षणाचे साधन आहे. मानवी जीवनातील धोके आपण टाळू शकत नाही. पण धोक्यामुळे होणार नुकसान कमीतकमी राखण्याची आणि झालेल्या नुकसानीची भरपाईची व्यवस्था करणे, म्हणजे विमा. थोडक्यात, अनपेक्षित संकटामुळे होणारे नुकसान किंवा अनपेक्षित अपघातामुळे येणारे अंपगत्व किंवा मृत्यू यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई भरून काढण्याचा मार्ग म्हणजे विमा. विमा म्हणजे विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील करार असतो. या करारानुसार, एखाद्या दुर्घटनेत विमाधारकाचे आर्थिक नुकसान झाल्यास विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देते.
विमा विकत घेण्यापूर्वी या संज्ञा जाणून घ्या
विमाधारक (Policyholder) : ज्या व्यक्तीचा विमा काढला किंवा उतरविला जातो, त्याला विमाधारक किंवा insured म्हणतात. विमाधारक हा पॉलिसीचा मालक असतो. एखाद्या विशिष्ट वयापर्यंतच विमा काढता येतो. त्यासाठी आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे.
जोखमीपासून संरक्षण (Life assured) : जोखमीपासून संरक्षण करण्याचा विमा हा एक चांगला मार्ग आहे. ज्याचा विमा काढला आहे त्याचे जोखमीपासून संरक्षण होते. एखाद्याच्या अकाली मृत्यूमुळे येणारी जोखीम आर्थिकदृष्ट्या भरून काढण्यासाठी विमा उतरवला जातो. प्रामुख्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीचा विमा काढला जातो.
विम्याची रक्कम (Sum assured) : विमा धारकाच्या मृत्यूमुळे उद्भवलेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ठराविक रक्कम मिळावी, यासाठी जीवन विमा काढला जातो. Sum Assured या संज्ञेचा शब्दश: अर्थ सांगायचे झाले तर विमा धारकाच्या मृत्यूनंतर खात्रीशीर मिळणारी रक्कम असे म्हणतात.
नॉमिनी (Nominee) : नॉमिनी म्हणजे विमा धारकाने स्वत:हून नामनिर्देशित केलेली व्यक्ती. जी विमा धारकाच्या पश्चात कायदेशीर वारस असते. विमा धारकाचा मृत्यू झाल्यानंतर जीवन विमा कंपनीकडून विम्याची रक्कम आणि इतर फायदे नॉमिनीला दिले जातात.
पॉलिसी कार्यकाल (Policy tenure) : पॉलिसी कार्यकाल म्हणजे, या पॉलिसीद्वारे विमा कंपनी विमा धारकाला ठरलेल्या कालावधीनुसार विमा संरक्षण पुरवते. जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि त्याच्या अटीनुसार पॉलिसीचा कालावधी 1 ते 100 वर्षे किंवा विमा धारक जिवंत असेपर्यंत असू शकतो.
मॅच्युरिटी (Maturity age) : मॅच्युरिटी म्हणजे पॉलिसीचा कालावधी संपण्याचा काळ. ही पॉलिसी कार्यकाला प्रमाणेच असते. विमा कंपनी विमा धारकाला संरक्षण देण्याचा जेवढा कालावधी देते त्याला मॅच्युरिटी म्हटले जाते.
प्रीमियम/हप्ता (Premium) : विमा पॉलिसी सुरू ठेवण्यासाठी आणि त्याचे लाभ घेण्यासाठी आपण जी मासिक, त्रैमासिक, किंवा वार्षिक रक्कम भरतो, त्याला प्रीमियम म्हणजेच विम्याचा हप्ता म्हणतात.
प्रीमियम पेमेंट करण्याची पद्धत (Premium payment mode) : विमा धारक त्याच्या सोयीनुसार पॉलिसीचा प्रीमियम भरू शकतो. त्याला रेग्युलर, लिमिटेड आणि सिंगल प्रीमियम पेमेंट या 3 पर्यायांद्वारे पैसे भरता येतात. रेग्युलर प्रीमियम पेमेंटद्वारे विमा धारक प्रत्येक महिन्याला, तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षाने प्रीमियम भरू शकतो. तर लिमिटेड प्रीमियम पेमेंटद्वारे विमा धारक पॉलिसीची मुदत संपेपर्यंत पेमेंट भरत नाही. तो ठराविक मुदतीत जसे की, 10 वर्षे, 15 वर्षे किंवा 20 वर्षांमध्ये संपूर्ण पॉलिसीची रक्कम भरू शकतो. तर सिंगल प्रीमियम पेमेंटद्वारे तो एकाच वेळी सगळी रक्कम भरू शकतो.
रायडर्स (Riders) : मुख्य विमा पॉलिसीसोबत विमा धारकाला काही अतिरिक्त लाभ देणारी तरतूद म्हणजे रायडर्स. रायडर्स विमा धारकाला एड ऑन बेनेफिट्स देतात. ज्यामुळे मुख्य विमा पॉलिसी अधिक उपयुक्त आणि आकर्षक बनते. प्रामुख्याने रायडर्सचे 4 प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यात अपघाती मृत्यू/कायमचे अपंगत्व रायडर, टर्म रायडर, क्रिटिकल इलनेस रायडर आणि प्रीमियम माफी रायडर यांचा समावेश होतो.
मृत्यू लाभ (Death benefit) : डेथ बेनिफिट किंवा मृत्यू लाभ म्हणजे, पॉलिसी सुरू असतानाच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी विम्याची रक्कम किंवा कव्हरेज नॉमिनीला दिली जाईल. इथे विम्याची रक्कम आणि डेथ बेनिफिट एकच नाहीत. कारण डेथ बेनिफिट हा विम्याच्या रकमेएवढा किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
मॅच्युरिटी बेनिफिट (Maturity benefit) : मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजे विमा पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर जी रक्कम विमा कंपनी देते, त्याला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणतात. पॉलिसीमध्ये नमूद केलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर विमा धारकाला ही रक्कम दिली जाते.
फ्री-लुक पीरियड (Free-look Period) : विमा कंपन्यांकडून ग्राहकांना 15 दिवसांचा फ्री लूक पीरियड दिला जातो. या 15 दिवसात आपल्याला पॉलिसी समजून घेण्यासाठी वेळ दिला जातो. काही कंपन्या 1 महिन्याचाही कालावधी देतात. जर तुम्हाल पॉलिसी पसंत नसेल किंवा फसवणूक झाल्याचे वाटत असेल तर तुम्ही या कालावधीत पॉलिसी परत करू शकता.
वाढीव कालावधी (Grave period) : जर तुम्ही काही कारणांमुळे पॉलिसीचा प्रीमियम दिलेल्या वेळेत भरू शकला नाही. तर विमा कंपनी तुम्हाला तो प्रीमियम भरण्यासाठी 15 ते 30 दिवसांची मुदतवाढ देते, त्याला ग्रेस पीरियड म्हणतात.
पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू (Policy surrender value) : एखाद्या पॉलिसीधारकाने पॉलिसी मॅच्युर्ड होण्यापूर्वीच ती बंद करण्याचा निर्णय घेतला तर, त्या पॉलिसीधारकाला विमा कंपनी जी रक्कम देते, त्याला सरेंडर व्हॅल्यू म्हणतात.
पेड-अप व्हॅल्यू (Paid-up value) : एका विशिष्ट कालावधीनंतर पॉलिसीधारकाने प्रीमियम भरणे बंद केल्यास, विमा कंपनी त्याची पॉलिसी कमी विम्याच्या रकमेवर सुरू ठेवते, त्याला पेड-अप व्हॅल्यू म्हणतात. पेड-अप व्हॅल्यू ही पूर्वी भरलेल्या बेसिक प्रीमियमची संख्या आणि भराव्या लागणाऱ्या प्रीमियमच्या संख्येने गुणाकार करून काढली जाते.
रिव्हायवल कालावधी (Revival period) : एखाद्या पॉलिसीधारकाने ग्रेस पीरियडमध्ये प्रीमियम भरला नाही तर ती पॉलिसी रद्द होते. अशावेळी पॉलिसीधारकाला ती अजून सुरू ठेवायची इच्छा असल्यास विमा कंपनी रद्द झालेली पॉलिसी पुन्हा करण्याचा पर्याय देते, या कालावधीला रिव्हायवल कालावधी म्हणतात.
टॅक्स सवलत (Tax benefits) : विमा पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम हा इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या 80 C या कलमांतर्गत सवलतीसाठी पात्र आहे. पण यातून जास्तीत जास्त 1.5 लाख रूपयांची सवलत मिळते.
अपवर्जन (काय वगळले ते पाहा – Exclusions) : कोणतीही विमा पॉलिसी घेताना, अपवर्जन म्हणजेच यातून काय काय वगळले आहे ते काळजीपूर्वक वाचा. यामध्ये अशा गोष्टींचा समावेश असतो, ज्यांचा विमा पॉलिसीमध्ये येत नाहीत किंवा कव्हर केल्या जात नाहीत.
विमा दावा प्रक्रिया (Claim process) : पॉलिसी सुरू असलेल्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे नॉमिनीला डेथ बेनिफिटचा लाभ मिळवण्यासाठी दावा दाखल करावा लागतो.